Wednesday, June 17, 2009

आई...

"ती' माझ्या रक्तातच आहे...

आठ मे 2009. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी. माझ्या आईचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ती आजारी होती. पण तरीही तिची जगण्यासाठीची झुंज सुरु होती. पण आठ वर्षानंतर तिनं दम तोडला. गेल्या अनेक दिवसांपास्नं आईवर लिहायचं होतं. वास्तविक पाहता आईवर लिहायचं तर पुस्तकही लिहिता येईल. पण मी माझ्या आईवर लिहिलेलं वाचणार कोण? त्यामुळं माझ्या ब्लॉगवर लिहायला काय हरकत आहे. प्रयत्न करुनही कमी शब्दात लेख आटोपणं शक्‍य झालेलं नाही. काहीसा "स्वान्त सुखाय" लिहिलेला हा लेख इथं देत आहे...

मध्यंतरी कोटेशन्सचं एक पुस्तक वाचत होतो. त्यात आईबद्दल एक सुंदर विचार लिहिला होता. "गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. सो ही क्रिएटेड मदर्स...' हे झालं इंग्रजीचं. आईचं वर्णन करण्यासाठी यापेक्षा अधिक सुंदर वाक्‍य कोणते असू शकेल? मराठीतही अशाच पद्धतीनं आईची महती गायली गेलीय. मराठीतही एक गाणं आहे, "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून "श्री"च्या राजानंतर शिक रे अ आ ई...' कोणी म्हणतं आई म्हणजे जिच्या आत्म्यात ईश्‍वराचा वास असतो, ती व्यक्ती म्हणजे आई.

अर्थात, जोपर्यंत आई होती तोपर्यंत मला या गोष्टींचं फारसं अप्रूप वाटलं नव्हतं. पण आठ मे ला आई गेली आणि राहून राहून हे विचार माझ्यासमोर तरळत होते. माझी आई नेहमी म्हणायची की, "जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला माझी किंमत कधीच कळणार नाही. पण मी गेल्यावर माझं महत्व तुला नक्की समजेल.' आज माझी आई माझ्याबरोबर नाही. आठवणींनी आणि तिच्या विचारांनी ती जरी कायम माझ्याबरोबर असली तरी आई आता पुन्हा मला कधीच भेटणार नाही. पण मला आईची किंमत पुरती कळून चुकलीय. ती अमूल्य आहे. आई असतानाही हे माहिती होतंच. पण आज ती जवळ नाही. त्यामुळं तिचीं उणीव अधिकच जाणवतेय.

आई नावाचं विद्यापीठ...

आई म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. तिनं आमच्यावर मारुन मुटकून कधीच संस्कार केले नाहीत. शिस्त लावली नाही. पण तिचं वागणं बोलणंच असं होतं की हळूहळू आम्हीही तिचं अनुकरण करु लागलो. तिचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, आज माझ्यामध्ये असलेल्या बऱ्याच चांगल्या सवयी या फक्त तिच्यामुळेच आहेत, असं मी म्हणेनं. (अर्थात, मला नीट ओळखणाऱ्यांना माझ्यातले वाईट गुण चांगले माहिती आहेत. त्याचा आणि माझ्या आईचा काहीही संबंध नाही, हे सांगायला नकोच.) अगदी माझ्या लहानपणापासून ते तिच्या अखेरच्या दिवसांपर्यंत. देवावर अगाध श्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, साधी राहणी, अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली सर्वोत्तम "कुक', अशा अनेक गोष्टी तिचं वर्णन करताना लिहिता येतील.

शिक्षणाची गोडी...

लहानपणापासनं तिनं मला अभ्यासाची गोडी लावली. ती फार शिकलेली होती असं नाही. इंटरनंतर एखाद दुसरं वर्ष तिनं केलं असेल. पण तरीही तिला शिक्षणाचं महत्व पटलेलं होतं. "आपल्याकडे खूप पैसे नाहीत. बापजाद्यांची इस्टेट नाही. त्यामुळं चांगलं शिकलं तरच आपलं आयुष्य सुखात जाईल. तुला शिकायचं असेल तर वेळप्रसंगी मी माझे दागिने मोडेन पण तू खूप शिक,' हा संवाद तिच्या तोंडी कायम असायचा. सुरवातीला मला शिकण्याचा खूप कंटाळा होता. त्यामुळं माझं कसं होणार याची चिंता तिला कायम सतावत असायची. पण नंतर मात्र मला हळूहळू शिक्षणाचं महत्व पटू लागलं. आजच्या घडीला माझ्याकडे ज्या तीन-चार पदव्या आहेत, त्याचं श्रेयं आई-बाबांनाच जातं. आईचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. माझं अक्षर चांगलं असावं, यासाठी तिचा खूप आग्रह होता. या गोष्टीसाठी मी तिचा अनेकदा मार खाल्ल्याचं मला अजूनही आठवतंय.

