Thursday, April 30, 2009

राज्यात युतीचेच पारडे जड...


महाराष्ट्रात तरी नाकर्ते हटणार...

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं राज्याच्या विविध भागांत फिरण्याची संधी मिळाली. राज्यातल्या जवळपास 80 टक्के मतदारसंघांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये "मी महाराष्ट्र बोलतोय...'ची टीम फिरली. नागरिकांची मतं, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचा कौल जाणून घेतला. अनेक ठिकाणी मतदारांनी राजकीय नेत्यांवर कडक शब्दांमध्ये टीका केली. तर काही ठिकाणी नागरिकांनी राजकारण्यांवर बोलणं देखील टाळलं. नागरिकांशी बोलल्यानंतर आणि मतदारसंघांमध्ये फिरल्यानंतर साधारणपणे तिथला निकाल काय असेल किंवा राज्यातलं एकूण चित्र कसं असेल, याचा अंदाज येतो. तेच चित्र इथं रेखाटण्याचा प्रयत्न मी करत आहे...

अटलबिहारी वाजपेयी सरकारला घरी बसायला लावणाऱ्या 2004 च्या निवडणुकीत महाराष्ट्रानं शिवसेना-भाजप युतीला निसटती आघाडी दिली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले होते. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांमुळे विदर्भात काही ठिकाणी युतीला फायदा झाला होता. वर्धा, चिमूर आणि भंडारासारख्या जागा युतीच्या पारड्यात पडल्या होत्या. तर लातूर आणि नांदेडमध्येही भगवा फडकला होता. मुंबईतल्या मतदारांनी अनपेक्षितपणे युतीला झिडकारलं होतं. मनोहर जोशी सरांसारखा नेता दादरचा समावेश असलेल्या मतदारसंघात पराभव झाला होता. त्यावेळी राज्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी 13 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर पंढरपूरमधल्या जागेवर रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. म्हणजेच शिवसेना-भाजप युतीला 25 तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 जागा मिळाल्या होत्या.

यंदाची परिस्थिती मात्र वेगळी होती. कारण मतदारसंघांचं चित्र बदललं आहे. त्यामुळं नव्यानं अस्तित्वात आलेल्या मतदारसंघांमध्ये कोणाचं भाग्य फळफळणार आणि कोणाला गाशा गुंडाळावा लागणार, याचा काहीच अंदाज येत नव्हता. काही मतदारसंघ गायब झाले होते. काहींचा भूगोल बदलला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये, राजकारणात रुची बाळगणाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अजूनही आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार आहे. तर केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आहे. दोन्ही ठिकाणी एकाच आघाडीचं सरकार असल्यामुळं राज्य आणि केंद्रातल्या सरकारांनी राबविलेल्या योजना, त्यांची कार्य या गोष्टींचा विचार मतदानावर निश्‍चितपणे होणार आहे. दोन्ही सरकारांची कामगिरी मतदारांवर निश्‍चित प्रभाव टाकणारी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी, शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं उभारलेलं आंदोलन, मनसेचा मराठीसाठीचा लढा, मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, वाढती महागाई आणि राज्यात सर्वत्र असलेली वीज-पाणी-सिंचन तसंच बेरोजगारीची समस्या अशा अनेक गोष्टी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ठरतील, असं प्रथम दर्शनी दिसतंय. तसंच अनेक ठिकाणी स्थानिक मुद्देही प्रभावी ठरत आहेत.

विदर्भात युतीचा बोलबाला...
विदर्भाचा विचार करता गेल्या निवडणुकीच्या आकड्यांमध्ये फारसा फरक पडेल, असं वाटत नाही. काही जागांची अदलाबदल होईल पण आकडा मात्र, कायम राहण्याची चिन्हे आहेत. नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार यांना पराभूत करुन बनवारीलाल पुरोहित निवडून येतील, असं स्पष्टपणे जाणवतंय. तिथं अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी मुत्तेमवार यांना पूर्णपणे असहकार्य केलंय. त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या तीन निवडणुकांपासून इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी होतोय. त्यामुळं यंदा कृपाल तुमाने यांच्यासारखा कार्यकर्ता विजयी झाल्यास आश्चर्य वाटू नये. काँग्रेसनं इथून मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिलीय. पण सुलेखा कुंभारे यांच्या उमेदवारीमुळं वासनिक यांची मतं फुटतील. त्याचा फायदा तुमाने यांना होईल.
वर्ध्यातनं दत्ता मेघे यांना चांगली संधी आहे. सुरेश वाघमारे यांना भाजपच्या मतविभागणीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. अर्थात, वर्ध्यात प्रभा राव यांच्या समर्थकांनी दत्ता मेघेंना सहकार्य केलं तरच हा बदल घडू शकतो. भंडाऱ्यात नाना पटोले यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपच्या शिशुपाल पटले यांना होणार असं दिसतंय. तर गडचिरोली-चिमूरमध्ये बसपच्या महाराजांची उमेदवारी भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावतीची जागा राखतील, हे नक्की आहे. तर अडसूळ यांच्या पूर्वीच्या बुलडाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यातली टक्कर काट्याची असेल. पण शिंगणे यांचं पारडं इथं जड वाटतंय. बाकी चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर, यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या धडाडीच्या खासदार भावना गवळी, अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे विजय जवळपास निश्‍चित आहेत. नरेश पुगलिया यांच्याविरुद्धची नाराजी आणि जोरदार लोकसंपर्क अहिर यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर हरिभाऊ राठोड यांची बंडखोरी आणि कॉंग्रेसच्या उत्तमराव राठोड यांची नाराजी गवळी यांच्यासाठी पूरक आहे. तिकडे बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब धाबेकर यांच्यातल्या मतविभागणीचा फायदा धोत्रे यांनी होईल. एकूणातच विदर्भातल्या तेरापैकी 11 ते 12 जागा युतीच्या नावावर निश्‍चितपणे नोंदल्या जातील.

