Wednesday, January 08, 2014

आगळं वेगळं केरळ


डाव्यांचा बालेकिल्ला
पश्चिम बंगाल आणि केरळ हे डाव्यांचे बालेकिल्ले हे पेपरांमध्ये अनेकदा वाचलं आणि लिहिलं होतं. पण त्यांच्या ताकदीचा अनुभव केरळमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अगदी पहिल्या काही तासांतच आला. माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन यांनी पश्चिम घाटासंदर्भात तयार केलेल्या अहवालांना डाव्यांचा विरोध आहे. राज्य सरकारने हा अहवाल नाकारावा, ही त्यांची जोरदार मागणी आहे. राज्य सरकार अहवाल स्वीकारणार हे निश्चित आहे. गाडगीळ आणि कस्तुरीरंगन अहवालाचा सर्वाधिक फटका इडुक्की जिल्ह्यात बसेल, असा डाव्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी इडुक्की जिल्ह्यामध्ये बंदची (मल्याळमध्ये हरताळ) हाक दिली होती. आम्हाला वाटलं सक्काळी सक्काळी आपण निघून जाऊ. डाव्या पक्षांचे कार्यकर्ते भलतेच कट्टर आणि तत्पर निघाले.


पेरियार नदीवरील पूल ओलांडून इडुक्की जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवले आणि दोनच मिनिटांमध्ये डाव्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अडविले. तिथं दहा मिनिटं काढल्यानंतर मग आम्हाला वाटलं, की झालं सुटलो. पण पुढेच दहा मैलांवर पत्तामैल (पत्ता म्हणजे दहा) नावाचं एक गाव आहे. तिथं डाव्यांनी आमचे चांगले चार-पाच तास वाया घालविले. बरं ही मंडळी इतकी कर्मठ, की कोणालाही सोडण्यास ते तयार नव्हते. पत्रकार असो, परदेशी मंडळी असो, कोणत्या तरी आजाराचे पेशंट असो, कच्चेबच्चे आणि अंगावरची मुलं असो, कोणाला म्हणजे कोणालाही ते सोडायला तयार नव्हते. तुमची भूमिका आम्हाला मान्य आहे. आम्हाला सोडा वगैरे म्हणून त्यांना काहीच फरक पडत नव्हता.

मुळात मुन्नारला फिरायला येणाऱ्या लोकांवर त्यांचा भलताच राग. इथे आमच्या घराचे, राहण्याचे आणि व्यवसायाचे वांदे आहेत. तुम्ही फिरायला आणि एन्जॉय करायला कसले येता, अशी भावना त्यांच्या शब्दात, डोळ्यांत दिसत होती. वास्तविक पाहता, आम्हाला अडवून त्यांचा काहीच फायदा होणार नव्हता. उलट केरळचे नागरिक किती मूर्ख आणि अडेलतट्टू आहेत, अशीच प्रतिमा जगभर जाणार होती. पण मुळातच कर्मठ आणि झापडबंद असलेल्या डाव्यांना ते काय समजणार. ‘अतिथी देवो भव’च्या जाहिराती वगैरे करून आतिथ्याला ही डावी मंडळी हरताळ फासत होती.  

पत्तामैल गावातील सर्व डावे कार्यकर्ते ते अल्पशिक्षीत. रेल्वेचं किंवा विमानाचं ई-तिकिट असतं किंवा मोबाईल एसएमएसवरचा मेसेजही ग्राह्य धरला जाऊ शकतो, हे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळं फ्लाइट किंवा रेल्वे असणाऱ्या प्रवाशांनाही डाव्यांनी नाहक अडवून ठेवलं होतं. त्या लोकांना त्यांची फ्लाइट्स किंवा रेल्वे मिळाल्या, की नाहीत देव जाणे. आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे वेळ वाया गेला. पण आमचं काही मिस झालं नाही. थोडा कंटाळा आला इतकंच. इतरांचे मात्र, हाल झाले. लहान मुलांना प्यायला दूध नाही. अनेक म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना ठरलेल्या वेळी औषधं घ्यायची असतात. त्यापूर्वी जेवावं किंवा काहीतरी खावं लागतं. त्या सगळ्यांचेच प्रचंड हाल झाले. त्यामुळं प्रकाश कारत आणि समस्त डाव्या नेत्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या कार्यकर्त्यांना नव्या जगाची ओळख करून देण्याची गरज आहे. आंदोलनाचा फटका पर्यटकांना किंवा बाहेरच्यांना बसणार नाही, विशेषतः परदेशी पर्यटकांना याची खबरदारी बाळगली पाहिजे. शिवाय त्या इडुक्कीमध्ये पर्यटनाशिवाय दुसरा उत्पन्नाचा मोठा स्रोत नाही. तिथं पर्यटकांनाच त्रास देऊन हे निबुर्द्ध डावी मंडळी काय साध्य करणार, हे अच्युतानंदन आणि पिनरई विजयन यांनाच माहिती. साराच मूर्खांचा बाजार.