हरामाचा पैसा नको...

पैसा आयुष्यात महत्वाचा आहे. पण पैसा म्हणजेच सर्वस्व नाही, हे मला तिच्याकडूनंच समजलं. वडील "महिंद्र ऍण्ड महिंद्र'मध्ये होते. पण पगार बेताचाच होता. पण अत्यंत परिस्थितीतही आईनं संसार अगदी नेटानं सुरु ठेवला. वडिलांच्या कंपनीमध्ये दोनवेळा "लॉक आऊट' जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं तीन-चार महिने कंपनीतनं पगार येणार नव्हता. पण अशा परिस्थिततही पहिल्या वेळी शिवणकाम करुन आणि दुसऱ्या वेळी पाळणाघर सुरु करुन तिनं बाबांना आर्थिक हातभार लावला.
कुरियरसाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या किंवा कव्हर्स ती शिवायची. एका कव्हरचे आकारानुसार चार आणे ते बारा आणे मिळायचे. दिवसभरात असे वीस-पंचवीस रुपये ती मिळवायची. पाळणाघर चालवायची तेव्हा तीन-चार मुलांचे पंधराशे ते दोन हजार रुपये दरमहिना ती कमवत असे. पण पैशाच्या चणचणीची धग आमच्यापर्यंत कधीच पोचली नाही. वास्तविक पाहता आईचे वडिल म्हणजे माझे दादा आजोबा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यामुळं तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती, असं म्हटलं तरी चालेल. पण सासरी तशी परिस्थिती नव्हती. हल्ली ज्याला "ऍडजस्टमेंट' म्हणतात, ती आईंनं खूप केली. अर्थातच, कोणतीही कुरबूर न करता.

तिचं आणखी एक म्हणणं असायचं. "हरामाचा पैसा अजिबात पचत नाही. त्यामुळं फुकटचा एक रुपयाही आपल्याला नको.' एखाद्या दुकानदारानं गडबडीत जर सुटे परत देताना पैसे जास्त दिले तर प्रामाणिकपणे ती पैसे परत करायची. पाचवी-सहावीत असताना आम्ही एकदा आमच्या इथल्या काका हलवाईकडे गेलो होतो. आम्ही पाचशे रुपये दिले आहेत असं समजून त्यानं सुटे पैसे परत केले. आईनं मात्र, शंभर रुपयेच दिले होते. त्यामुळं तिनं उरलेले पैसे परत केले. दुकानदारालाही आईचं आश्‍चर्य वाटलं. पण आईचं उत्तर ठरलेलं होतं. हरामाचा पैसा पचत नाही. अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून माझ्यावर झालेले संस्कार आयुष्यभरासाठी पुरणारे आहेत. कोणाचा एक रुपया तिनं घेतला नाही की बुडवला नाही.

"आपल्याला राजाचा राजवाडा नको. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आणि तेच बरं आहे.' सगळ्यांना येतात तशा अनेक अडचणी आल्या, अनेक संकटं आली. त्यातली काही आर्थिकही होती. पण दोनवेळच्या जेवणाची ददात आम्हाला कधीच जाणवली नाही. तसंच आईचं आदरातिथ्य इतकं होतं की, आमच्याकडे आलेला कोणीच न खाता-पिता गेला नाही. इतकंच काय तर अनेक छोटे प्राणी-पक्षीही आमच्याकडे रोज मेजवानी झोडायचे. रोज भाताच्या कुकरचं प्रेशर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ती कावळे आणि चिमण्यांना तो भात वाढायची. कावळे-चिमण्या देखील स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसून त्याची वाट पाहायचे. हल्ली हल्ली तर कबुतरं, साळुंकी आणि छोटीशी खारुताई देखील नित्यनियमाने येतात. आई धार्मिक होती. प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्याची तिला जबर हौस. पण स्वयंपाक झाल्यानंतर नेवैद्य दाखवण्यापूर्वी ती पक्ष्यांसाठी भात वाढायची. तिची एकूणच धार्मिक वृत्ती पाहता हे मात्र, थोडंसं अजब होतं.