मराठवाड्यातही युतीच!
मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघांमध्येही युतीचेच पारडे जड दिसते आहे. हिंगोलीमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो. तिथं शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारीमुळं राष्ट्रवादीच्या केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्‍यता आहे. वानखेडे यांची स्वच्छ प्रतिमा, अफाट जनसंपर्क आणि त्यांनी आमदार म्हणून केलेली कामं वानखेडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर राज्य आणि केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीचा फटका सूर्यकांता पाटील यांना बसण्याची शक्‍यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला सव्वा ते दीड लाख नागरिकांनी लावलेली हजेरी हिंगोली मतदारसंघाच्या निकालाबाबत पुरेशी बोलकी आहे.

हिंगोलीला खेटून असलेल्या परभणीत पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्‍चित आहे. इथं शिवसेनेनं गणेश दुधगांवकर यांना उमेदवारी दिलीय. खासदार तुकाराम रेंगे-पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला. निवडून आलेल्या खासदारानं शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करणं इथल्या मतरादांना नवीन नाही. अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि आता रेंगे-पाटील. पण या सर्वांना पक्ष सोडल्यानंतरही पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार इथं निवडून आला. हा मतदारसंघ शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. त्यामुळं शिवसेनेनं इथं दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, असं म्हणतात. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद असणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नांदेड जिल्हा बॅंकेचे बुडीत प्रकरण, गुरु-ता-गद्दीसाठी पैसा येऊनही त्याचे नियोजन न झाल्यामुळं लोकांचा रोष व भास्करराव खतगांवकर यांच्याबद्दलची नाराजी कॉंग्रेसचे उमेदवार खतगांवकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या विजयासाठी विशेष मेहनत घेतलीय. पण तरीही खतगांवकर यांच्या वाट्याला पुन्हा पराभव येतो की काय, अशी शंका उपस्थिती केली जातेय. तिकडे भाजपनं संभाजी पवार यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा विजय झाला तर तो कॉंग्रेस आणि कॉंग्रेस उमेदवाराबद्दलच्या नाराजीमुळं असेल हे निश्‍चित.
लातूरमध्ये भाजपच्या गायकवाड यांचा विजय निश्‍चित आहे. तिथं जयवंतराव आवळे हे बाहेरचे उमेदवार आहे. त्यात ते धर्मानं ख्रिश्‍चन आहेत. दुसरीकडे भाजपचे गायकवाड हे स्थानिक उमेदवार आहेत. या मतदारसंघात लिंगायत नागरिक बहुसंख्येनं आहेत. हा समाज कट्टर हिंदू म्हणून ओळखला जातो. या गोष्टी निकालासाठी निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. तिकडे उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे प्रा. रवी गायकवाड आणि राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांच्यात सरळ लढत आहे. इथली लढत काट्याची असून दोघांनाही विजयाची समान संधी आहे, असं बोललं जातंय. त्यामुळं "प्रेडिक्‍शन' करणं चुकीचं ठरेल.

युतीचा बोलबाला...
बीड, औरंगाबाद आणि जालना इथंही युतीचेच पारडे वरचढ आहे. बीडमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीनं नवोदित रमेश आडस्कर यांना रिंगणात उतरवलंय. मराठा-वंजारी अशी लढत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला असला तरी मुंडे यांची आजवरची कारकिर्द आणि जयसिंग गायकवाड यांनी केलेला शिवसेनाप्रमुख या गोष्टी मुंडे यांच्यासाठी पूरक आहेत. मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा विजय असेल.

तिकडे औरंगाबादमध्ये शांतीगिरी महाराज उभे असले तरी औरंगाबाद हा सेनेचा आणखी एक गड आहे. तिथं खैरे यांचं बऱ्यापैकी काम आणि जनसंपर्क आहे. तसंच शांतीगिरी महाराज हे फक्त खैरे यांची मतं खातील, असं मानणं चूक आहे. शिवाय महाराज आणि बाबांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळं शांतीगिरी महाराज फारसे यशस्वी होतील, असं मला वाटत नाही. तेव्हा उत्तमसिंह पवार यांना विजयासाठी खूप झगडावं लागेल. जालन्यात विद्यमान खासदार भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यापुढं औरंगाबादच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे. हा मतदारसंघ युतीचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला आहे. इथं बदल होण्याची शक्‍यता आहे आणि काळे यांचं कल्याण होणं अवघड दिसतंय.

उत्तर महाराष्ट्रात समसमान...
उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना घाम फुटलाय. त्यांनी नाशिकबाहेर पडून प्रचार केल्याचंही ऐकिवात नाही. इथं समीर भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज एकवटला असल्याचं दिसतंय. तसंच मराठा आरक्षणाला भुजबळ यांचा विरोध असल्यामुळं हा मुद्दा शिवसेनेच्या दत्ता गायकवाड यांच्यासाठी दिलासादायक ठरतोय. भुजबळ यांना मोठं होऊ न देण्यासाठी राष्ट्रवादीतलेच काही नेते कार्यरत असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. पण तरीही भुजबळ यांनी त्यांच्या भुजातलं बळ एकवटल्यामुळं गायकवाड यांच्यासाठी ही लढत सोपी नाही.

तिकडे दिंडोरीत भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळू यांच्यात "कॉंटे की टक्कर' आहे. पण राष्ट्रवादीचेच अर्जुन तुकाराम पवार हे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळं ते आतून चव्हाण यांना मदत करत असल्याची चर्चा कानावर येतेय. तसंच इथून माकपनं जिवा पांडू गावित यांना उभं केल्यानं धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणारेय. त्याचा फायदा चव्हाण यांना होईल. त्यामुळंच चव्हाण यांचं पारडं काकणभर का होईना पण सरस आहे.