अर्थात, असं असलं तरी डाव्या पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी चांगल्या आहेच. त्यामुळं इतका वेळ वाया गेल्यानंतरही त्यांच्याबद्दल राग होता. पण द्वेष नव्हता. तिथून निघाल्यानंतर पुढे काही दिवस तोच विषय डोक्यात अधूनमधून घोळत होता. डाव्यांचा झापडबंदपणा अयोग्य की त्यांची कट्टरता अनुकरणीय. लोकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती मूर्खपणाची की नेत्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणं महत्त्वाचं, मटण आणि दारूला चटावलेल्या इतर पक्षांच्या (भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांच्या) कार्यकर्त्यांना लाजवेल असा साधेपणा महत्त्वाचा की माहिती-तंत्रज्ञानाची आणि जगाची भाषा न समजण्याची अज्ञानी वृत्ती धोक्याची हेच मला कळत नव्हतं. राजकारणात प्रत्येकालाच कुठे ना कुठे पुढारीपणा मिरवण्याची हौस असते. मात्र, इथं पत्तामैलमधला डाव्या पक्षाचा नेता आम्हाला समजावून सांगत होता. पिनरई विजयन आणि प्रकाश कारत आमचे नेते आहेत. मी कोणीही नेता वगैरे नाही. तेव्हा ते सांगतील तसंच होईल, असं सांगणारे डावे कार्यकर्ते शिस्तबद्ध वाटत होते. पण सद्सद्विवेकबुद्धी नसेल तर अशा शिस्तीचा काय उपयोग असंही वाटत होतं.

पुढे इरिंजालकुडा इथं असताना बाबांचे मित्र, श्री. एम. के. चंद्रन यांनी डाव्यांच्या कामगिरीबद्दल एकदम टोकाची प्रतिक्रिया सांगितली. ते म्हणाले, केरळमध्ये रोज घराबाहेर पडण्यापूर्वी चार लोकांना विचारावं लागतं, की आज कोणाचा बंद नाही ना. म्हणजे बस कंडक्टरने वाईट शब्द वापरल्यानंतर त्याला लोकांनी बदडलं तर बसचा बंद, कधी घरकामगारांना योग्य वेतन मिळत नसल्याबद्दल बंद, कधी विद्यार्थ्यांचा बंद, तर कधी राजकारण्यांचा बंद. डाव्यांच्या या रोजच्या बंदमुळं डोक्याला ताप झालाय. शिवाय छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे वायरमन, फिटर, सुतार, बांधकाम मजूर वगैरे हवे असतील तर संघटनेमध्ये नोंद झालेल्या कामगारालाच आणावं लागतं. अन्यथा डावे लोक तुमच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी उभे ठाकतील आणि काम बंद पाडतील. ते डाव्यांच्या युनियनशाहीला भलतेच वैतागलेले. त्यामुळे डावे चांगले किंवा डाव्यांचे काही गुण चांगले, असं कोणीही म्हणत असलं तरी दुरून डोंगर साजरे असंच त्यांच्या अनुभवावरून वाटत होतं.

केरळमधील सिरीयन ख्रिश्चन
केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम मंडळींची संख्या चाळीस टक्क्यांपर्यंत आहे. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर फक्त ५२ वर्षांनी ख्रिश्चन धर्म केरळमध्ये आला. सेंट थॉमस यांनी केरळमध्ये ख्रिश्चन धर्माची मुहूर्तमेढ रोवली. नंतर पॅलेस्टाइनमधील एका व्यापाऱ्याने शंभरएक कुटुंबांसह केरळमध्ये प्रवेश केला. तो काळ होता ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ३५० वर्षांनी. त्यानंतर युरोपियन आणि लॅटिन अमेरिकी मिशनरी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागले, असे इतिहास सांगतो. इतर राज्यांमध्ये ख्रिश्चन समुदाय कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोन प्रमुख पंथांमध्ये विभागला गेला आहे. मात्र, केरळमध्ये लोकप्रिय असलेला आणखी एक पंथ म्हणजे सिरीयन ख्रिश्चन.