धार्मिक आणि देवभोळी

आई खूप धार्मिक आणि परंपरावादी होती. पण त्याचा जाच आम्हाला कधीच झाला नाही. उलट तिच्यामुळं अनेक स्तोत्र, मंत्र आणि आरत्या यांचं आमचं पाठांतर झालं. जोपर्यंत आई धडधाकट होती तोपर्यंत ती श्रावणी आणि कार्तिकी सोमवारचा उपास धरायची. सक्काळी सक्काळी नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातल्या शंकराच्या पूजेला जायची. अनवाणी जायची. हरितालिकेचं आणि वटपौर्णिमेचं व्रत करायची, चैत्रगौर बसवायची, संक्रांत आणि चैत्राचं हळदी-कुंकू साजरी करायची. हल्ली क्वचितच ऐकू येणारं अविधवा नवमी तसंच धुरित्री पाडवा हे व्रतही तिनं शेवटच्या वर्षापर्यंत केलं.

गणपतीत मानाचे गणपती आणि नवरात्रीमध्ये महत्वाच्या देवींचं दर्शन अगदी रांगेत उभं राहून घेणं नित्याचंच! नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एखाद्या देवीची साडी-चोळीनं ओटी भरणं आलंच. गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या पाच आणि रात्री दगडूशेठ-मंडईच्या गणपतींचं दर्शन कधीच चुकलं नाही. चालती फिरती असताना प्रत्यक्ष आणि अर्धांगवायू झाल्यानंतर तिनं अगदी गेल्या वर्षीपर्यंत टीव्हीवर बाप्पांचं दर्शन घेतलं. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातली देवीची साडेतीन पिठं, पंढरपूर, वाडी, अक्कलकोट, गाणगापूर आणि इतर बऱ्याच ठिकाणी तिनं धार्मिक पर्यटन केलं. इतकं करुनही काही वेळा अपयश आलंच तरी त्याचं खापर तिनं कधीच देवावर फोडलं नाही. कितीही बिकट परिस्थिती आली तरी तिचा देवावरचा विश्‍वास तसूभरही ढळला नाही. तितक्‍याच मनोभावे ती देवाची पूजा करतच राहिली.

द बेस्ट "कुक'

आईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं सुगरण असणं. गोडाचा शिरा, आळूची भाजी, पोहे, छोट्या आणि बरोब्बर गोल पोळ्या, पुरणाची दिंडं, सांबार, पावभाजी, रव्या बेसनाचे लाडू, ओल्या नारळ्याच्या वड्या आणि करंज्या, ताक घालून पालकाची भाजी, थालिपीठ आणि असे असंख्य पदार्थ खावे तर फक्त तिच्या हातचे. आईच्या हाताला अशी काही चव होती की, विचारता सोय नाही. लहानपणापासून मी तिच्या हातचं खात असल्यामुळं मला असं वाटत असेलही कदाचित. पण काही पदार्थ करावे तर तिनंच.

नागपंचमीला पुरणाची दिंडं, दिव्याच्या अमावास्येला गोड दिवे, कोजागिरीला मसाला दूध, दिवाळीत ओल्या नारळाच्या करंज्या, पहिला पाऊस पडला की कांदा भजी याची इतकी सवय झाली होती की बस्स! दणगेलं, गवार ढोकळी, डाळ ढोकळी, सुरळीच्या वड्या, ढोकळा आणि पराठे हे खास गुजराती पदार्थही ती उत्तम करायची. तिचा जन्म आणि जवळपास निम्मं आयुष्य बडोद्यात गेलं होतं. त्यामुळं ओघानं हे आलंच. अर्थात, अर्धांगवायू झालापास्नं हे सारंच संपलं. ती एक नंबरची सुगरण होती. त्यामुळंच कदाचित मला चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ खाण्याचं व्यसन लागलं असावं. माझी आई पण माझ्यासारखीच चवीनं खाणारी होती. पण साधं अंडही तिनं कधी खाल्लं नाही. आम्ही जर घरी ऑम्लेट केलं तरी ती भांडी आम्हालाच घासावी लागायची. तिनं त्यालाही हात लावला नाही.

