Sunday, February 17, 2013

... अखेर पोपटाने प्राण सोडला


लोकमान्य नगरच्या जॉगिंग पार्कमधील घटना


विवारी मस्त सकाळी समोरच्या जॉगिंग पार्कमध्ये गेलो होतो. (फिरायला नव्हे. तिथे गोल गोल चकरा मारण्यात मला अजिबात रस नाही. आमच्या खेळण्याचं मैदान हडप करून त्यावर जॉगिंग पार्क करण्यात आल्यामुळं लहानपणापासूनच मला त्याबद्दल फार आपुलकी नाही. असो.) रथसप्तमीचे निमित्त साधून विवेकानंद सार्धशती समितीने सूर्यनमस्कारांचे आयोजन केले होते. त्यामुळे लोकमान्य नगरमधील बरीच मंडळी जॉगिंग पार्कमध्ये जमणार होती. आम्हीही त्यात होतोच.

जॉगिंग पार्कमध्ये प्रवेश केला. आजूबाजूचं वातावरण पाहिलं. सांघिक सूर्यनमस्कारांची तयारी सुरू होती. माईकची जुळवाजुळव केली जात होती. लोकांना एकत्र आणलं जात होतं. अशा परिस्थितीत वॉचमनच्या खोलीजवळ एकाच्या हातात पोपट दिसला. ज्याच्या हातात पोपट होता त्याचं नाव पद्मनाभ सहस्रबुद्धे. तो देखील तिथं सूर्यनमस्कारांसाठीच आला होता. पोपट हातात कसा काय, हे पाहण्याच्या उत्सुकतेनं पावलं तिथं वळली. पाहतो तर सहस्रबुद्धेंच्या हातात जखमी पोपट.  कुडकुडायला लावणाऱ्या थंडीमुळं पाय अगदी आखडलेले. अजिबात त्राण नसल्यामुळे तो पडूनच होता. शिवाय पंखातही बळ नसल्याचं जाणवत होतं. त्यामुळं थोडी देखील हालचाल करता येत नव्हती. 


सकाळी आल्यानंतर सहस्रबुद्धे यांना जॉगिंग पार्कमध्ये कुटीजवळ तो पोपट जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डोळ्याला जबर मार लागला होता. कदाचित कोणीतरी दगड मारल्यामुळं जखमी झाला असावा. त्याच्या डोळ्यातून रक्त आलं होतं. डोळा लालबुंद झाला होता. बहुधा तो डोक्यावर पडला असावा, त्यामुळं डोक्यावर अगदी अलगद हात लावला तरी तो ओरडत होता. त्याच्या वेदना पाहिल्यानंतर मग पक्षीमित्रांची शोधाशोध सुरू झाली. प्राणी आणि पक्ष्यांबद्दल फारसं प्रेम नसल्यामुळं त्यांचे नंबर्स माझ्याकडे नव्हतेच. मग महाराष्ट्र टाइम्समध्ये पर्यावरण आणि प्राणीमात्रांविषयी दमदार वार्तांकन करणाऱ्या चैत्राली चांदोरकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून श्री अनिल अवचिते आणि श्री राम भुतकर यांचे क्रमांक मिळविले. भूतकर हे पुण्याबाहेर होते. मात्र, त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. पोपटाला साखरेचे पाणी पाजायला आणि त्याला उन्हात नेण्यास सांगितले. असे केल्यामुळे पोपटाला थोडी तरतरी येईल, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळं आम्ही दोन्ही गोष्टी तातडीनं केल्या.

पण चोच न उघडणाऱ्या पोपटाला साखरेचे पाणी कसे पाजायचे, हा आमच्या पुढील यक्षप्रश्न होता. त्याला पाणी पाजण्याच्या प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. मग तसेच त्याला उन्हात घेऊन बसलो. बरं तो बेंचवर ठेवला तरी उजव्या बाजूला कलंडायचा. त्याला उभं राहता येत नव्हतं. तसंच तोलही सांभाळता येत नव्हता. मग राम भुतकर यांच्याशी संपर्क झाला. पोपटाला न्यायला कोण येईल, का हे त्यांनी दोन-तीन जणांशी बोलून पाहिलं. मात्र, सकाळ ही रविवारची असल्यामुळं लोकमान्यनगर जवळ कोणीच नव्हतं. त्यामुळं हतबल होऊन बसण्यापलिकडे काहीच हातात नव्हतं. 