जळगावात भाजपची बाजी...
जळगावातल्या दोन्ही जागा भाजपकडे जाणार हे निश्‍चित आहे. जळगाव शहरातून भाजपचे ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांच्यात लढत आहे. ए.टी. पाटील हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यांच्याऐवजी बी. एस. पाटील यांनी तिकिट मिळालं असतं तर ते सहज निवडून आले असते. पण नाथाभाऊ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्या ताकदीच्या जोरावर जळगावची जागा भाजप जिंकेल, असं दिसतंय. जळगाव जिल्ह्यातली रावेरची जागा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी "बारामती' आहे. त्यामुळं इथून हरिभाऊ जावळे अगदी दोनशे टक्के निवडून येणार यात शंका नाही.

नंदूरबार आणि धुळे हे एकेकाळचे कॉंग्रेसचे बालेकिल्ले. पण या बालेकिल्ल्याचे बुरुज आता हळूहळू ढासळू लागले आहेत. धुळ्यात तर प्रतापदादा सोनावणे यांच्या विजयाची शक्‍यताही आहे. मालेगावचे दोन मतदारसंघ आणि सटाणा यांचा धुळे मतदारसंघात समावेश आहे. धुळ्यातले तीन आणि नाशिकमधले तीन मतदारसंघ यामध्ये येतात. निहाल अहमद यांच्या उमेदवारीमुळं कॉंग्रेसच्या अमरिश पटेल यांना फटका बसेल. या मतदारसंघात पटेल हे विकासाचा मुद्दा घेऊन उतरलेत. त्याचा त्यांना फायदा होईल. पण पटेल अमराठी आहेत, हा मुद्दाही इथं प्रभावी ठरतोय. त्यामुळं त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे सोनावणे यांना होणरेय. त्यामुळं धुळ्यात यंदा परिवर्तन होण्याची शक्‍यता आहे.

नंदूरबारमध्येही माणिकराव गावित यांच्याविरोधात वातावरण आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळं मतविभागणी होणारेय. त्याचा फायदा भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांना होईल. पण आदिवासी मतांच्या जोरावर माणिकराव गावित बाजी मारतील, असं वाटतं. इथं परिवर्तन होण्याची शक्‍यता कमी आहे. पण झालंच तर आश्‍चर्य वाटायला नको.

पश्चिम मराहाष्ट्रात पवारांना धक्का?
शिर्डीमध्ये कॉंग्रेसच्या कोट्यातून जागा मिळवलेल्या रामदास आठवले यांना विजयासाठी झुंजावं लागतं की काय, अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी वरुन आठवले यांचे काम करण्याचे आदेश दिले असले तरी आतून ते नक्की काय करणार हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रेमानंद रुपवते हे काही प्रमाणात कॉंग्रेसची मते खाणार हे देखील पक्कं आहे. दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे हे स्थानिक आहेत आणि अनेक महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. "ऍट्रॉसिटी'चा मुद्दा आणि दलित-सवर्ण अशा संघर्षाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आठवले यांना लढत अवघड आहे. पण आठवले यांची सीट पडली दलित समाजात वेगळा संदेश जाईल, म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जिवाचं रान करुन ही जागा जिंकून दाखवावीच लागेल. तिकडे नगरमध्ये दिलीप गांधी हे निवडून आल्यातच जमा आहेत. राजीव राजळे, तुकाराम गडाख आणि राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांच्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार आणि गांधी सहज विजयी होणार, असं इथलं गणित आहे.

सुशीलकुमारांचे अवघड...
सोलापुरात भाजपचे शरद बनसोडे आणि कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात घमासान आहे. बनसोडे यांची खूप पूर्वीच जाहीर झालेली उमेदवारी, सुभाष देशमुख यांच्या कामाचा होणारा फायदा, मंगळवेढा मतदारसंघातल्या 22 गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार आणि माकपच्या आडम मास्तरांनी "बसप'च्या उमेदवाराला जाहीर केलेला पाठिंबा या सर्व गोष्टी सुशीलकुमारांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या आहेत. त्यामुळंच शरद बनसोडे यांनाही विजयाची संधी नक्की आहे. तिकडे माढ्यातनं शरद पवार येणार यात शंका नाही. पण त्यांचं मताधिक्‍य किती असेल हे औत्सुक्‍याचं असेल. प्रत्येक मतदारसंघातून एक लाख असे मिळून सहा लाखांनी पवारांना निवडून आणण्याचा चंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. पण सुभाषबापूंच्या शिस्तबद्ध प्रचारामुळं तसंच सरकारविरोधातल्या नाराजीमुळं हे मताधिक्‍य दोन लाखांपर्यंत खाली आलं तर आश्‍चर्य वाटायला नको.

पुण्यातही बदल शक्य...
पुण्यात कॉंग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना यंदा धक्का बसू शकतो. कॉंग्रेसचे पक्षांतर्गत विरोधक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे हे 96 कुळी मराठा उमेदवारी आणि कसबा पेठ, कोथरुड आणि शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेलं मतदान या गोष्टी कलमाडी यांच्यासाठी धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे. ज्यांना कमळावर मत टाकणं जमणार नाही, त्यांनी हत्ती चालवावा, अशी पक्षांतर्गत सूचना असल्याचं ऐकू येतंय. त्यामुळं कलमाडी यांना दिल्ली दूरच दिसतेय. इथं डीएसके, रणजित शिरोळे आणि अरुण भाटिया हे सर्व मिळून पन्नास-साठ हजारांच्या वर जात नाहीत, हे ही नक्की.

बारामतीत सुप्रियाताई सुळे येणार हे सांगायला राजकीय विश्‍लेषकाची गरज नाही. तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांची सीट बसणार यातही दुमत असण्याचं कारण नाही. आढळराव यांचा जिवंत संपर्क त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. तिकडे मावळमधून गजानन बाबर यांची खासदारकी निश्‍चित मानली जातेय. घाटाखाली शिवसेना आणि शेकाप यांची छुपी युती बाबर यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलेल. शिवाय राष्ट्रवादीच्या आझमभाई पानसरे यांच्या उमेदवारीमुळं मतदारसंघात हिंदू-मुस्लीम या आधारे मतविभागणी होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळं बाबर यांच्या नावामागं खासदार हे पद लागणार अशी चिन्ह आहेत.