सिरीयन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन ही मंडळी हिंदू प्रथा परंपरांच्या जवळ जाणारी. म्हणजे या पंथातील बायका कुंकू वगैरे लावतात. बांगड्या भरणं गैर मानत नाहीत. सिरीयन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन किंवा सिरीयन याकूबाईट चर्चमध्ये देवळांमध्ये असतो तसा ध्वजस्तंभ असतो. या चर्चमध्ये सदैव समई तेवत असते. चर्चमध्ये प्रवेश करताना चप्पल, बूट बाहेर काढून ठेवावे लागतात. चर्चच्या बाजूला असलेल्या भिंतीत रोषणाईसाठी दगडी पणत्यांची किंवा दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ख्रिश्चन मंडळींचे उत्सव आणि ख्रिसमसच्या काळात चर्च तेलदिव्यांच्या रोषणाईने उजळून निघते.

इतिहास असे सांगतो, की सिरीयन ख्रिश्चन पंथाचे धर्मगुरू जेव्हा केरळमध्ये आले तेव्हा त्यांनी त्यावेळच्या राजांना चर्चा बांधण्यासाठी कायमस्वरुपी जागा मागितली. उदार आणि सहिष्णू हिंदू राजांनी त्यांनी जमीन दान दिली. राजा आपल्यावर नाखूष होऊ नये आणि त्याची मेहेरबानी कायम रहावी, म्हणून या ख्रिश्चन मंडळींनी हिंदू धर्माप्रमाणे ध्वजस्तंभ, रोषणाईसाठी पणत्यांची व्यवस्था आणि तेवती समई वगैरे गोष्टी चर्चमध्ये आणल्या, अशी माहिती कोट्टायममध्ये १५७९ साली स्थापन करण्यात आलेल्या चेरियापल्ली चर्चच्या व्यवस्थापने दिली. चेरियापल्ली आणि वेरियापल्ली ही दोन चर्च कोट्टायम जिल्ह्यातील सर्वात जुनी चर्च आहेत. दुसरे चर्च हे पहिल्यापेक्षा आणखी पन्नास वर्षे जुने आहे. अर्थात, ही मंडळी आपल्या आपल्यातच लग्न करू शकतात. दुसऱ्या पंथातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केले तर समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकतो.


याशिवाय सिरीयन मलबार कॅथलिक, सिरीयन मालांकारा कॅथलिक, मालांकारा ऑर्थोडॉक्स, मार्थोमा, चर्च ऑफ साउथ इंडिया आणि लॅटिन राइट ख्रिश्चन असे आणखी काही उपप्रकार आहेत. त्यापैकी सर्वाधिक लोकसंख्या सिरीयन ख्रिश्चन मंडळींचीच आहेत. वेरियापल्ली चर्चमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथल्या व्यवस्थापकाला विचारलं, की बाबा ख्रिश्चन लोकांमध्ये इतके वेगवेगळे पंथ कसे निर्माण झाले. तेव्हा त्याचं साधं सोपं सरळ उत्तर होतं. ‘अनेकदा पैशांसाठी, वर्चस्वासाठी किंवा आमचं तेच खरं याच भावनेतून वेगवेगळे पंथ स्थापन झाले,’ अशी स्पष्ट कबुली त्यानं दिली. संपूर्ण केरळमध्ये जवळपास पंधराशे सिरीयन चर्च आहेत. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट तसंच इतर पंथांची चर्चेस वेगळी.

शुद्ध मल्याळमवर प्रेम
मल्याळम ही भाषा बोलायला प्रचंड अवघड आहे आणि अनेकदा शिकल्यानंतरही नीट लक्ष देऊन न ऐकल्यास मग काहीच समजत नाही, असं आमचा मित्र सानीलनं सांगितलं. मुळात मल्याळममध्ये पंधरा स्वर आणि ४१ व्यंजनं आहेत. त्यामध्ये ळ, झ, ञ, ङ, ष आणि ण ही व्यंजनं असलेल्या शब्दांची संख्या इतर भाषांच्या तुलनेने अधिक आहे. मल्याळमप्रमाणेच तमिळ भाषेतही ही व्यंजनं असलेले शब्द जास्त आहेत. दोन्ही भाषा अधिक राकट, उग्र, भरभर आणि तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे न समजणाऱ्या आणि अंगावर येणाऱ्या वाटतात, त्या या मुळेच. अन्बळगन किंवा षङ्मुगम ही नावं पटापट बोलून पहा कसं वाटतं ते.