जीव भांड्यात...

आईला स्वतःला आवड होती ती वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमवायची. एकवेळ ती नवी साडी घ्यायची नाही. एखादा दागिना कमी घेईल. पण बाजारातलं नवं भांडं ती जरुर घ्यायची. तांबं, पितळ, स्टील, ग्लास आणि अगदी ऍल्युमिनियमपासून बनवलेली भांडी तिनं जमवली. वेगवेगळ्या प्रकारची ताटं, डिशेस, वाट्या-भांडी, पराती, पातेली, ग्लासेस, डब्बे इथपासून ते अगदी छोटे-मोठे चमचे व लहान डब्यादेखील. आज जर आमच्या घरातली सगळी भांडी एकत्र केली तर कदाचित एखाद-दुसरी खोली सहज भरुन जाईल. आतापर्यंत आमच्या घरी जी काही कार्य झाली त्यावेळी आम्हाला कधीही बाहेरुन एक भांड भाड्यानं आणावं लागलं नाही.

तिचा जीव भांड्यांमध्ये रमत होता, असं म्हटलं तरी चालेल. पण नुसती भांडी जमवून ती थांबली नाही. दोन-तीन महिन्यांनी किंवा दिवाळीसारखं निमित्त साधून त्यातली बहुतांश भांडी ती स्वतः घासायची आणि पुसायची. हा नियम अगदी अपवादानंच मोडला गेला. एखादं भांडं पडलं किंवा नीट घासलं गेलं नाही तरी तिचा जीव वरखाली व्हायचा. भांडी ठेवायची तिची स्वतःची एक पद्धत होती. त्यामुळं लहानपणी चोरून काही खाल्लं तर ते तिला अगदी सहजपणे कळायचं. राहून राहून एक आश्‍चर्य वाटतं की, त्यावेळी बाबांचा पगार फारसा नसतानाही आईनं इतकी भांडी जमविलीच कशी?

आईनं काही वर्षे पाळणाघरही चालवलं. अर्थात, तेव्हा गरज म्हणून तिनं हा व्यवसाय सुरु केला. पण आवाक्‍यपेक्षा अधिक मुलं तिनं कधीच सांभाळली नाही. एकावेळी दोन किंवा तीन. त्यापैकी सौरभ कट्टी आणि मीरा देशपांडे हे दोघे तर आमच्याकडे तीन महिन्यांचे असल्यापासून होते. आईनं त्यांचा सांभाळ स्वतःच्या मुलांपेक्षा म्हणजेच आमच्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक केला असावा. सकाळी आठ-नऊ वाजल्यापास्नं ते संध्याकाळी सात- आठ वाजेपर्यंत ते आमच्या घरीच असायचे. आईचा त्यांना इतका लळा लागला की, आमची आई हीच त्यांची खरी आई आहे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळंच ते तिला मिनाक्षी आई म्हणायचे. मिनाक्षी आईनं त्या दोघा-तिघांचे केलेले लाड पाहिल्यानंतर खरं तर आम्हाला त्यांचा खूप हेवा वाटायचा. जस्ट जोकिंग. पण आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. आम्हाला त्यांचा तीन-चार वर्षांपर्यंत हे दोघेही आमच्याकडे असायचे. नंतर दोघेही आमच्या घरापासून दूर गेले. पण आजपर्यंत त्यांचे आणि आमच्या घराचे बंध जुळलेले आहेत.

तल्लख बुद्धी...

तिची बुद्धी आणि स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. आईचे भाऊ-बहिण, भाचे-पुतणे आणि इतर अनेकांचे वाढदिवस तिचे तोंडपाठ होते. प्रत्येकाच्या वाढदिवशी ती आवर्जून त्यांना फोन करायची. आणखी एक म्हणजे पेपरमध्ये वाचलेली प्रत्येक गोष्ट आणि बातमी तिच्या लक्षात असायची. पूर्वी कधीतरी महाराष्ट्र केसरी जिंकणारा सईद चाऊस असो किंवा आजचा सोन्याचा भाव काय आहे, या गोष्टी तिच्या अगदी तोंडपाठ असायच्या. अखेरच्या दिवसांमध्ये तिला टीव्ही पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत येणं जमत नसे. त्यावेळी टीव्हीवर ती तिच्या आवडीच्या मालिका फक्त ऐकायची. पण आवाजावरुन कोण कलाकार आता बोलतो आहे, हे तिला समजायचं. अखेरच्या दिवसांमध्ये शरीरानं तिला साथ दिली नसली तरी तिची बुद्धी मात्र कायमच तिच्या बाजूनं होती (शेवटचे सहा-सात दिवस सोडले तर) ही खूपच दिलासादायक गोष्ट होती.