राजू शेट्टी यांना संधी...
सातारा आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या तीन मतदारसंघातही गमतीदार लढती आहेत. साताऱ्यात उदयनराजे निवडून येणार असले तरी सातारा आणि कऱ्हाडमधल्या राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी महाराजांच्या विरोधात कौल दिलाय. त्यामुळं शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या मतांची संख्या वाढून महाराजांच्या मताधिक्‍या कदाचित कमी होईल. तिकडे सांगलीत कॉंग्रेसचे प्रतीक पाटील आणि कॉंग्रेस बंडखोर अजित घोरपडे यांच्यात सरळ लढत आहे. युतीनं इथं घोरपडेंना पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आतून घोरपडेंचं काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं कॉंग्रेसचा आणि वसंतदादा घराण्याचा हा बालेकिल्ला यंदा ढासळण्याची शक्‍यता निर्माण झालीय.

कोल्हापुरात संभाजीराजे निवडून येतील, असं वातावरण जरी असलं तरी सदाशिव मंडलिक यांनी शरद पवारांना घाम फोडला यात वाद नाही. शिवाय धनंजय महाडिक आतून मंडलिक यांचं काम करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं संभाजीराजे आणि मंडलिक यांच्यात फार अंतर असणार नाही. हातकणंगलेमधून मात्र, राजू शेट्टी यांच्या विजयाची शक्‍यता आहे. नागरिकांनी एक-एक रुपया गोळा करुन शेट्टी यांना चाळीस लाख रुपये जमा करुन दिले आहेत. तसंच शेट्टी यांची शेतकऱ्यांसाठी लढण्याची भूमिका पाहता शेट्टी यांना भरघोस मतं मिळतील आणि कदाचित ते निवेदिता माने यांना मागे टाकून दिल्लीत पोचतीलही.

कोकणात भगवाच फडकणार...
सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रायगड या विचित्र मतदारसंघांमध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल, असं दिसतंय. खाणी आणि प्रकल्पांच्या मुद्‌द्‌यावर नागरिक, कॉंग्रेस नेते-कार्यकर्ते नारायण राणे यांच्यावर नाराज आहेत. अनेकांनी उघड तर काहींनी छुपी भूमिका घेतलीय. सावंतवाडी, देवगड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर आणि चिपळूण भागात युतीचं पारडं जड आहे. त्यामुळं फक्त मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला यांच्या जोरावर निलेश राणे खासदार होणं अवघड आहे. शिवाय डॉ. सुरेश प्रभू यांची शांत-संयमी-अभ्यासू प्रतिमा आणि त्या तुलनेत निलेश राणे यांचं उथळ नेतृत्व हे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरतील.

वरती अनंत गीते हे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांना धूळ चारल्यावाचून राहणार नाहीत. दापोली, मंडणगड, गुहागर आणि श्रीवर्धन हे युतीचे बालेकिल्ले . तिकडे अलिबाग आणि पेणमध्ये शिवसेनेला शेकापची साथ आहे. शिवाय 26-11 नंतर अंतुले यांनी केलेली बडबड त्यांच्या अंगाशी आली नाही तरच नवल. इथं कॉंग्रेसच्या प्रवीण ठाकूर यांनी केलेली बंडखोरीही गीते यांच्याच पथ्यावर पडेल. एकूण काय तर अनंत गीते पुन्हा दिल्लीत पोचतील, असं दिसतंय.

शिवसेनेचे ठाणे राहणार का?
ठाणे मतदारसंघ आता पूर्णपणे बदलला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांचं असलेलं वर्चस्व, कल्याण-डोंबिवली यांचं ठाण्यातून वगळणं आणि विजय चौगुले यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी या सर्व गोष्टी शिवसेनेसाठी धोकादायक आहेत. पण ठाणे हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. तिथं उमेदवार कोणीही असला तरी कमळ किंवा धनुष्यबाण यांच्यापलिकडे मतदार जात नाहीत. शिवाय ऐरोली हा विजय चौगुले यांचे "होमपिच'. शिवाय मंदा म्हात्रे, मीरा-भाईंदरचे गिल्बर्ट मेंडोसा, मुझफ्फर हुसेन, नवी मुंबईचे कॉंग्रेसचे नामदेव भगत ही मंडळी गणेश नाईक यांचे पारंपरिक विरोधक. या गोष्टी शिवसेनेला दिलासादायक आहेत. पण मनसेचे राजन राजे यांच्या उमेदवारीमुळं शिवसेनेला धोका निर्माण झालाय. ते जर अधिक चालले तर चौगुले यांचा विजय दुरापास्त वाटतो. पण आजवरचा इतिहास पाहिला आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय कसब पाहिले तर चौगुले निवडून येतील, असं आता तरी वाटतंय.

कल्याणमध्ये आनंद परांजपे निवडून येतील. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथच्या जोरावर ते बाजी मारणार हे नक्की. पालघरमध्ये भाजपच्या चिंतामण वनगा यांचा मार्ग सोपा आहे. भाई ठाकूर यांनी उभा केलेल्या उमेदवारामुळं कॉंग्रेसच्या दामू शिंगडा यांची मते फुटणार आणि त्याचा फायदा वनगा यांना होईल, असं दिसतंय. त्यामुळं पालघरमध्ये बदल निश्‍चित दिसतोय.

