Wednesday, June 27, 2007

अंजूच्या उपस्थितीवरच प्रेक्षक खूष...


जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेला पात्र ठरण्याची आणखी एक संधी अंजू बॉबी जॉर्जच्या हातून निसटली असली, तरी लोकांना तिच्या उपस्थितीचेच अप्रूप होते. गेल्या वेळेस आजारी असल्यामुळे पुण्यातील ग्रांप्री स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेली अंजू सणस क्रीडांगणावर आली आणि स्पर्धेचा नूरच पालटला. हरवलेले चैतन्य परत आले. टाळ्यांचा गजर सुरू झाला आणि प्रत्येक जण तिच्या यशासाठी प्रार्थना करू लागला.

लांब उडीच्या स्पर्धेत फक्त चारच स्पर्धक होते. त्यात अंजू जॉर्ज, मनीषा डे आणि सुश्‍मिता सिंग रॉय या भारताच्या खेळाडू, तर सायरा फझल ही पाकिस्तानची ऍथलिट होती. त्यामुळे अंजूचे पुण्यातील विजेतेपद निश्‍चित होते. पण सर्वांनाच उत्सुकता होती ती अंजू 6.60 मीटर लांब उडी मारून जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेला पात्र ठरते का याचीच!

प्रत्येक खेळाडूला सहा वेळा उडी मारण्याची संधी होती. पात्र ठरण्यासाठी आवश्‍यक 6.6 चा आकडा पार करणे आपल्या आवाक्‍यात नाही, याचा अंदाज अंजूला पहिल्या दोन प्रयत्नांनंतरच आला असावा. कारण पुढच्या प्रत्येक उडीच्या वेळी ती प्रेक्षकांकडे पाहून मला "चिअर अप' करा, असे आवाहन करीत होती. चौथ्या उडीपर्यंत अंजूने सर्वप्रथम संधी घेतली आणि इतर तीन खेळाडूंनी नंतर उड्या मारल्या. पण अखेरच्या दोन उड्या मारण्यापूर्वी अंजूने थोडी अधिक विश्रांती घेतली व सर्वांत शेवटी उड्या मारल्या. तरीही अंजूची मजल 6.21 मीटरपर्यंतच गेली. अखेरच्या प्रयत्नातही अपयश आल्यानंतर मातीवर जोरात हात आपटणाऱ्या अंजूच्या चेहऱ्यावरचे नैराश्‍य अगदी सहजपणे दिसत होते.

अंजूने पात्रता निकष पूर्ण केला नसला, तरी तिने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक मात्र पटकाविले. उपस्थितांच्या चेहऱ्यावर मात्र, अंजूला प्रत्यक्ष पाहिल्याचेच समाधान होते. स्पर्धा संपल्यानंतर अंजूचे फोटो काढण्यासाठी फटाफट कॅमेरा "क्‍लिक' होऊ लागले. स्वाक्षरी घेण्यासाठी चाहत्यांचा गराडा पडला. प्रत्येकाची इच्छा होती अंजूबरोबर हस्तांदोलन करण्याची, शुभेच्छा देण्याची आणि आयुष्यभरासाठी अंजूबरोबरच्या सुखद आठवणी जपून ठेवण्याची!

जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदक मिळवून देणाऱ्या अंजू जॉर्जची लोकप्रियता अबाधित असून, ती कामगिरीवर अवलंबून नाही, याचाच प्रत्यय सणस क्रीडांगणावर येत होता.

Tuesday, June 26, 2007

अद्ययावत तंत्रज्ञानाचा "शिवाजी'


सदैव लॅपटॉप जवळ बाळगून असणारा, गरीब व गरजूंना स्वस्तात शिक्षण मिळण्यासाठी परदेशातील भारतीयांकडून "मनी ट्रान्सफर'द्वारे पैसे गोळा करणारा आणि एमएमएस तसेच "स्पायकॅम' हे अद्ययावत तंत्रज्ञान हाताळण्यात पुरता सरावलेला नायक हे रजनीकांतच्या "शिवाजी द बॉस'चे वेगळेपण किंवा वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर मिळालेली नोकरी सोडून पुन्हा भारतात परतलेला शिवाजी (रजनीकांत) हा चित्रपटाचा नायक आहे. तो अनेक वर्षे परदेशात राहिलेला असल्याने अद्ययावत तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले असणे साहजिकच आहे. पण या गोष्टींचा चित्रपटामध्ये योग्य ठिकाणी उपयोग करुन कथानक अधिक रंजक केले आहे.

लॅपटॉपचा पासवर्ड हा एखादा शब्द नव्हे तर विशिष्ट पद्धतीने आवाज काढल्याशिवाय संगणकात "एन्टर'च करता येत नाही, हा तंत्रज्ञानातील पुढारलेपणाचे पहिले उदाहरण. त्याच्या या क्‍लृप्तीमुळेच पोलिस, सीबीआय व संगणक तज्ज्ञांनाही त्याचा पासवर्ड "हॅक' करता येत नाही. अवैध मार्गांनी पैसा जमविणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काळा पैसा जमा करण्याची त्याची कल्पनाही वेगळी आहे. तुमच्याकडे किती काळा पैसा आहे, याची माहिती माझ्याकडे असून त्यापैकी निम्मा पैसा माझ्याकडे जमा करा. अन्यथा आयकर अधिकाऱ्यांकडे जाऊन मी माहित देतो, मग ते तुमचे सगळे पैसे काढून घेतील, ही शिवाजीची कल्पना चांगलीच लागू पडते.

शिवाय मोठ्या प्रमाणावर जमा झालेला काळा पैसा "व्हाईट' करण्याची त्याची शक्‍कलही अफाट आहे. परदेशातील भारतीय नागरिकांकडूनही शिवाजी पैसे जमा करतो, पण "मनी ट्रान्सफर'द्वारेच! जमा झालेला सगळा काळा पैसा तो अंडरवर्ल्डमधील मुस्लिम म्होरक्‍याकडे जमा करतो. त्यानंतर तो म्होरक्‍या अमेरिकेतील त्याच्या एजंटला कॉल करुन माझ्याकडे इतके रुपये जमा आहेत. तितक्‍या रकमेचे डॉलर्स तू अमूक अमूक माणसाच्या नावावर जमा कर, असे सांगतो. काळा पैसा अशा पद्धतीने चलनात येतो की नाही, माहिती नाही. पण असे घडत असल्यास ते अफाटच आहे.

अखेरच्या प्रसंगांमध्येही तंत्रज्ञान कसे कथानकाला उपयुक्त ठरु शकते ते आपण अनुभवतो. शिवाजी तुरुंगामध्ये असताना त्याचे तुरुंगातील काही हस्तक त्याला "एमएमएस' आणि "जीपीआरएस' सुविधा असलेला एक मोबाईल पुरवितात. त्याद्वारे तो साऱ्यांशी संपर्क साधतो. "एमएमएस' पाठवितो. पोलिस चौकीमध्ये शिवाजीच्या हस्तकाने छुपा कॅमेरा बसविलेला असतो. त्यातून पोलिस चौकीत घडणाऱ्या साऱ्या घटना शिवाजीच्या मोबाईलवर येत असतात. कल्पना म्हणून तरी ही नवीनच वाटते. शक्‍याशक्‍यतेच्या कसोटीवर हे असंभव वाटत असले तरी भविष्यात असे होणारच नाही, असा दावा कोणीच करणार नाही.