आयुष्यभरात माझ्या आई-बाबांनी एकवेळ इस्टेट कमी कमाविली असेल. पण त्यांनी माणसं खूप जोडली. नातेवाईक असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा शेजारीपाजारी. मदतीच्या प्रसंगी धावून जाणं हे दोघांच्याही रक्तात भिनलेलं. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरचं सात-आठ वर्षांचं आयुष्य तिनं अगदी हसत हसत काढलं. पथ्य पाळली. पण पथ्य पाळतानाच ती अगदी मनसोक्त जगली. ती आयुष्याला कंटाळलीय, असं कधीही वाटलं नाही. "तू देवाचं इतकं करतेस. तरी मग तुला इतका त्रास का होतोय. देव बिव काही नाही...' असं तिला चिडवण्यासाठी मी म्हणायचो. त्यावेळी ती सांगायची की, "देवाचं करते म्हणूनच इतका कमी त्रास होतोय. देवधर्म केला नसता तर आणखी झाला असता.' हे पॉझिटिव्ह थिंकिंग थक्क करणारं होतं, ते देखील सगळं शरीर थकलं असताना.

ग्रेट फादर!
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या काही वर्षांत बाबांनी आईची केलेली सेवा. एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीची इतकी सेवा केल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. असणार यात शंका नाही. मी तर असं म्हणेन की शेवटची काही वर्ष आई जगली ती बाबांमुळेच. सकाळी उठल्यावर तिचं तोंड धुणं, संडास आणि बाथरुमला नेणं, आंघोळ घालणं, औषधं-गोळ्या यांचे डोस सांभाळणं आणि बरच काही. ते देखील कोणतीही चिडचिड न करता. अखेरच्या दिवसांमध्ये तर एखाद्या नर्सला लाजवेल इतकी काळजी ते आईची घ्यायचे. "हॅट्‌स ऑफ टू माय फादर टू!'
"आई-वडिलांची सेवा कर. आयुष्यात तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही,' हे वाक्‍य देखील तिच्या तोंडी कायम असायचं. अर्थात, तिनं तिच्या आईची खूप सेवा केली होती, हे आम्हाला माहिती होतं. माझ्या आईची तिच्या आईवर खूप श्रद्धा होती. खूप जीव होता. त्यामुळंच कदाचित आमची आजी ज्या दिवशी गेली बरोब्बर त्याच दिवशी माझ्या आईचं देखील निधन झालं. आठ मे रोजी. इतरांसाठी हा निव्वळ योगायोग असेलही किमान मला तरी त्याकडे योगायोग म्हणून पाहता येणार नाही. कारण आठ मे पूर्वी चार-पाच दिवस आई बऱ्यापैकी सिरीयस होती. तिला शुद्ध नव्हती, असं म्हटलं तरी चालेल. सात मे रोजी पण ती जाते की राहते अशी परिस्थिती होती. पण अखेर तिनं सात तारीख मागे टाकली आणि आठ मे हाच तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी.

आज आईला जाऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. पण आई गेली यावर अजूनही विश्‍वास नाही. मला अजूनही असं वाटतं की, शुक्रवारी रात्री बेलापूरहून घरी गेल्यानंतर आई माझी वाटत पाहत असेल. आत गेल्यावर आई विचारेल, ""जेवलास का?, काय जेवलास?'' किंवा घरातून निघताना सांगेल, ""नीट जा आणि पोचल्यावर फोन कर. रोज वेळेवर जेवत जा आणि नीट काम कर.'' टीव्हीवर जर एखाद्या बातमीला माझा व्हॉईस ओव्हर असेल किंवा माझं नाव असेल तर फोन करुन मला सांगेल, ""आशिष, आम्ही ऐकली आज तुझी बातमी.'' किंवा विचारेल, ""अरे, आज तू ऑफिसला नाही गेलास का? तुझा आवाज नव्हता?'' पेपरमध्ये काम करत असेन तर विचारेल की, आज तुझी काही बातमी किंवा लेख आहे का?