दरम्यानच्या काळात जॉगिंग पार्कच्या वॉचमनने पोपटाला नेमकी कुठं जखम झालीय ते शोधून काढलं होतं. त्याच्या उजव्या पंखाखाली मोठी जखम झाली होती. तसंच त्यातून बरंच रक्त पिसांवर पसरलं होतं. त्यामुळं त्याचा जवळपास अर्धा जीव गेला होता. ते पाहून आमचा जीव हळहळला. तेवढ्यात मग कमलेश पाठकला तिथं बोलावून घेतलं. रस्त्यावरच्या अनेक भटक्या कुत्र्यांवर, कबुतरांवर आणि प्राणी पक्षांवर त्यानं उपचार केल्याच्या कथा मी ऐकल्या होत्या. मग त्याला बोलावून घेतलं. तो आणि कॉलनीतील बारावीत शिकणाऱ्या दोन कन्यका थोड्या वेळेत तिथं आले. त्या कन्यकांनी बरोबर प्राणी-पक्ष्यांसाठी उपयुक्त असलेलं कोणतं तरी मलम आणलं होतं. मग रुमालावर मलम घेऊन पोपटाच्या जखमेवर लावण्यात आला. 

 
 
एव्हाना बराच वेळ ऊन खाल्ल्यामुळं पोपटात तरतरी येऊ लागली आहे, असं वाटत होतं. दोन-चारदा चो चोच उघडून ओरडलाही होता. चोच उघडू लागल्यामुळं साखरेचे पाणी पाजण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. दरम्यानच्या काळात काटा नवापर्यंत आला होता. त्यामुळं अनेक जण तिथून गेले. मग मी, कमलेश, बारावीच्या दोन कन्यका आणि वॉचमनची बायको इतकेच लोक आम्ही तिथं उरलो. अनेक बघेही पोपटाशी बोलून आणि चौकशी करून निघून गेले होते. आता ह्याचं करायचं काय, हा प्रश्न आमच्यासरमोर होता. कारण व्हेटरनरी डॉक्टर ११ वाजता येणार होते आणि पक्षीमित्र येणार, का ते देखील कळत नव्हतं.

अखेर लव्ह बर्ड्स पाळलेले असल्यामुळं त्या पोपटाला वॉचमनच्या इथंच सुखरूप ठेवलं आणि ११ वाजता डॉक्टरकडे नेऊ, या हिशेबानं आम्ही घरी परतलो. साधारण दहा-पंधरा मिनिटं झाली असतील तेवढ्या पक्षीमित्र अजित कुलकर्णी यांचा फोन आला. ते आरपीएफमध्ये पोलिस आहेत व हौसेखातर पक्षीमित्र म्हणून काम करतात. आम्ही दोघं जॉगिंग पार्कमध्ये गेलो. तेव्हा त्याची हालत आणखीनच बिघडली होती. त्याच्या डोळ्यातून जास्त रक्त वाहिलं होतं. आणि काही मिनिटांपूर्वीची तरतरी दिसत नव्हती. मग त्याला एका मोठ्या कापडी पिशवित ठेवून कुलकर्णी यांनी कात्रजच्या उद्यानाकडं प्रयाण केलं.

पोपटाचा विषय तिथंच थांबला आणि मग नित्यकर्म करण्यात गुंतून गेलो. पोपटाचं काय झालं असेल, असा विचार एक-दोनदा मनात आला होता. पण फोन करायचं नेमकं राहून गेलं. ऑफिसात आल्यावर कुलकर्णींना फोन केला. पोपट बरा आहे ना… हा माझा प्रश्न. समोरून उत्तर येतं, नाही हो तो पोपट कात्रजला जाताना वाटेतच मेला. प्राणी पक्ष्याबद्दल फारसं प्रेम नसलं आणि अगदी दोन-तीन तासच त्या पोपटाबरोबर घालविले असले तरीही पोपट मेल्याचं ऐकल्यानंतर खूपच वाईट वाटलं. तो जगला असता तर धावपळ सार्थकी लागली असती असं वाटलं. असो… शेवटी प्रयत्न करणंच आपल्या हातात आहे वगैरे गोष्टी मान्य केल्या तरी एक बोच मनात कायम आहे, पोपटाचा जीव वाचवू न शकल्याची...