इतके अद्ययावत तंत्रज्ञान चित्रपटामध्ये असल्याने तो चित्रपट सध्याच्या जमान्यातील आहे, असे फक्त वाटतच नाही. तर नकळतपणे आपली त्याच्याशी नाळ जोडली जाते. वायफळ विनोद आणि फुटकळ कथानकाच्या आधारे झळकणारे मराठी, हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील वैविध्य आणि पुढारलेपण सहज जाणवते. त्यासाठी का होईना शिवाजी एकदा पहाच.

Monday, June 25, 2007

शिवाजीची भेट एकदा तरी घ्या...

हैदराबादला असताना अनेकांच्या हेटाळणीचा विषय होऊनही तेलुगू चित्रपट पाहण्याची सवय लावून घेतली होती. भाषा कळत नसल्यामुळे संवाद समजायचे नाहीत. पण कथानक सहजपणे अवगत व्हायचे. तेलुगू चित्रपटाची कथा खूपच निराळी असते, हे मला चित्रपट पाहिल्यानंतरच समजले. मी रहायचो त्या दिलसुखनगर भागातच आठ-नऊ थिएटर होती, त्यामुळे वारंवार चित्रपट पाहिले जायचे. तेव्हापासूनच मला दाक्षिणात्य चित्रपटांविषयी जिव्हाळा उत्पन्न झाला होता.
हैदराबादहून मुंबईला बदली झाल्यानंतर आणि त्यानंतर पुण्यात आल्यावर तेलुगू चित्रपट पाहणे जवळजवळ बंदच झाले होते. आमचा तमिळ मित्र देविदास देशपांडे याच्या रुमवर गेल्यानंतर कधी तरी एखादा दाक्षिणात्य चित्रपट पाहिला जायचा. पण "शिवाजी - द बॉस' या तमिळ चित्रपटाने पुन्हा एकदा खेचून चित्रपटगृहाकडे नेले.
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा, सावकारी किंवा वतनदारी समूळ नष्ट करण्यासाठीचा संघर्ष, प्रेमकथा या घासून गुळगुळीत झालेल्या विषयांप्रमाणेच कंपनीचा "सीईओ' निवडण्यासाठी "लेडी बॉस'कडून घेतली जाणारी परीक्षा हा "मिसाम्मा' या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा असतो. एका विस्कटलेल्या प्रेमकथेचा पत्रकाराने लावलेला छडा आणि त्यातून उत्पन्न झालेला संघर्ष या कथेवर शिवमणी चित्रपट बेतलेला असतो. डाव्या विचारसरणीच्या प्रचारार्थ निघालेले "लाल सलाम' आणि "विळा कोयता' असे चित्रपटही चांगले "हाऊसफुल्ल' चालतात.
थोडक्‍यात म्हणजे फक्त परदेशात चित्रीकरण आणि भडक कपडे हेच तेलुगू किंवा एकूणच दाक्षिणात्य चित्रपटांचे वैशिष्ट्य नाही. तर कथानक, संवाद, संगीत व चित्रीकरण असेही मुद्देही तितकेच प्रभावशाली असल्यामुळेच चित्रपट भावतात. "टागोर' या चिरंजीवीच्या चित्रपट प्रदर्शनाच्या काळात हैदराबादमध्ये असल्याने त्याच्या लोकप्रियतेचा चुणूक जाणवली होती. आता "शिवाजी-द बॉस' या रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निमित्ताने कलाकाराची लोकप्रियता किती असू शकते, याचा प्रत्यय आला. मी काही रजनीकांतचा "फॅन' नाही. त्यामुळे रजनीकांतच्या प्रेमापायी मी तो चित्रपट पाहिला नाही. पण दाक्षिणात्य चित्रपटांची भव्यदिव्यता, त्याचे कथानक हे निश्‍चितपणे निराळे असते याची जाणीव असल्यामुळेच चित्रपट पाहण्याची हिंमत केली.
गॉगल घालण्याची आणि तो डोळ्यावरुन बाजूला करण्याची लकब, च्युईंगम खाण्याची अजब तऱ्हा, नाणे उडवून खिशात टाकण्याची पद्धत या गोष्टी पाहिल्यानंतर रजनीकांतचा चित्रपट पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते. ती रजनीकांतची स्टाईल आहे. रजनीकांत स्टाईलसाठीच अधिक प्रसिद्ध आहे. चाहते त्याची स्टाईल पाहण्यासाठी चित्रपटाला गर्दी करतात. पण रजनीची स्टाईल आणि संवाद यापेक्षाही चित्रपटाचे कथानक मला अधिक भावले. चित्रपट तमिळ असल्यामुळे तो अतिरंजित असणे हे ओघाने आलेच. पण त्यामुळे चित्रपटाच्या विषयाचे गांभीर्य जराही कमी होत नाही.

सध्या शिक्षण आणि आरोग्य सुविधा इतक्‍या महाग झाल्या असून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना फक्त चांगले शिक्षण आणि आरोग्य या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रजनीकांतचा लढा चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हे सारे बदलून टाकण्यासाठी त्याने उभारलेला संघर्ष आणि प्रस्थापितांकडून त्यामध्ये आणण्यात येणाऱ्या अडचणी हे चित्रपटात दाखविलेले आहे. रजनीकांत नायक असल्याने तो या लढ्यामध्ये यशस्वी होणार आणि प्रस्थापितांची सद्दी संपणार, हे सांगायला नकोच.

मुद्दा असो की, वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठीची धडपड नक्कीच स्तुत्य आहे. रजनीच्या अभिनयापुढे शंकरचे दिग्दर्शन आणि चित्रपटाची कथा मार खाते असा अनुभव आहे. पण हे मत आहे रजनीकांतच्या निस्सीम चाहत्यांचे! माझ्यासारख्या तटस्थपणे चित्रपट पाहणाऱ्या माणसाला रजनीच्या स्टाईलप्रमाणेच चित्रपटाची कथाही तितकीच आकर्षक वाटते. तर चित्रपटातील कथानकाप्रमाणेच रजनी आपला तारणहार आहे, ही सामान्यांची भावना झाल्यामुळेच कदाचित रजनीकांतचे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावतात. सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्‍न चित्रपटामध्ये प्रतिबिंबीत झाल्यामुळेच चित्रपट अतिरंजीत असूनही आवडतो.

अर्थातच, "शिवाजी - द बॉस' पाहण्यासाठी जाताना रजनीकांतचा "लेटेस्ट' चित्रपट हीच गोष्ट ध्यानात ठेवून गेलो होते. डोक्‍याला ताप नाही, याच भूमिकेतून चित्रपट आपण चित्रपट पाहतो. पण संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर रजनीकांत इतकाच चित्रपटाचा विषय आणि मांडणी देखील भावते.

Thursday, June 21, 2007

राष्ट्रपतीपदी कलाम हवे का...?


कौन बनेगा राष्ट्रपती? या प्रश्‍नाने सध्या सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला संयुक्त पुरोगामी आघडीच्या उमेदवार आणि कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्या प्रतिभा पाटील आणि राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणारे बुजुर्ग नेते भैरोसिंह शेखावत यांच्यातच लढत होईल, असे वाटत होते. मात्र, विविध राज्यातील पराभूत नेत्यांनी उभारलेल्या तिसऱ्या आघाडीने या लढतीमध्ये गंमत निर्माण केली आहे. चुरस निर्माण झाली असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. पण किमान या आघाडीमुळे नवी समीकरणे समोर येऊ लागली आहेत.

तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीत विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे, अब्दुल कलाम यांनाच पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्याची गळ घालण्याचे निश्‍चित करण्यात आले. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्याचा इरादा व्यक्त करीत शेखावत आणि पाटील यांच्याऐवजी नवे कलाम यांचे नाव तिसऱ्या आघाडीने समोर आणले. या आघाडीतील समाजवादी पक्ष वगळता इतर सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपदे उपभोगली आहेत. शिवाय समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची उत्तर प्रदेशातील मैत्री हे तर "ओपन सिक्रेट'च आहे. त्यामुळेच तिसरी आघाडी जरी भाजपपासून अंतर राखण्याची भाषा करीत असेल, तरी ते कितपत शक्‍य आहे, यात शंकाच आहे.

कलाम यांचे नाव पुढे आल्यानंतर खुद्द शेखावत यांनीच ""अब्दुल कलाम हे जर उमेदवार असल्यास माझी बिनशर्त माघार आहे,'' असे सांगून आणखी एक बॉंबगोळा टाकला. त्यामुळे कलाम यांच्या नावाला बळकटी मिळण्यास मदत झाली. शिवाय भाजपनेच एक वर्षापूर्वी कलाम यांची इच्छा असेल तर त्यांनाच पुन्हा पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर सारी हयात जनसंघ आणि भाजपमध्ये घालविलेल्या शेखावत यांच्याकडून या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या भूमिकेची अपेक्षाच करता येत नाही. त्यामुळे पाटील, शेखावत की कलाम असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक थेट होणार असती तर कलाम हे निर्विवादपणे निवडून आले असते, यात शंकाच नाही. त्यांच्याइतकी लोकप्रियता इतर दोन्ही नेत्यांना नाही. मात्र, ही निवडणूक आमदार व खासदारांकडून होणार आहे. त्यामुळेच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.या सर्व पार्श्‍वभूमीवर कलाम यांना पुन्हा संधी देणे योग्य आहे किंवा नाही, या संदर्भात चर्चा करणे इष्ट ठरेल. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आणि कर्ते करविते डॉक्‍टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाची मांडणी करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील. त्यांची योग्यता, अभ्यास आणि वैज्ञानिक म्हणून कार्य लक्षात घेतले तर अधिक सांगण्याची गरजच नाही. गेल्या वेळी याच गोष्टी लक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले होते.

अर्थात, राष्ट्रपती हा राजकीय पार्श्‍वभूमी असलेलाच असावा, अशी भूमिका डाव्यांनी घेतली. त्यामुळे कलाम आणि आझाद हिंद सेनेतील सेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल या दोन महान व्यक्तींमध्ये विनाकारण लढत झाली. त्यात कलाम विजयी झाले. डावे वगळता इतर कोणी कलाम यांच्या नावाला आक्षेप घेतला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. डावे तर कलाम यांच्या बाजूने नाहीच पण कॉंग्रेसही प्रतिभा पाटील यांच्या नावावर ठाम आहे. कॉंग्रेसचे सहकारी पक्षही कलाम यांच्या नावाला पाठिंबा देण्यास उत्सुक नाहीत. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेनाही कलाम यांच्यावर नाराज आहे. त्यामुळेच उत्सुकता ताणली गेली आहे.

कलाम हे कोणताही राजशिष्टाचार न बाळगता थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळतात, लहान मुलांच्या प्रश्‍नांना तितक्‍याच आत्मीयतेने उत्तरे देतात, राष्ट्रपती झाल्यानंतरही स्वतःमधील माणूस जागरुक ठेवतात, त्यामुळेच कलाम यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले तेव्हा सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून कलाम स्वतःहून नायडू यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. अशा छोट्या छोट्या घटनांमधून कलाम यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले होते.

मात्र, मोहम्मद अफझल प्रकरणापासून कलाम हे अनेक जणांच्या मनातून उतरले आहेत. संसदेवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अफझलला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही राष्ट्रपती म्हणून कलाम त्याच्यावर सही करत नाहीत, तेव्हा कलाम यांच्या भूमिकेची चीड येते. तुमचे वैयक्तिक मत काहीही असले तरी राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍नी तुम्ही तटस्थपणे भूमिका पार पाडणे अपेक्षित असते. कारणे काहीही असोत, कलाम यांनी अफझलच्या फाशीवर सही न केल्यानेच ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कलाम यांनी वेळीच अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले असते आणि अफझल फासावर लटकला असता तर आज ही परिस्थिती उद्‌भवलीच नसती.

राष्ट्रपती पदावर बिगर राजकीय व्यक्ती नको, या भूमिकेचे डावे पक्ष, कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीतील पक्ष आहेत. राष्ट्रपती आपल्या विचाराचा असावा. त्यामुळे आपल्याला हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा उपयोग करुन घेता येतो, हे राजकीय पक्षांच्या डोक्‍यात पक्के बसल्याने त्यांना बिगरराजकीय व्यक्ती या पदावर नको. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीला गोध्रा दंगलींची पार्श्‍वभूमी होती. भारतात मुस्लिमांना धोका नाही. ते सुरक्षित असून त्यांना सन्मान आहे, हा आणखी एक संदेश कलाम यांच्या निवडीतून देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हेतू होता. तो गेल्या वेळी साध्य झाला.

आता भाजप आणि आघाडी अल्पमतात असून कॉंग्रेस आघाडीचे बहुमत आहे. शिवाय कॉंग्रेसला डाव्यांची हॉंजी-हॉंजी करण्यावाचून गत्यंतरच नाही. त्यामुळेच परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. गेल्या वेळी कलाम यांचा विजय निश्‍चित होता. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कलाम यांनी निवडणूक लढवून पराभूत व्हायची "रिस्क' घ्यायची का? हा पहिला प्रश्‍न आहे. दुसरा प्रश्‍न असा की, अफझलच्या फाशीच्या अर्जावर कलाम यांनी स्वाक्षरी का केली नाही. हा मुद्दाही पुन्हा निवडणूक लढविताना महत्त्वाचा आहे?


अशा घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतीपदी पुन्हा कलाम यांचीच निवड व्हावी, असे आपल्याला वाटते का? कृपया आपले मत येथे नोंदवा...


What is your opinion about Dr. APJ Abdul Kalam's candidature for Presidential post? Should he come into the fray or stay away from it? Issue of Mohammad Afzal's capital punishment is how much important as per your opinion? Please give your opinion on President's Election here...

Saturday, June 16, 2007

रेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड!

पुणे, ता. 15 ः भारतामध्ये "फॉर्म्युला वन' शर्यत झाली तर मला खरोखरच आनंद होईल; पण "एफ वन' शर्यतींचे आयोजन करणे ही सोपी गोष्ट नव्हे. भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करणे हे मोठे आव्हान आहे. त्यात आपण यशस्वी झालो तरच शर्यतींचे आयोजन करणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन भारताचा "फॉर्म्युला वन' ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याने केले.
भारतात दिल्ली येथे "फॉर्म्युला वन' शर्यत होण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने आवश्‍यक करारांची पूर्तता लवकरच करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गुरुवारी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कार्तिकेयन याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने, तसे झाले तर उत्तमच; पण ते अवघड आहे, अशी साधी सरळ प्रतिक्रिया व्यक्त केली.

"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स' आणि "ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने "बाहा एसएई इंडिया 2007' स्पर्धेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन कार्तिकेयन याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता.

"भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे मोठे आव्हान असणार आहे. फक्त "रेसिंग ट्रॅक'ची निर्मिती करणे हेदेखील खूप खर्चिक काम आहे. ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणावर जमीनही आवश्‍यक आहे. बहारिनसारख्या देशात निधीची उपलब्धता ही समस्या नव्हती. मात्र, भारतातही तशीच परिस्थिती असेल, याबद्दल कोणीच खात्री देऊ शकणार नाही. मध्यंतरी चंद्राबाबू नायडू यांनी "एफ वन'साठी सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर तेच सत्तेवरून दूर झाले व "एफ वन'चा बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. भारतात अजूनही क्रीडा क्षेत्रासाठी इतकी गुंतवणूक हवीच का, असे विचारणारे आहेत. तेव्हा "एफ वन' शर्यत भारतात होण्यात प्रचंड गुंतागुंत आहे,'' असे कार्तिकेयनने सांगितले.

भारत आता खऱ्या अर्थाने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान येत आहे. केवळ जगभरातच नव्हे तर भारतातही "एफ वन' शर्यतींची लोकप्रियता वाढते आहे. शिवाय बहारिनप्रमाणेच मलेशिया आणि भारताचा शेजारी चीन येथेही "फॉर्म्युला वन'चा ट्रॅक उपलब्ध आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतात ट्रॅक का नको, असा सवाल त्याने उपस्थित केला.

कार्तिकेयन सध्या "विल्यम्स'चा टेस्ट ड्रायव्हर असून 2009 मध्ये भारतात शर्यत झालीच तर भारतातील ट्रॅकवर "ड्राईव्ह' करण्यास मला निश्‍चित आवडेल, असे सांगून तो म्हणाला, ""तोपर्यंत माझे वय 32 वर्षे झालेले असेल. त्या वेळीही वय माझ्या बाजूने असेल आणि मी शर्यतीत सहभागी होण्यास निश्‍चितच पात्र असेन. त्यामुळे मी आता योग्य संधीची वाट पाहत आहे.


भारतात प्रथमच "बाहा एसएई' स्पर्धा

अमेरिकेच्या धर्तीवर भारतात प्रथमच "बाहा एसएई इंडिया 2007' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा 21 ते 23 डिसेंबरदरम्यान इंदूरजवळील पीथमपूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन भारताचा "फॉर्म्युला वन' रेसर कार्तिकेयन याच्या हस्ते आज झाले.

"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ने (एसएई) स्पर्धेचे आयोजन केले असून, या स्पर्धेत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिकौशल्याचा कस लागणार आहे. कमी किमतीमध्ये व कोणत्याही भूप्रदेशात, कितीही खडतर भूपृष्ठावर टिकाव धरू शकेल, असे वाहन सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विकसित करावयाचे आहे. त्यासाठी सहभागी संघांना दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार असून, कमीत कमी पैसे खर्च करणाऱ्या संघाला अधिक गुण दिले जाणार आहेत.


कार्तिकेयनचे अभियंत्यांना आवाहन

कार्यशाळेचे उद्‌घाटन केल्यानंतर नरेन कार्तिकेयन याने "एफ वन'च्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि काही किस्से ऐकविले. ""पूर्वी "एफ वन' शर्यतींमध्ये युरोप आणि अमेरिका खंडातील व्यक्तींचा अधिक भरणा होता. आशियाई नावे शोधूनही सापडायची नाहीत. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. केवळ ड्रायव्हर्स नव्हे, तर अभियंते आणि इतर तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात आशियाई आहेत. काही भारतीयही "एफ वन'मध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. ही गोष्ट बदलती परिस्थिती दर्शविणारी आहे,'' असे तो म्हणाला.

कार्तिकेयनने काही अभियंत्यांना बरोबर घेऊन एक गट स्थापन केला आहे. हा गट "एफ वन' शर्यतींवर कार्यरत आहे. "ज्या "ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे,' असे आवाहन त्याने केल्यानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

देशभरातील 52 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी संगणकावर नोंदणी केली होती. त्यातून एकूण 27 संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. "एसएई इंडिया'चे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका, "एसएई इंडिया'चे उपाध्यक्ष श्रीकांत मराठे, "जे. के. टायर्स'चे मोटर स्पोर्टस विभागप्रमुख संजय शर्मा, "फोर्ड इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मॅथ्यू आदींचीही या वेळी भाषणे झाली.

बास्केटबॉलची ओढ पाहून वॉल्श भारावले

महाराष्ट्राच्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण


अमेरिकेच्या तुलनेत भारतातील नवोदित बास्केटबॉलपटूंचे कौशल्य आणि वेग कमी असेल; परंतु खेळाच्या ओढीमुळे ते तब्बल वीस-वीस तास प्रवास करून येथे आले आहेत, ही गोष्टच भारावून टाकणारी आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आणि प्रशिक्षक जे. डी. वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉलपटूंचे कौतुक केले.

महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 80 हून अधिक खेळाडू आणि 35 प्रशिक्षक उपस्थित आहेत. अमेरिका, इटली, चीन, इस्राईल येथे वॉल्श यांनी बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या खेळाडूंना पाच दिवस प्रशिक्षण देण्यास पुण्यात आलेले वॉल्श एकही रुपया मानधन म्हणून घेणार नाहीत. अपूर्व सोनटक्के याच्या प्रेमापोटीच आपण येथे आलो, असल्याचे वॉल्श यांनी आवर्जून सांगितले.

बॉस्केटबॉलपटूंची उंची किती व वजन किती आहे, यापेक्षाही खेळाडूंचे "बॉल हॅंडलिंग' कसे आहे, चेंडू "बास्केट' करण्याची पद्धत कशी आहे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. थोडेसे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले तर कमी उंचीचे खेळाडू घेऊनही सामने जिंकता येतात. त्यामुळेच येथे उंचीपेक्षा विविध कौशल्ये अधिक उपयुक्त आहेत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी बास्केटबॉलची मूलभूत कौशल्ये अंगी बाणवली पाहिजेत. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे वॉल्श यांनी स्पष्ट केले.

खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण ठेवणे, पास देणे, चेंडू जाळीत टाकणे आदी मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षकांना संघनिवड कशी करावी, खेळाडू कसे बदली करावेत, खेळापूर्वी व सामना सुरू झाल्यानंतर रणनीती कशी आखावी, आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातील प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर काश्‍मीरमधील अनाथ मुलांना बास्केटबॉलची तोंडओळख करून देण्यासाठी वॉल्श हे जम्मू-काश्‍मीर येथे जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईच्या झोपडपट्टीमधील मुलांनादेखील बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्याची इच्छा वॉल्श यांनी व्यक्त केली.


दहाव्या मिनिटाला पाणी...

जेम्स डेव्हिड वॉल्श यांनी शिबिरासाठी आलेल्या खेळाडूंचा सराव घेण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या टप्प्यात खेळाडूंचे "वॉर्मअप' सुरू होते. त्या वेळी वॉल्श पाचव्याच मिनिटाला खेळाडूंचा घाम काढला. त्यानंतर आठव्या मिनिटानंतरच खेळाडूंचा "स्टॅमिना' संपला आणि त्यांनी पाण्याच्या बाटल्या मागण्यास सुरवात केली. दहाव्या मिनिटाला पाणी मागितल्यामुळे वॉल्श यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. चाळीस मिनिटांच्या खेळासाठी किमान 80 मिनिटे सलग खेळण्याची तयारी ठेवावी लागते, असे सांगत वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना "स्टॅमिना' वाढविण्याचा सल्ला दिला.

Friday, June 15, 2007

निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत




साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे सध्याचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत गेले पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते. तेच निष्ठावंत शेखावत आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरत आहेत.