तिकडे नव्यानं अस्तित्वात आलेल्या भिवंडीमध्ये सध्या तरी काहीच सांगता येत नाही. गेल्यावेळी कल्याणमधून (विधानसभेला) उमेदवारी नाकारण्यात आलेल्या जगन्नाथ पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. तर कुणबी सेनेच्या विश्‍वनाथ पाटील यांनीही इथं उमेदवारी दाखल केलीय. शिवसेनेचे आमदार योगेश पाटील यांनी भाजपला मतदारसंघ सोडण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींचा फटका भाजपलाच बसणार आहे. पण भाजपसाठी दिलासादायक म्हणजे कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या आर आर पाटील यांनी केलेली बंडखोरी. पाटील हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. अगदी शेवटपर्यंत काय होईल, काहीच सांगता येणार नाही.

मुंबईत यंदा परिवर्तन...
गेल्या वेळी युतीला फक्त एक खासदार देणाऱ्या मुंबईतून यंदा युतीचे किमान चार खासदार निवडून येतील असं दिसतंय. राम नाईक, किरीट सोमय्या, गजानन किर्तीकर आणि मोहन रावले हे युतीचे उमेदवार निवडून येण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात, ईशान्य मुंबईत संजय पाटील तसेच मनसेचे शिशिर शिंदे आणि दक्षिण मुंबईत मनसेच्या बाळा नांदगांवकर यांनी जोरदार आव्हान उभं केलंय. बाकी ठिकाणी मनसेचे उमेदवार नावाला आहेत.

शिरीष पारकर हे उत्तर मुंबईत राम नाईक यांची मतं घेणार हे नक्की असलं तरी त्यांचा फारसा फटका नाईकांना बसणार नाही. शिवाय संजय निरुपम यांच्या रुपानं कॉंग्रेसचा दुबळा उमेदवार नाईक यांच्यासमोर आहे. त्यामुळं नाईक यंदा दिल्ली गाठणार असं दिसतंय. तिकडे आबू आझमी यांच्या उमेदवारीमुळं गजाभाऊंचा मार्ग सुकर झालाय. तसंच स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून केलेली काम गजाभाऊंना उपयोगी पडणारेत. गुरुदास कामत यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन आहे. ते बाहेरचे आहेत, असाही प्रचार होतोय. त्यामळं कामत यांच्यावर घरी बसण्याची वेळ येणारेय.

प्रिया दत्त ही कॉंग्रेसची एकमेव सीट निश्‍चित आहे. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांच्या प्राबल्यामुळं महेश जेठमलानी यांची डाळ इथं शिजणार नाही आणि ते "केस' हरतील, असं दिसतंय. दक्षिण मध्य मुंबईतून माहिमचे आमदार सुरेश गंभीर आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात "टसल' आहे. दादर, माहिम, वडाळा, सायन हे शिवसेनेचे बालेकिल्ले, शिवाय धारावीतही त्यांना काही प्रमाणात मते मिळतील. या जोरावर त्यांनी गायकवाड यांच्यासमोर जोरदार आव्हान उभं केलंय. पण उर्वरित ठिकाणी चेंबूर, धारावी आणि अणुशक्तीनगर इथं एकनाथ गायकवाड यांना मिळणारं मताधिक्‍य गंभीर यांना मोठ्या प्रमाणावर तोडावं लागेल. तरच ते जिंकतील.
दुसरीकडे ईशान्य मुंबईतही कॉंटे की टक्कर आहे. मुलुंड, घाटकोपर आणि विक्रोळी इथं युतीला भरभरुन मतदान होणार. तर भांडुपमध्ये संजय पाटील जरा जास्त चालतील. मराठी मतांच्या जोरावर आणि होमपिच मुलुंडमुळं शिशिर शिंदे यांनाही थोडाफार फायदा होईल. त्यामुळं तेही इथं आव्हान निर्माण करतील. पण गुजराती मतांच्या जोरावर सोमय्या यांचेच पारडे इथं जड वाटतंय.

मनसेनं जोरदार हवा निर्माण केली असली तरी मराठी मतदार सूज्ञ आहे, हे ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिकमधल्या महापालिका निवडणुकीत सिद्ध झालंय. याठिकाणी मराठी मतांची विभागणी फार मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. त्यामुळं मनसेची जितकी हवा होती तितके त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत. अर्थात, त्यानंतर मनसेनं अनेक आंदोलनं करुन त्यांचा "बेस' वाढविला. पण ठोस कार्यक्रम नसल्यानं मतदार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वळतील, असं वाटत नाही. किमान लोकसभेसाठी तरी. विधानसभेला गणित वेगळी असू शकतात.