आपल्या सर्वात जवळचं माणूस गेल्यानंतर त्याची उणीव आपल्याला किता भासू शकते, हे माझ्या कल्पनेच्याही पलिकडचे होते. पण गदिमांनी गीत रामायणामध्ये लिहिलेलं अगदी खरं आहे.

"दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ'

आई गेली तेव्हा सध्या "एनडीटीव्ही'त काम करणाऱ्या प्रसाद काथे या एका जुन्या सहकाऱ्याचा एसएमएस आला, ""आई आपल्या रक्तातच असते.'' थोडक्‍यात म्हणजे आई कायम आपल्या बरोबर असते. कधीही परत न येण्यासाठी गेली असली तरी! ही गोष्टही तितकीच खरी आहे.

Sunday, June 14, 2009

माटुंग्याचे अयप्पन इडली सेंटर...

दक्षिणेतल्या पदार्थांची चविष्ट रेलचेल


माटुंगा... मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादरला खेटून असलेला भाग. इथं दाक्षिण भारतीय नागरिकांचं प्राबल्य. गुजराती नागरिकही मोठ्या संख्येनं आहेत पण दाक्षिणात्य नागरिकांचं वर्चस्व अंमळ जास्तच. साहजिकंच दाक्षिणात्य नागरिकांच्या पसंतीचे पदार्थ इथं अधिक चांगले मिळतात. माटुंगा रेल्वे स्थानकातून दिसणारं रामा नायक यांचं उडुपी रेस्तरॉं प्रसिद्ध आहेच. अनेक इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमधून "रामा नायक'वर बक्कळ छापून आलंय. त्यामुळं त्यावर आणखी शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. मला लिहायचं आहे खवय्यांच्या एका वेगळ्याच अड्ड्यावर.

माटुंगा स्टेनशनच्या कल्याणच्या बाजूच्या सर्वाधिक शेवटच्या जिन्यावरुन बाहेर उतरायचं. आपण केरळ किंवा तमिळनाडूमध्ये आलो आहोत की काय, अशी शंका आपल्याला स्टेनशमधून बाहेर पडल्यानंतर लगेच येते. स्टेशन मागे टाकून आपण हायवेकडे जाऊ लागलो की आपल्याला दाक्षिणात्य वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स लागतात. थोडं पुढे गेलं की, फुलांचे स्टॉल्स लागतात. ही मक्तेदारी आहे तमिळ आणि केरळी भाषकांकडे! पहिल्या गल्लीत डावीकडे वळलो की थोडसं पुढं जायचं. तिथं शंकराचार्यांचं किंवा तमिळ नागरिकांचं एक मंदिर आहे. देवळाच्या समोर जितकी गर्दी नसते तितकी गर्दी आपल्याला समोरच्या खाण्याच्या स्टॉलवर दिसेल. हेच ते अयप्पन इडली सेंटर, ज्याच्यावर मला भरभरुन लिहायचंय.

साधा डोश्‍यापासून सुरु होणारी डोश्‍यांची यादी साठ ते सत्तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनंतर संपते. मग त्यात मसाला डोसा, कट डोसा, म्हैसूर मसाला, म्हैसूर कट अशी नेहमीची कॉम्बिनेशन्स आलीच. कांदा उत्तप्पाच्या जोडीला मसाला उत्तप्पा आहे. उडीद वडा, डाल वडा आणि इडलीच्या जोडीला कच्च्या केळ्यांपासून बनवलेली भजी आहेत. कांचीपुरम इडलीही आहे बहुतेक. पण तुम्ही म्हणाल मुंबईत अशी उपहारगृह पायलीला पन्नास मिळतील. रेल्वे स्टेशन्सच्या बाहेरही अनेक छोटे-मोठे विक्रेते झाडाच्या पानांवर इडली, साधा डोसा आणि मेदू वडा विकत असतात. त्यांची चवही चांगली असतेच. वाद नाही. ते स्वस्तही असतात. पण अयप्पनच्या पदार्थांची चवच न्यारी.