भैरौसिंहांना निवडणूक लढवावी लागणार आहे, ती त्यांच्याच राजस्थानच्या राज्यपाल असलेल्या प्रतिभा पाटील-शेखावत यांच्याशी! शेखावत यांच्याप्रमाणेच प्रतिभा पाटील यांचा गौरवही निष्ठावंत म्हणूनच करावा लागेल. त्या देखील साधारणपणे 1962 पासून विधीमंडळात आहेत आणि अनेकदा डावलल्यानंतरही त्यांनी कॉंग्रेसवरची निष्ठा कदापिही ढळू दिलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही लढत दोन निष्ठावंतांमधील ठरले.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रतिभा पाटील या 1962 मध्ये जळगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषविली. आमदार असतानाच त्या एल. एल. बी. बनल्या आणि विवाहित झाल्या. देवीसिंह शेखावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जळगावनंतर त्यांनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.

प्रतिभा पाटील यांनी 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत शरद पवार "पुलोद'चे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले. कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन 1980 मध्ये प्रतिभा पाटील यांना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

अखेर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. तेथे त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली. 1986 ते 88 या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 1991 साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती होती. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली गेली. इतकी वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रतिभा पाटील यांनी ठेवलेली बांधिलकीच त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविण्यात निर्णायक ठरली.

हल्ली राजकारणाचा धंदा झाला असून पैसा व गुंड प्रवृत्तींच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, हा सर्वांचाच अनुभव बनला आहे. त्यामुळे "पैसा फेको आणि तमाशा देखो'च्या धर्तीवर राजकारणही खालच्या पातळीवर पोचले आहे. निष्ठावंतांनी आणि कार्यकर्त्यांनी काय कायम सतरंज्याच घालायच्या का? असा प्रश्‍न विचारायलाही निष्ठावंत व कार्यकर्ते शिल्लक नाहीत. त्यामुळे एकाच पक्षावर निष्ठा ठेवण्याचे दिवस संपले, असे सांगत फुशारकी मिरविणाऱ्यांना सध्या सगळ्याच पक्षात चांगले दिवस आहेत.

अगदी सुरवातीच्या काळात जनसंघाने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. ते सारे उमेदवार जोरदार आपटले. त्या दिवशी संध्याकाळी एका पत्रकाराने अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना गाठून प्रश्‍न विचारला, ""आता पुढे काय?'' त्यावर अडवाणी उत्तरले, ""पराभवाचा शीण घालविण्यासाठी आम्ही दोघांनी आज एक चित्रपट पाहिला. त्याचे नाव "फिर सुबह होगी'. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आमच्या पक्षासाठीही "फिर सुबह होगी' आणि लवकरच पक्ष पुन्हा उभा राहिल. आम्ही पराभूत झालो असलो तरी आमच्या निष्ठा अजूनही कायम आहेत. आम्ही निवडणूक हरलो आहोत. आमची लढाई सुरुच राहिल.''

याच निष्ठावंत अडवाणी आणि वाजपेयी यांनी जनता पक्षाच्या कारकिर्दीत संघ विचारांची कास धरताना राजसत्तेला रामराम ठोकला होता, हे सर्वज्ञात आहेच. पण सोळा वर्षांनी का होईना ही मंडळी पुन्हा एकदा राजसिंहासनावर विराजमान झाली होती. त्यामुळे विचारांवर आणि पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाग्योदय निश्‍चित असतो. मग तो आज होईल किंवा उद्या!

अर्थात, "इझी मनी' आणि "फास्ट फूड'च्या आजच्या जमान्यात प्रत्येकाला सारे काही इस्टंट हवे आहे. तपश्‍चर्या करण्याची किंवा परीक्षा देण्याची फारशी कोणाची तयारी नसते. इतर क्षेत्रांच्या तुलनेत राजकारणात ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच राजकारणात "चमकोगिरी' करुन नगरसेवक वा आमदार होणाऱ्या मंडळींचा परीघ फारसा विस्तारत नाही. त्या तुलनेत अभ्यासू आणि निष्ठावंतांना अधिक संधी मिळते. हल्लीच्या बाजारू राजकारणात निष्ठावंतांना पाय पुसण्याची जागा दाखविणाऱ्या पक्षांनी गरज म्हणून का होईना पण निष्ठावंतांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले आहे. ही बाब मृगजळासारखी वाटत असली तरी नक्कीच दिलासादायक आहे.

Thursday, June 14, 2007

प्रतिसाद, पाहुणचार आणि प्रेमाचा वर्षाव...


आसाममध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वार्तांकनासाठी जाताना मनात अनेक प्रश्‍न होते. तेथे वातावरण कसे असेल, किती सुरक्षा असेल, स्पर्धेत काही गोंधळ तर होणार नाही ना, नागरिकांचा किती प्रतिसाद मिळेल, खेळाडू आणि संघांचा (विशेषतः हिंदीभाषक) बहिष्कार तर असणार नाही ना, तेथील लोक आपल्याशी कसे "रिऍक्‍ट' होतील... अशा असंख्य प्रश्‍नांनी मनात हलकल्लोळ माजविला होता; पण गुवाहाटीमध्ये इतके चांगले अनुभव आले, की विचारता सोय नाही. त्यांपैकी काही अनुभव येथे देत आहे...


बालासाहाब कैसे है...

मी महाराष्ट्रातून आला असल्याचे समजल्यावर "ट्रान्स्पोर्ट कमिटी'चे अध्यक्ष पोलॉक महंत यांनी विचारले, की "अरे, तुमचे ते बाळासाहेब आता कसे आहेत?' मला कळेचना याला एकदम बाळासाहेब ठाकरेंची आठवण कशी झाली. तेव्हा त्याने सांगितले, ""मी तिसरी-चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेलो होतो. तेव्हा दादरच्या गर्दीमध्ये मी हरवलो. मला काहीच कळत नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माझी चौकशी केली आणि एका कार्यकर्त्याच्या घरी नेले. तेथे त्यांनी माझी विचारपूस केली. परिसरात हिंडून माझ्या आई-वडिलांना शोधून आणले आणि मला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबंध आहेत.''


स्टेडियम तरी पाहू दे...

जलतरणाचे सर्व सामने संपलेले, तरीही गर्दी हटत नव्हती. हळूहळू लोक बॉक्‍सिंग रिंगकडे वळू लागले, तरीही 80 वर्षांच्या एक आजीबाई जलतरण तलावाकडे जात होत्या. तेव्हा जलतरणाच्या सर्व स्पर्धा संपल्या आहेत. तिथे काहीही पाहायला मिळणार नाही, असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तेव्हा आजीबाईंनी दिलेले उत्तर स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सर्व काही सांगून जाते. आजी म्हणाल्या, ""अरे बाबा, आजची स्पर्धा संपली असली तरी हे स्टेडियम आतून कसे आहे, ते पाहण्यासाठी तरी मला जाऊ देशील की नाही? इतके दिवस टीव्हीवर मी हे पाहायचे. आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी आले आहे, तर तू मला नाही म्हणतोस...''


आप तो मीडिया से है...