एकूण काय तर राज्यात शिवसेना-भाजप युतीची हवा असून जवळपास ३० ते ३२ जागा युतीला मिळू शकतात. तर उर्वरित १६ ते १८ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी ठरेल. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत बराच मोठा पल्ला मारेल, असं वाटत होतं. पण पवार यांच्या खात्याबद्दल असलेली नाराजी आणि सरकारविरोधी वातावरण यामुळं गेल्या निवडणुकीतला नऊचा आकडा गाठण्यासाठीही त्यांना झगडावं लागेल असं दिसतंय.
राज्यातील संभाव्य विजेते
1) दक्षिण मुंबई - मोहन रावले (सेना)
2) दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (कॉं) किंवा सुरेश गंभीर (सेना)
3) उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त (कॉं)
4) वायव्य मुंबई - गजानन किर्तीकर (सेना)
5) ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या (भाजप)
6) उत्तर मुंबई - राम नाईक (भाजप)
7) ठाणे - विजय चौगुले (सेना)
8) कल्याण - आनंद परांजपे (सेना)
9) भिवंडी - सुरेश टावरे (कॉं) किंवा जगन्नाथ पाटील (भाजप)
10) पालघर - चिंतामण वनगा (भाजप)
11) रायगड-रत्नागिरी - अनंत गीते (सेना)
12) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू (सेना) किंवा निलेश राणे (कॉं)
13) कोल्हापूर - छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी)
14) हातकणंगले - राजू शेट्टी (अपक्ष) किंवा निवेदिता माने (राष्ट्रवादी)
15) सांगली - अजित घोरपडे (अपक्ष)
16) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
17) पुणे - अनिल शिरोळे (भाजप)
18) बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
19) मावळ - गजानन बाबर (सेना)
20) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील (सेना)
21) माढा - शरद पवार (राष्ट्रवादी)
22) सोलापूर - शरद बनसोडे (भाजप) किंवा सुशीलकुमार शिंदे (कॉं)
23) अहमदनगर - दिलीप गांधी (भाजप)
24) शिर्डी - रामदास आठवले (रिपब्लिकन) किंवा भाऊसाहेब वाकचौरे (सेना)
25) नाशिक - रत्नाकर गायकवाड (सेना) किंवा समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
26) दिंडोरी - हरिश्‍चंद्र चव्हाण (भाजप)
27) धुळे - प्रतापदादा सोनावणे (भाजप)
28) नंदूरबार - माणिकराव गावित (कॉं)
29) जळगाव - ए. टी. पाटील (भाजप)
30) रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
31) बुलडाणा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) किंवा प्रताप जाधव (सेना)
32) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
33) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (सेना)
34) अमरावती - आनंदराव अडसूळ (सेना)
35) वर्धा - दत्ता मेघे (कॉं) किंवा सुरेश वाघमारे (भाजप)
36) नागपूर - बनवारीलाल पुरोहित (भाजप)
37) रामटेक - कृपाल तुमाने (सेना)
38) भंडारा-गोंदिया - शिशुपाल पटले (भाजप)
39) गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) किंवा मारोतराव कोवासे (कॉं)
40) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप)
41) नांदेड - संभाजी पवार (भाजप) किंवा भास्करराव पाटील (कॉं)
42) हिंगोली - सुभाष वानखेडे (सेना) किंवा सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी)
43) परभणी - गणेश दुधगांवकर (सेना)
44) बीड - गोपीनाथ मुंडे (भाजप)
45) लातूर - सुनील गायकवाड (भाजप)
46) उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) किंवा प्रा. रवी गायकवाड (सेना)
47) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (सेना)
48) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
भाजप (निश्‍चित) - 16
शिवसेना (निश्‍चित) - 12
कॉंग्रेस (निश्‍चित) - 2
राष्ट्रवादी (निश्‍चित) - 4
अपक्ष - 1
संदिग्ध - 13

Tuesday, April 21, 2009

मी महाराष्ट्र बोलतोय...

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं साम मराठी वाहिनीनं "मी महाराष्ट्र बोलतोय...' या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्यातल्या विविध मतदारसंघात जायचं, गावागावात फिरायचं, तिथल्या लोकांचं मत जाणून घ्यायचं, त्यांच्यांशी बोलायचं, समस्या जाणून घ्यायच्या असं या कार्यक्रमाचं स्वरुप होतं. त्या निमित्तानं राज्याच्या विविध भागात हिंडलो. दौऱ्यादरम्यान आलेले काही अनुभव येथे देत आहोत...

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्राचं हे वर्णन कधीतरी लहानपणी कवितांच्या पानांमध्ये वाचलं होतं. प्रत्यक्षात मात्र, आता अनुभवलं. निवडणुकीच्या निमित्तानं. महाराष्ट्राचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही 25 मार्च रोजी निघालो आणि पंचवीस दिवस महाराष्ट्रभर गावागावात हिंडलो. जवळपास साडेसहा हजार किलोमीटर, तीस जिल्हे आणि लोकसभेच्या अठ्ठावीस-तीस मतदारसंघातून फिरून साम मराठीच्या टीमनं जनमताचा कौल घेतला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. राजकारण्यांच्या सभा आणि मेळावे हे आमच्यासाठी दुय्यम होतं. आम्हाला जाणून घ्यायचं होतं सामान्यातल्या सामान्य माणसाचं मत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच आम्हाला महाराष्ट्र बोलता करायचा होता.

राज्यातल्या जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाढती बेरोजगारी या समस्यांनी अक्षरशः उग्र रुप धारण केलंय. पाण्याचं सुख वगळता पश्‍चिम आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही. मात्र, अशा वादग्रस्त मुद्‌द्‌यांना हात घालण्याची राजकीय पक्षांची इच्छा नाही. हिंमत नाही, असं म्हटलं तरी चालेल. ही गोष्ट सामान्यातल्या सामान्य माणसाला कळलेली आहे. त्यामुळं सामान्य माणूस कधी राजकारण्यांवर टीका करतो तर कधी आपल्याच कर्माला दोष देतो. पुढारी दरवेळी मतं मागायला तेवढे येतात पण नंतर आमच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नाहीत, ही खंत कानाकोपऱ्यात ऐकायला मिळते.

वीजटंचाई आणि पाणीटंचाई यापेक्षाही महाराष्ट्राला आज भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची. या बेरोजगारीमुळंच धुळ्यातला एमए, बीएड झालेला तरुण फक्त पन्नास रुपायांसाठी दिवसभराचे दहा तास मान मोडून काम करतो. फक्त अकोला व वाशिम जिल्ह्यातले जवळपास दहा ते बारा हजार तरुण लष्कर भरतीसाठी अमरावतीत येतात. कुणी बारावी पास तर कुणी ग्रॅज्युएट. सैन्याच्या नोकरीची कोणतीही हमी नसताना दोनदोन-तीनतीन रात्री रस्त्यावर झोपूून काढतात. गावात उद्योग नाहीत, त्यामुळं नोकऱ्या नाहीत, राजकारणी आमच्यासाठी काहीच करत नाहीत, इतकं शिकून फायदा काय... बंदुकीतनं गोळी सुटावी, तसे प्रश्‍न बेरोजगार तरुणांच्या तोंडातनं सुटतात. उत्तर कोणाकडेच नसतं. आम्ही पण हे धगधगत वास्तव पचवण्याचा प्रयत्न करतो. पण ते पचत नाही.