विशेषतः सांबार, खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो-लाल मिरची यांच्यापासून बनविलेली चटणी या गोष्टी पदार्थांच्या स्वादात शेकडो पट भर घालते. केळी भजी ही इथली खासियत म्हणावी लागेल. तंसच थोडासा सरसरीत म्हणजेच मऊसर उप्पीट दक्षिणेची आठवण नक्की करुन देते. तुम्ही अस्सल खवय्ये आणि थोडेसे निर्लज्ज असाल तर अगदी पुन्हा पुन्हा मागून या पदार्थांवर ताव माराल. फक्त एखादी प्लेट खाऊन तुमचं भागणार नाही. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेलच.

अयप्पन इडली सेंटरला भेट देणाऱ्यांमध्ये तमिळ किंवा केरळी मंडळी कमी आणि उर्वरित भारतातले खवय्येच जास्त, अशी परिस्थिती असते. गुजराती, मराठी आणि अगदी पंजाबी मंडळी सुद्धा इथं येऊन भरपेट ताव मारुन जातात. दक्षिण भारतातल्या काही तरुण मंडळींनी किंवा होतकरु लोकांनी एकत्र येऊन हे सेंटर चालविल्यासारखे वाटते. मराठी गृहिणी जसं एकत्र येऊन मराठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स चालवतात तसं. पण मराठी स्टॉल्सवर न आढळणाऱ्या दोन गोष्टी इथं अगदी सहजपणे जाणवतात. एक म्हणजे आपलेपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकावरचा विश्‍वास. "आधी पैसे द्या, मग पदार्थ घ्या' या अस्सल मराठमोळ्या धोरणाला बळी पडून मी ऑर्डर दिल्यानंतर लगेच शंभरची नोट काढली. तेव्हा कॅशियरनं नम्रपणे सांगितलं की, ""तुम्हाला पार्सल न्यायचं नाही ना? मग आधी खा आणि नंतर पैसे द्या...' तसंच तुमची ऑर्डर तुम्हाला मिळाली का किंवा आणखी काही पाहिजे का, या गोष्टींची विचारणा तिथली मंडळी अगदी आपुलकीनं करतात. (आपुलकी म्हटली की कपाळावरच्या आठ्या येत नाहीत, हे सांगायला नकोच) त्यामुळंच गर्भश्रीमंतापासून ते ओझी वाहणाऱ्या हमालापर्यंत आणि सत्तर वर्षांच्या आजीपासून ते बारा-चौदा वर्षांच्या शाळकरी मुलापर्यंत सर्व जण तुम्हाला इथं दिसतील.

बरं गर्दी वाढतेय म्हणून पदार्थांचे भाव मात्र फारसे वाढलेले दिसत नाहीत. दहा-बारा रुपयांना उप्पीट, केळी भजी तर अठरा-वीस रुपयांना मसाला आणि म्हैसूर डोसा. इतर पदार्थांचे दरही थोडेफार इकडे तिकडे. थोडक्‍यात म्हणजे काय तर स्वस्तात मस्त आणि चविष्ट पदार्थ खायचे असतील तर किमान एकदा का होईना माटुंगा (मध्य रेल्वेवरचं) परिसरातलं अयप्पन इडली सेंटर गाठलं पाहिजेच.

Wednesday, June 03, 2009

राजकारणातील तरुणाई वाढतेय...


घराणेशाहीच होतेय प्रबळ...

पंडित जवाहरलाल नेहरु यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव गांधी यांनी पुत्र श्री राहुल गांधी यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतलीय आणि कॉंग्रेसला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर राहुल यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलंय. त्यामुळं पुन्हा एकदा राजकारणात तरुणाई येतेय, शिकलेले लोक राजकारणात येताहेत अशी आवई उठविली जातेय. राजकारणातील तरुणाई कोण आहे ते पहा आणि तुम्हीच ठरवा हे खरं आहे का ते...