आसाममध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला उल्फाचा प्रश्‍न; तसेच स्पर्धा उधळून लावण्याची उल्फाने दिलेली धमकी या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक असणार यात शंकाच नव्हती; पण ती किती कडक असेल याची कल्पना येत नव्हती; पण मीडियासाठी आवश्‍यक ओळखपत्र तयार झाल्यानंतर कोणत्याही स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी एकाही सुरक्षा रक्षकाने अंगाला हातही लावलेला नाही. लॅपटॉपची बॅग किंवा सॅकमध्ये काय आहे ते दाखवा, असा सवालही केलेला नाही. ""आप तो मीडिया से है। आप से क्‍या खतरा होगा,'' असे उद्‌गार सुरक्षा रक्षकाने काढले. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला तोंड देता देता नाकी नऊ येतील, असे वाटत असतानाच हा अनुभव सुखद धक्काच देऊन गेला.


प्रथमच प्रत्यक्ष दर्शन

ऍथलेटिक्‍स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती आणि फार फार तर व्हॉलिबॉल किंवा कबड्डी या खेळांना नागरिक गर्दी करतील, असे वाटत होते; पण बॉक्‍सिंग, लॉन बॉल, सेपाकताकरॉ, सायकलिंग, टेबल टेनस यांच्यासह जवळपास सर्वच खेळांना नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. नागरिकांना खेळांविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे होते. सरकारने बांधलेली स्टेडियम्स पाहायची होती. खेळाडू कसे खेळतात, हे बघायचे होते. याबाबत टिंकू कुंभकर या स्थानिक तरुणाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया फारच बोलकी वाटते. टिंकू म्हणतो, ""इतके वर्षे आम्ही हे खेळ टीव्हीवर पाहतच होतो; पण हे सारे खेळ मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी व्हायचे. आज प्रत्यक्ष आमच्या शहरात, आमच्या राज्यात स्पर्धा होत आहेत. इतकी चांगली संधी आम्ही कशी घालवू. त्यामुळेच नागरिकांची गर्दी होत आहे. तुम्हाला ते आश्‍चर्यकारक वाटत असले, तरी आम्हाला ते अपेक्षितच होते.''


ये तो घर का काम है...

आसाममध्ये प्रथमच स्पर्धा होत असल्याने; तसेच ईशान्य भारत थोडासा बाजूला असल्याने अनेक जण आसाममध्ये प्रथमच आले आहेत. इतक्‍या मोठ्या संख्येने नागरिक गुवाहाटीमध्ये आल्याचेच त्यांना अधिक अप्रूप होते. पाहुण्यांची कशी काळजी घ्यावी आणि कशी सरबराई करावी, यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. पत्रकार उतरलेल्या हॉटेलमध्ये माहिती देण्यासाठी "मीडिया हेल्प डेस्क' तयार करण्यात आला होता. तेथील राजेंद्र नावाच्या "व्हॉलेंटियर'ला विचारले, की तू रात्रीपर्यंत इतके काम करतोस. तुला किती पैसे मिळतात? तेव्हा राजेंद्र म्हणाला, ""सर, मैं व्हॉलेंटियर हूँ! मै पैसे क्‍यू लूँगा! अगर वो देंगे तो ठीक है, अगर नही देंगे तो बुरा क्‍या है? ये हमारे घर के "खेला' है! घर के काम के लिए कोई पैसा लेता है?''


चितळेंच्या बाकरवडीची आठवण

"ब्रह्मपुत्रा वॉटर वर्क्‍स'मध्ये अभियंता पदावर काम करणाऱ्या पंजाब शर्मांची भेट झाली. शर्मा हे पुण्यातील "सीडब्ल्यूपीआरएस'मध्ये दीड वर्ष कामाला होते. पुण्यात असताना सहकाऱ्यांकडून मिळालेली वागणूक आणि पुणेकरांचे प्रेम यामुळे पुणे अजूनही माझ्या हृदयात आहे, असे श्री. शर्मा यांनी सांगितले. ""पुण्यात मिळणारी चितळेंची बाकरवडी, डेक्कनवर मिळणारी पूना कॉफी हाऊसची कॉफी, कॅम्पातील इराण्याच्या हॉटेलमधील सामोसा या गोष्टी मी अजूनही विसरलेलो नाही.'' मराठी माणसे खूप चांगली आहेत, हे वाक्‍य मराठीमध्ये बोलून त्यांनी आम्हाला भलतेच खूष केले. शर्मा यांच्याप्रमाणेच पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रात शिक्षणासाठी आलेले किंवा एखादा नातेवाईक महाराष्ट्रात शिकला असलेले अनेक जण तेथे भेटले.


वो हमारा शिवाजी है...

गुवाहाटीमध्ये एक अश्‍वारूढ पुतळा आहे. हा पुतळा कुणाचा असे बोटीपोन मालाकार या "व्हॉलेंटियर'ला विचारल्यावर त्याने लाचित बडफुकन, असे सांगून प्रतिप्रश्‍न केला. तुम्हाला लाचित बडफुकन माहिती आहे का? मुघलांना आसाम आणि पर्यायाने ईशान्य भारतात प्रवेश करण्यापासून रोखणारा योद्धा म्हणजे लाचित बडफुकन, असे सांगितल्यावर मालाकार इतका भारावून गेला, की त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, ""व्वा! आपने तो दिल खूष कर दिया.'' बडफुकन यांच्याबद्दल आसामबाहेरच्या फार कमी लोकांना माहिती असते. तुम्हाला आमच्या हिरोबद्दल माहिती आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. बडफुकन हा आमचा "शिवाजी' आहे, असे सांगून मालाकारने धक्काच दिला; कारण त्याला महाराष्ट्रात मुघलांविरुद्ध लढणारे शिवाजी महाराज हे नाव माहिती होते.


घुसखोरांच्या गावात...

आसाममध्ये अनेक बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी सुरू असते. तेथे अनेक जणांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत, त्यांची नावे मतदार यादीमध्ये देखील आहेत, असे वाचले व ऐकले होते. आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचे गाव पाहण्याची आणि तेथील नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून ते कुटुंब पाच वर्षांपूर्वी गुवाहाटीपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या एका लहानशा खेड्यात आले होते. अशी जवळपास 110 कुटुंबे त्या गावामध्ये होती. प्रत्येक कुटुंबामध्ये किमान सात ते आठ जण! अशी अनेक गावे ब्रह्मपुत्रेच्या किनारी वसली असल्याचे समजले आणि भयानक वास्तवाचा अनुभव आला. स्थानिक आमदारानेच त्या नागरिकांना शिधापत्रिका दिल्या, घरे बांधून दिली, भाजी मंडई व सडका निर्माण केल्या, काही नागरिकांना जमिनीही मिळाल्या, हे ऐकून धक्का बसलाच; पण त्यापेक्षाही अधिक चीड आली.


आशिष चांदोरकर

"उल्फा' अतिरेक्‍याबरोबर दहा तास...

आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 8 ः संपूर्ण आसाम ज्या संघटनेच्या हिंसाचारामुळे होरपळून निघाला आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरील बहिष्कार मागे घ्यावा म्हणून खुद्द आसाम सरकारनेच ज्या संघटनेला दहा कोटी रुपयांची "ऑफर' दिल्याची चर्चा आहे, त्या "उल्फा' या अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्‍यासह तब्बल दहा तास प्रवास करण्याची वेळ आल्याने गुवाहाटीला पोचण्यापूर्वीच "उल्फा"च्या दहशतीची धग अनुभवायला मिळाली. ती देखील वातानुकूलित डब्यामध्ये!
गुवाहाटीला जाण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी सरायघाट एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीमधून प्रवास करीत होता. त्याच बोगीमध्ये दाढी आणि केस वाढलेली एक व्यक्ती; तसेच बारा ते पंधरा बंदूकधारी पोलिसांचा ताफा चढला. एखादा चोर किंवा दरोडेखोर असावा, अशी शक्‍यता सर्वांनाच वाटत होती. मात्र, पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये ज्या व्यक्तीला नेण्यात येत होते, तो "उल्फा'चा अतिरेकी असल्याचे समजले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बोगी वातानुकूलित असूनही सर्वांनाचा घाम फुटण्याची वेळ आली होती.
संबंधित अतिरेक्‍याला कोलकता येथे पकडले होते व त्याला न्यू जलपायगुडी येथे न्यायालयीन कारवाईसाठी नेण्यात येत होते. सामान्य डब्यामधून नेले तर हा कोण आहे, त्याला का पकडले आहे, कोठे नेण्यात येणार आहे, असे असंख्य प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत ही माहिती पोचू नये, म्हणून त्याला वातानुकूलित बोगीमधून नेण्यात येत असल्याचे अतिरेक्‍याबरोबरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचे नाव सांगण्यास मात्र, अधिकाऱ्याने स्पष्टपणे नकार दिला.
वातानुकूलित बोगीच्या दोन्ही बाजूला दारांमध्ये बंदूकधारी पोलिस आणि दोन बोगींमधील जागेमध्येही पोलिस असल्याने बोगीला पोलिसांच्या गाडीचेच स्वरूप आल्यासारखे वाटत होते. अतिरेक्‍याला नैसर्गिक विधीसाठी नेण्यात आले, तेव्हाही पोलिसांनी आधी आत जाऊन सर्व काही ठीक असल्याची खात्री केली. त्यानंतरच त्याला आत पाठविण्यात आले. दोन मिनिटांचाही कालावधी झाला नसेल; पण तो आतच असल्याची खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांची दारावर टकटक सुरू होती; पण पोलिसांच्या सुदैवाने काहीही विपरीत घडले नाही.
पोलिसांनी सांगूनही विचारणा करूनही उल्फाच्या त्या अतिरेक्‍याने अन्नाला स्पर्श केला नाही. तो फारसा कोणाशी बोलतही नव्हता. पोलिसच त्याची विचारपूस करीत होते. त्यांनाही तो जेवढ्यास तेवढे उत्तर देत होता. अखेरीस रात्री दोननंतर न्यूजलपायगुडी स्थानक आले आणि अतिरेक्‍यासह पोलिसांचा बंदोबस्त बोगीतून खाली उतरला. त्यानंतरचा प्रवास अगदी निर्धास्तपणे झोपून झाला. गुवाहाटीमध्ये आल्यानंतरही उल्फाच्या अतिरेकी कारवायांची धग किती असू शकते, याचा अंदाज पोलिस बंदोबस्तावरून येत होता. मात्र, रेल्वेच्या बोगीमध्ये आलेला अनुभव त्यापेक्षाही बोलका होता.

बांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 17 ः पानांमध्ये शिजवलेला भात, खास त्या भातासाठी बनविलेली "काली डाल', वांग्याचं भरीत आणि बांबूचं लोणचं, जोडीला बदकाचं सुकं मटण, रोहू माशाचे कालवण... इतकंच नाही तर जेवण झाल्यानंतर मातीच्या वाडग्यात लावलेलं गोड दही आणि त्यात गुलाबजामसदृश फिकट तपकिरी रंगाचा "आसामी रोशोगुल्ला'... आसाममधील या अस्सल ग्रामीण जेवणाची प्रथमच चव चाखायला मिळाली. तीदेखील ब्रह्मपुत्रा नदीवर तंरगणाऱ्या "अल्फ्रेस्को क्रूझ'वर!!!

आसाम पर्यटन महामंडळाने खास पत्रकारांसाठी "गुवाहाटी दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आसामचे वैशिष्ट्य असलेली कामाख्या देवी, संपूर्ण गुवाहाटीचे दर्शन ज्या डोंगरावरून होते त्या डोंगरावर वसलेली भुवनेश्‍वरी माता, आसामची ओळख करून देणारे वस्तू संग्रहालय, ईशान्य भारतातील हस्तकला कृतींचे प्रदर्शन आणि अखेरीस महाकाय जहाजावर फक्कड आसामी जेवण असा बेत पर्यटन महामंडळाने आखला होता.

"क्रूझ' हे ब्रह्मपुत्रेच्या महाकाय पात्रातून पाणी कापत चाललेले असले तरी आपण विशाल सागरातूनच चाललो आहोत, असा अनुभव आपल्याला येतो. जहाजाच्या डेकवर थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत होत असलेला प्रवास स्वप्नवत वाटतो. अर्थात, आसामी नागरिकांना याचे विशेष काही वाटत नाही. ब्रह्मपुत्रेवरील प्रवास ही त्यांची सवय असते. कारण गुवाहाटी शहराच्या मध्यभागातून ब्रह्मपुत्रा वाहते. गुवाहाटी शहरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे जाताना बोटींचाच वापर होते. ब्रह्मपुत्रेवर गुवाहाटी शहराबाहेर एकच पूल आहे. खालून रेल्वे आणि वरून रस्ता अशा पद्धतीने हा पूल बांधण्यात आला आहे. तो पूलही आपल्याला "क्रूझ'वरून दूरवर दिसतो.

कामाख्या देवी, ब्रह्मपुत्रेतून "क्रूझ' प्रवास, काझीरंगा आणि इतर अभयारण्यांची सफारी, उत्तर आसाममधील चहाचे मळे आणि चहा उद्योग तसेच दिग्बोई व दिब्रूगड येथील तेल उद्योग ही आसामची ठेव असून, त्या आधारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आसाम पर्यटन महामंडळाचे दिलीप बरुआ यांनी सांगितले. आसाममध्ये येणारे बहुसंख्य पर्यटक हे पश्‍चिम बंगालमधीलच असतात. उर्वरित भारतातील राज्यांच्या तुलनेत गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यातूनही अनेक सहली आसाम दर्शनासाठी येत असतात. पर्यटन कंपन्याही हळूहळू "आसाम दर्शन'ची पॅकेज करू लागल्या आहेत, असे श्री. बरुआ यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात आसाममध्ये चार लाखांहून अधिक पर्यटक येतात. त्यापैकी 25 हजारांपेक्षा अधिक हे परदेशी पर्यटक असल्याचे सांगून श्री. बरुआ म्हणाले की, ""आसाममध्ये उल्फामुळे कायम हिंसाचार असतो, असे चित्र देशभर निर्माण झालेले असले तरी दर वर्षी पर्यटकांची संख्या पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढतच आहे. त्यामुळे आसामबाबतचा गैरप्रचार कमी झाल्यास ही संख्या आणखी वाढेल. देशभरातील नागरिकांनी निर्धास्तपणे आसाममध्ये सहलीसाठी यावे, असे माझे आवाहन आहे.''

बंगाली वाघांना "साहेबाचे' मार्गदर्शन!