विदर्भ, मराठवाड्यात जिथं शेतीची कामं नाहीत तिथं वीटभट्टीवर मोलमजुरी करुन पोट भरणारी मंडळी आम्हाला भेटली. दिवसाकाठी हजार विटा तयार केल्या की, त्यांचे 120 रुपये सुटतात. बीडमध्ये दिवसभर उन्हातान्हात राबून कापूस वेचणाऱ्या महिला भेटल्या. नंदूरबारमध्ये ऊसाच्या मळ्यात मोलमजुरी करणारे आदिवासी भेटले. पाण्याची समस्या असताना शेत हिरवीगार करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी यवतमाळमध्ये भेटले. तर अवघ्या पाच-सात रुपयांसाठी साठ साठ किलो माणसांना वाहून नेणारे सायकल रिक्षावाले नागपूरमध्ये दिसले. सूर्य डोक्‍यावर आग ओकत असताना दिवसभर या महिला, हे शेतकरी काम करुच कसं शकतात, हा प्रश्‍न अजूनही आम्हाला सुटलेला नाही. पण सारं काही पोटासाठी हे जीवनाचं सूत्र लक्षात ठेवून आम्ही आमचा प्रवास सुरु ठेवला. या मंडळींना वेळेवर रेशनचं धान्य मिळत नाही, केरोसिन पण मिळत नाही. दाद मागितली तर ती देखील मिळत नाही.

स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटली तरी दुःखाची गोष्ट अशी की, अजूनही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकी मजुरी मिळत नाही. ""आम्ही पण पुरुषांइतकंच काम करतो. कदाचित थोडं जास्तच. मग आम्हाला पुरुषांच्या निम्मी मजुरी का...'' हा नंदूरबारमधल्या एका आदिवासी महिलेनं विचारलेला प्रश्‍न आम्हाला अनुत्तरित करणारा होता. कदाचित राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मंत्र्या संत्र्यांकडेही त्याचं उत्तर नसावं.

सिंचनाची समस्या असल्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. सिंचन हीच इथली सर्वात महत्वाची समस्या आहे. शेतीच्या पाण्याची समस्या आहे. पाणीच नसल्यामुळं उद्योगधंद्यांनीही पाठ फिरवलीय. अर्थात, गेल्या साठ वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलं काय, हा प्रश्‍न आपल्याला पडतोच पडतो. पाऊस नसल्यामुळं सिंचनाचा प्रश्‍न निर्माण झाला, हे सरळसोट उत्तर पटूच शकत नाही. गुजरातच्या नरेंद्र मोदींनी साबरमतीचं पाणी कच्छच्या वाळवंटात नेऊन शेतं हिरवीगार केली. मोदींच्या नावानं खडे फोडणाऱ्यांनी अशा पद्धतीनं विदर्भ-मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्‍न का सोडवला नाही? तशी इच्छाशक्ती महाराष्ट्रातल्या नेत्यांना का दाखवता आली नाही, या प्रश्‍नाला खरं तर उत्तर मिळालं पाहिजे. पण ते मिळत नाही आणि मिळणार नाही.

धुळ्यात तर अनेक ठिकाणी तापी बॅरेजमुळं पाणी आहे, काळी कसदार जमीनही आहे. पण विजेच्या अनियमिततेमुळ बॅरेजमधलं पाणी उचलून शेतीला देणं शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळंच ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच शेतकरी शेती करतात. अशीच काहीशी परिस्थिती नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाची आहे. बॅरेजचं पाणी उचलून शेतीसाठी वापरायचं तर ते बिसलेरी पाण्याच्या दरानं पडतं. मग असला उपद्‌व्याप कोण करणार? जमीन आहे, पाणी आहे. पण तरीही आपण काहीच करु शकत नाही, यापेक्षा अधिक दुर्भागी शेतकरी कोणता असेल. असा शेतकरी दाद मागणार तरी कोणाकडे?

सिंचनाच्या समस्येमुळं शेतीसाठी पावसावर अवलंबून रहावं लागतं. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता पेरलेलं बियाणं, खतं आणि इतर खर्च वाया जाण्याची शक्‍यताच अधिक. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी झाला नाही तरच नवल. मग तुम्ही कितीकी कर्जमाफी द्या किंवा कर्जमुक्ती करा, सातबारे कोरे करा नाही तर त्याला आर्थिक सहाय्य द्या, काहीही फायदा नाही. शेतीसाठी नियमित पाणी द्या आणि शेतीमालाला हमी भाव द्या इतकीच मागणी शेतकऱ्यांची आहे. कधी बियाणांमध्ये फसवणूक तर कधी खतांची टंचाई अशा परिस्थिती शेतकरी नाडला जातो आणि कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. मग कोणतीच कर्जमाफी त्याला सावरु शकत नाही आणि आत्महत्यांचा आकडा फुगत जातो.

आत्महत्यांच्या प्रदेशात...
अकोल्याजवळच्या एका खेड्यात शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरी आम्ही पोचलो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीसह घरात पाच जणी. स्वतः पत्नी आणि चार मुली. आधी पाच मुली होत्या. पण आजारपणात औषधांअभावी एक मुलगी दगावली. आता या चार मुलींच्या आईला आठवड्यातनं तीन-चार दिवस मजुरीची काम मिळतात. रोजची मजुरी पंचवीस रुपये. आता या पंचवीस रुपयांमध्ये पाच जणींचा संसार चालणार कसा, हे कोडं कोणताच अर्थमंत्री सोडवू शकत नाही. मग कधी कधी फक्त पाणी पिऊन झोपणं, हा एकमेव उपाय त्यांच्या हातात असतो. मुळात मुलगा व्हावा, या हव्यासापायी अजूनही अडाणी-अशिक्षित नागरिक चार-पाच मुलींना जन्म देतात, ही गोष्ट क्‍लेशदायक नाही का? याबाबत जागृती करण्यासाठी कोणताच पक्ष का पुढे येत नाही???