लोकसभेतील तरुणाई...
राहुल गांधी (सोनिया गांधी यांचे पुत्र), सुप्रिया सुळे (शरद पवार यांच्या कन्या), जितीन प्रसाद (कॉंग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र), सचिन पायलट (दिवंगत कॉंग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र), ज्योतिरादित्य शिंदे (दिवंगत माधवराव शिंदे यांचे पुत्र), अगाथा संगमा (पूर्णो संगमा यांच्या कन्या), एम के अळगिरी (करुणानिधी यांचे पुत्र), दयानिधी मारन (करुणानिधी यांचे भाचे), डी. पुरंदरेश्‍वरी (तेलुगू देसमचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या कन्या), डी. नेपोलियन (करुणानिधी यांचे नातेवाईक), भारतसिंह सोळंकी (गुजरात कॉंग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र), तुषार चौधरी (गुजरात कॉंग्रेस नेते अमरसिंह चौधरी यांचे पुत्र), प्रतीक पाटील (वसंतदादा पाटील यांचे नातू), मिलींद देवरा (मुरली देवरा यांचे पुत्र), नितेश राणे (नारायण राणे यांचे पुत्र), समीर भुजबळ (छगन भुजबळ यांचे पुतणे), प्रिया दत्त (सुनील दत्त यांच्या कन्या), एच डी कुमारस्वामी (एच डी देवेगौडा यांचे पुत्र), प्रेणित कौर (पंजाब कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी), अखिलेश यादव (मुलायमसिंह यांचे पुत्र), यशोधराराजे शिंदे (भाजप नेत्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या तर वसुंधराराजे यांच्या बहिण).

लोकसभेतल्या तरुण खासदारांची नावं पाहिली की ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक आहेत हे आपल्याला पटकन समजू शकेल. राजू शेट्टी यांच्यासारखे एक-एक रुपया वर्गणी काढून लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आणि कोणत्याही घराण्याशी संबंध नसलेले खासदार अगदी थोडे असतील.

राज्याराज्यतील तरुणाई...
एम के स्टॅलिन (तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि करुणानिधी यांचे पुत्र), सुखबिरसिंह बादल (प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र), ओमर अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र), नवीन पटनाईक (बिजू पटनाईक यांचे पुत्र), उद्धव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र), अजित पवार (शरद पवार यांचे पुतणे), मंत्री राणा जगजितसिंह (पद्मसिंह पाटील यांचे पुत्र), मंत्री राजेश टोपे (अंकुशराव टोपे यांचे पुत्र), भाजपचे माजी आमदार समीर मेघे (दत्ता मेघे यांचे पुत्र), देवेंद्र फडणवीस (भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचे पुतणे), कॉंग्रेसचे युवराज मालोजीराजे (माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे जावई), जयंत पाटील (राजारामबापू पाटील यांचे पुत्र), आमदार मदन भोसले (कॉंग्रेस नेते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र), आमदार संभाजी निलंगेकर (भाजपच्या माजी खासदार रुपा निलंगेकर यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू), आमदार अजित गोगटे (भाजपचे माजी आमदार गोगटे यांचे पुतणे), आमदार विनय नातू (भाजपचे माजी आमदार श्रीधर नातू यांचे पुत्र), आमदार वर्षा गायकवाड (खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या), आमदार रणजित कांबळे (प्रभा राव यांचे भाचे किंवा पुतणे), राधाकृष्ण विखे-पाटील (बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र), पूनम महाजन (प्रमोद महाजन यांच्या कन्या), धनंजय मुंडे (गोपीनाथ मुंडे यांचे  पुतणे).

पटकन डोळ्यासमोर येतील अशी ही काही नावे. पण राजकारणात घराणेशाही काही नवी नाही. स्वतः निवृत्ती घेताना आपला मुलगा, आपली मुलगी, भाचा-पुतण्या, बायको, सून, मेव्हणा किंवा आणखी जवळच्या नातेवाईकाचीच त्या जागी वर्णी लावण्याची पद्धत कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात फारशी नवी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचेच अपत्य असल्याने ही कीड राष्ट्रवादी कॉंग्रेसला पण लागलेली आहे. भारतीय जनता पक्षही त्याच मार्गाने जाऊ लागला आहे. शिवसेनेतही बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपद देताना राज ठाकरे यांना बाजूला सारुन आपले पुत्र उद्धव यांचीच निवड केली आहे.

एकूण परिस्थिती पाहिली की कोणताच पक्ष याला अपवाद ठरलेला नाही आणि यापुढे तर ठरण्याची शक्‍यताही नाही.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस, कोणत्याही राजकारण्याशी सूतरामही संबंध नसलेला युवक-युवती राजकारणत कधी येणार आणि त्यांना कशी संधी मिळणार हाच खरा प्रश्‍न आहे.