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 10 ः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि युरोपामध्ये रग्बीचा खेळ प्रचंड लोकप्रिय असला तरी भारतामध्ये रग्बी अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे; पण भारतातही अनेक राज्य आणि खेळाडू चांगला खेळ करीत असून, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगले मार्गदर्शन व "एक्‍स्पोजर' मिळाले, तर भारताकडेही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची क्षमता निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया इंग्लंडमधील माजी रग्बीपटू पॉल वॉल्श यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ब्रिटिश उच्चायुक्तालयाचे माजी अधिकारी असलेल्या वॉल्श यांनी इंग्लंडमधील "क्‍लॉड' या कौंटीकडून रग्बी सामने खेळलेले आहेत. बंगालच्या रग्बी संघाचे तांत्रिक सहायक म्हणून ते स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते कोलकता येथे आहेत. कोलकतामधील शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सर्वांमध्येच रग्बी लोकप्रिय आहे; तसेच तेथील रग्बीच्या स्पर्धांना तुडुंब प्रतिसाद मिळतो. रग्बीला मिळणारा पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आणि बंगालच्या संघाबरोबर जोडला गेलो, अशी प्रतिक्रिया वॉल्श यांनी व्यक्त केली. भारतामध्ये बंगालप्रमाणेच महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्ली हे संघही तुल्यबळ असल्याचे सांगून वॉल्श पुढे म्हणाले, की जागतिक स्तरावर जाण्यासाठी भारताला अजूनही बरेच काही साध्य करायचे आहे. जागतिक स्तरावर रग्बी हा खेळ पंधरा खेळाडूंसह आणि सात खेळाडूंसह अशा दोन प्रकारे खेळला जातो. पहिल्या प्रकारात कौशल्य आणि दम महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या प्रकारात वेगवान हालचाली आणि विविध फॉर्मेशन यांच्यावर विजय अवलंबून आहे. दोन्ही ठिकाणी भारताला चांगली संधी मिळू शकते. प्रशांत महासागरातील सॅमोव्हा या वीस लाख लोकसंख्या असलेल्या देशाने बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करून "सेव्हन ए साईड' जागतिक रग्बी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. मग भारताला काय अशक्‍य आहे.'' ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्‍सनंतर रग्बीच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. भारतातही जर अशाच पद्धतीने प्रतिसाद मिळाला तर काहीही अवघड नाही, असे वॉल्श यांनी नमूद केले. 2010 मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रग्बीचा समावेश करण्यात आला असून, त्या स्पर्धेत सर्वोत्तम संघ निवडता यावा, यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रग्बीचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील विविध संघ हा खेळ हळूहळू आत्मसात करीत असून, पोलिस आणि सेनादलाचे विविध संघ यांनी यामध्ये बऱ्यापैकी कौशल्य प्राप्त केल्याची माहितीही या वेळी समजली.

खऱ्या अर्थानं भारतात आल्यासारखं वाटतंय...

भारताच्या क्रीडा जगतातील नवजात अर्भक

आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 11 ः "आज खऱ्या अर्थानं भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झाल्यासारखं वाटतं आहे...'' ही प्रतिक्रिया आहे प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि अधिकाऱ्यांची!
नागालॅंडहून वार्तांकनासाठी आलेल्या वार्ताहरांचाही काहीसा असाच सूर जाणवतो आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी नागालॅंडला "आयओए'चे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्यामुळेच यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नागालॅंडचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरतो आहे.
तायक्वांदो, वुशू, मुष्टियुद्ध, कुस्ती, सेपाकताक्रो (व्हॉलीबॉल व फुटबॉल यांचा संगम असलेला खेळ), तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, बॅंडमिंटन आणि वेटलिफ्टिंग अशा एकूण नऊ खेळांमध्ये नागालॅंडचे खेळाडू सहभागी होत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास मिळाल्यामुळे नागालॅंडचे खेळाडू आणि पदाधिकारी भलतेच उत्साहात आहेत. कुस्तीचे सामने असलेल्या तरुण राम फुकन स्टेडियमवर नागालॅंडच्या संघाची भेट झाली.
तेव्हा नागालॅंड ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष के. केडित्सू म्हणाले, ""कोणत्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करू हेच समजत नाही. आता आम्ही भारताच्या क्रीडा जगतातील नवजात अर्भक आहोत. त्यामुळे सध्या तरी आम्ही खूप खूष आहोत. केवळ पदकांचेच नव्हे, तर सुवर्णपदकाचे खाते उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे. इतकी वर्षं आम्ही खेळत होतो; पण राष्ट्रीय पातळीवर कोणीही आमची दखल घेत नव्हते. ही अडचण आता दूर होईल.''
"यापूर्वी सात वेळा मी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेले आहे. पण इथला अनुभव खूपच निराळा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे आमच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी आम्हाला मिळेल,'' अशी प्रतिक्रिया कुस्तीच्या 72 किलो गटात सहभागी झालेल्या वेलाखोलू हिने व्यक्त केली.
नागालॅंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या "ईस्टर्न मिरर' या दैनिकाचा क्रीडा वार्ताहर कल्लोक डे वार्तांकनासाठी आला आहे. तो स्वतःही खेळाडू आहे. ""नागालॅंडच्या खेळाडूंना निसर्गाची देणगी असते. जेथे जेथे शरीराचा कस लागतो, तेथे नागा खेळाडू नेहमीच वरचढ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकी वर्षं आम्हाला प्रसिद्धी, संधी आणि प्रशिक्षणाची कमतरता भासायची. पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ही कसर भरून निघाली आहे. यापूर्वीच्या पिढ्यांना जे मिळाले नाही, ते सध्याच्या खेळाडूंना मिळत आहे. त्याचा नक्कीच उपयोग होईल,'' असे डे याला वाटते.

पदक विजेत्या खेळाडूंसाठी सरकार काय करणार?


सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख ?


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 11 ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करून पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यासाठी राज्य सरकारने अधिक रकमेची पारितोषिके जाहीर करावीत, अशी इच्छा स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

"यजमान आसामसह, हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ आणि कर्नाटकसह इतर अनेक राज्यांनी पदक विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस रकमेची पारितोषिके जाहीर केली आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबत अजूनही काही घोषणा केलेली नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारकडून पारितोषिक आवश्‍यक असून, ते वेळेवर दिले जावे इतकीच खेळाडूंची अपेक्षा आहे, अशी मागणी हिंदकेसरी योगेश दोडके याने या वेळी केली.

यजमान आसामने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला तीन लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूला दोन लाख, तर ब्रॉंझपदक विजेत्या खेळाडूला एक लाख रुपयांचे पारितोषक जाहीर केले आहे. आसामप्रमाणेच उत्तर प्रदेशनेही तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे, तर पंजाब आणि हरियानाने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस एक लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस 51 हजार आणि ब्रॉंझपदक विजेत्या खेळाडूस 31 हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात यावीत, अशी खेळाडूंची मागणी आहे.

द्रोणाचार्य पारितोषिक विजेते कुस्ती प्रशिक्षक महासिंग यांनी याबाबत वेगळा तोगडा सुचविला. ते म्हणाले, ""यजमान राज्य किंवा सर्वाधिक रकमेचे पारितोषिक जाहीर करणाऱ्या राज्याइतकेच पारितोषिक इतर राज्यांनीही द्यावे; अथवा प्रत्येक राज्याने किती पारितोषिक द्यावे यासंदर्भात एकमताने निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे. जेणे करून इतर राज्यांकडून स्पर्धेत सहभागी होण्याच्या खेळाडूंच्या सवयीला आळा बसेल.''

"पदक विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्याबाबत मंगळवारी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी जलसंपदामंत्री अजित पवार आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक होणार असून, त्यात राज्याकडून अधिकाधिक रकमेचे पारितोषिक जाहीर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या वतीने काही रक्कम पारितोषिकांसाठी देता येईल का, याबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे,'' असे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.

खेळाडूंनी पारितोषिकांची चिंता करू नये. सरकार व ऑलिंपिक संघटना त्यांना नाखूष करणार नाही. मंगळवारी त्यांना चांगली बातमी समजेल, असेही श्री. लांडगे यांनी नमूद केले.