अकोल्यासारख्या शहरात दहा दहा दिवसांनी पाणी येतं. त्यामुळं इथल्या नागरिकांना आपल्या घरी पाहुणेच येऊ नये, असं वाटतं. थोडंसं आश्‍चर्य वाटेल, पण हे खरंय. दुसरीकडे गावातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हातोडी... अकोल्यापास्नं अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेलं छोटं खेडेगाव. आटलेल्या नदीमध्ये चार-पाच फूट खड्डे खणून मग वाटी किंवा भांड्याच्या सहाय्यानं पाणी गोळा केलं जातं. रात्री दोन-चार वाजताही पाण्यासाठी नदी गाठावी लागते. मग सहावीत शिकणाऱ्या ममतालाही आपल्या वजनाइतका पाण्याचा हंडा उचलावाच लागतो किंवा परीक्षा सुरु असतानाही बाळूला चार-पाच तास पाणी भरण्यासाठी वेचावे लागतात. या मंडळींच्या आयुष्यात "जय हो...' कधी होणार आणि कोण करणार?

म्हातोडीपास्नं पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आणखी एका गावातली परिस्थिती गमतीशीर आहे. गावात पाणी नाही, वीज नाही पण मोबाईल टॉवर मात्र दिमाखात उभा आहे. मोबाईलला रेंज आहे. पण मोबाईल चार्ज करण्यासाठी वीज मात्र नाही. विकासाची ही थट्टा पाहून आम्हाला सरकारची किंवा यंत्रणेची कीव करावीशी वाटली.

विकासाची बोंबाबोंब
धुळे आणि नगर जिल्ह्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काही धरणांची कामं तर गेल्या पंचवीस-पंचवीस वर्षांपास्नं रखडली आहेत. आता या धरणांच्या बांधकामाचा खर्च हजारो कोटींनी वाढलाय. त्याला जबाबदार कोण? आणि कोणाच्या खिशातनं त्याची वसुली करायची, असा सवाल करायला लोक मागेपुढे पाहत नाही. शहरातनं बाहेर पडलं की टोलनाका आलाच. मुंबई-नागपूर रिटर्न या मार्गावर जवळपास पंचवीसशे रुपयांचा टोल द्यावा लागतो. सर्व रस्ते बीओटी तत्वावर बांधायचे असतील आणि खासगी कंपन्यांच्या घशात पैसे कोंबायचे असतील तर सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं करायचं काय, असा खणखणीत सवाल ट्रकचालक विचारतात.

कोणी "जय हो...'चा नारा देऊन निवडणूक लढतोय, तर कोणी देशाला कणखर नेतृत्व देण्याची घोषणा करतोय. पण सर्वसामान्य नागरिकांच्या वीज, पाणी आणि नोकरी अशा अगदी माफक मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. कारण जाहीरनामे, भाषणबाजी आणि मतदारांना आश्‍वासनांचे बोल बच्चन देणाऱ्या राजकीय पक्षांसाठी अशा गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्यामुळंच समर्थ भारत, सक्षम भारत अशा गुळगुळीत संज्ञांचा प्रचारात वापर होतो आणि मूळ मुद्दे दुर्लक्षितच राहतात.

अशामुळेच नंदूरबारमधनं सलग आठ वेळा निवडून आलेले कॉंग्रेसचे माणिकराव गावित अजूनही विकासाच्या मुद्‌द्‌यावर नव्हे तर कॉंग्रेसच्या पुण्याईवर दिल्ली गाठतात. सलग तीनवेळा खासदार होऊनही भावनाताई गवळी वाशिमचा कायापालट करु शकत नाही. कॉंग्रेसला एकहाती पाठिंबा देऊनही धुळ्याच्या अक्कलपाडा धरणाचा प्रश्‍न पंचवीस वर्षांपास्नं प्रलंबित राहतो. शिवसेनेच्या पाठिशी उभं राहूनही परभणीत उद्योगधंदे येत नाहीत, रोजगारनिर्मिती होत नाही. अमरावतीत अनंत गुढे यांच्याबद्दलही तीच ओरड ऐकू येते.

गुरु ता गद्दी सोहळ्यासाठी आलेला निधी कसा वापरायचा याचं नियोजन न झाल्याचा सूर मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमध्ये ऐकू येतो. दहा-दहा वर्षे आमदारकी भूषवूनही माढ्याचा एसटी स्टॅंड अत्यंत थर्ड क्‍लास स्वरुपाचा वाटतो. मग शरद पवारांसारखा नेता येईल आणि तो स्टॅंडची सुधारणा करेल, अशी भाबडी आशा इथल्या गावकऱ्यांना वाटते. स्टॅंड सुधारणं हे खासदाराचं काम नाही, हे त्यांना सांगूनही पटत नाही. अकलूजचा विकास होतो. पण अकलूजपास्नं पंधरा किलोमीटरवर असलेलं माळशिरस हे तालुक्‍याचं ठिकाण अजूनही अविकसितच राहतं, हे कशाचं उदाहरण म्हटलं पाहिजे.

गावागावात फिरताना अशा अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. काळवंडलेले चेहरे आणि पिचलेली माणसं अधिक पोटतिकडीनं बोलतात. पोटावर हात असलेल्या लोकांपेक्षा हातावर पोट असलेले लोक अधिक तडफडीनं समस्या मांडतात. आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीच नाही. सरकार नाही, मंत्री नाही, आमदार-खासदार नाही, पोलिस नाही, न्याययंत्रणा नाही, अगदी कोणीकोणीच नाही. मग हे च्यानलवाले तरी आपलं म्हणणं ऐकून घेताहेत याचंच त्यांना बरं वाटतं. आपल्या मागण्यांना दाद मिळेल किंवा नाही, याची फिकीर तो करत नाही. पण आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. हेच समाधान आम्हाला हवं होतं. कारण आम्हाला जो महाराष्ट्र बोलता करायचा होता तो हाच होता...