ही माहिती समजल्यानंतर सानीलला माझा पहिला प्रतिप्रश्न होता, की या सर्व अक्षरांचे उच्चार हे सारखेच असतात की जातीप्रमाणे बदलत जातात. म्हणजे मराठीत कसं अनेकदा पानी, लोनी आणि कोनी असे शब्द येतात. अभिमाण वगैरेही म्हटलं जातं. कोण म्हणतं किंवा त्यांचं तसं म्हणण्या मागचं समर्थन काय हा भाग अलहिदा. पण मल्याळममध्ये मात्र, शहरातला, गावातला, कोणत्याही जातीतला माणूस वरील सर्व व्यंजनांचे उच्चार अगदी स्पष्ट आणि शुद्ध असतील यासाठी प्रयत्नशील असतो.

केरळमध्ये असताना मल्याळममधील काही शब्द जाणून घेतले. आर म्हणजे नदी. तीन नद्या जिथं एकत्र येतात, (मून म्हणजे तीन) ती जागा म्हणजे मुन्नार. अनेकदा नद्यांच्या नावाला जोडूनच आर म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे मिनान्चार, पेरियार, कवणार, पेन्नार वगैरे वगैरे. मल्याळम शब्दांचे मराठीत भाषांतर करताना आवर्जून होणारी चूक म्हणजे. कोझीकोड आणि अल्लपुझ्झा. मल्याळम भाषेत त्याचा उच्चार कोळीकोड आणि अल्लपुळा असा केला जातो. Z हे अक्षर नावात आल्यामुळे त्याचा उच्चार ‘झ’ असा करण्याची आवश्यकता नाही. जसे तमिळमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम असे होते. कझगम असे नाही. कन्निमोळी असे होते. कन्निमोझी असे नाही. तोच नियम मल्याळम भाषेतही लागू होतो. त्यामुळेच कोळीकोड आणि अल्लपुळा.

पुळा या शब्दाचा अर्थ पाणथळ प्रदेश. उदारणार्थ अल्लपुळा, थोड्डुपुळा, अंबळपुळा, अरट्टुपुळा, कुट्टमपुळा आणि असे अनेक पुळा. ण हे व्यंजनही अगदी अनेक शब्दांमध्ये वापरले जाते. आपण एर्नाकुलम असं म्हणत असलो तरीही तिथं त्याचा उच्चार एर्णाकुलम असाच होतो. मल्याळमची अशी वेगळीच गंमत त्या दहा-बारा दिवसांमध्ये समजली.

भाषेचा प्रचंड अभिमान…
दक्षिणेतल्या चारही राज्यांना त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेबद्दल अभिमान असतोच. केरळही त्याला अपवाद नाही. पण या अभिमानाचा काहीसा विचित्र अनुभव मला एका रेल्वे प्रवासादरम्यान आला. इरिंजालकुडा ते तिरुवनंतपुरम हा प्रवास अचानक ठरलेला असल्यामुळे रिझर्व्हेशन मिळणं अशक्यच होतं. त्यामुळं गुरुवायूर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसनं निघालो. विनाआरक्षित डब्यातून. साधारण पाच तासांचा प्रवास. विनाआरक्षित डब्यांमध्ये असणारी प्रचंड गर्दी या गाडीतही होतीच. गाडीत चढणारे, उतरणारे, हवेसाठी दारात उभे राहणारे आणि आतमध्ये असलेले अशा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक वैताग होता. त्यातूनच एकाशी खटका उडाला. अठरा ते वीस वर्षांचा असावा. हवेसाठी मी दारात उभा होतो आणि मला मागे रेटून त्याला दारात उभं रहायचं होतं.

मल्याळी भाषेतच काहीतरी म्हणाला. बहुतेक मागे सरकार, मला उभं रहायचंय वगैरे काहीतरी असावं. पहिल्यांदा मी दुर्लक्षच केलं. पुन्हा एकदा मल्याळममध्ये काहीतरी म्हटला. तरीही मी दुर्लक्षच केलं. तिसऱ्यांदा चिडून काहीतरी म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं, जे काही बोलायचंय ते हिंदीत बोल. मला मल्याळम कळत नाही. तरीही हा पठ्ठ्या मल्याळममध्येच बोलतोय. मग मी पण त्याला मराठीतूनच सांगितलं. एकदा सांगितलेलं कळत नाही का, हिंदीमध्ये बोल नाही. मी मराठीतून बोलल्यावर त्याला कळेचना काय बोलतोय… आणखी दोन तीन वाक्य मराठीतून बोलल्यानंतर तो आपोआप हिंदीवर आला. मग त्यालाही कळलं. समोरच्याला समजणार नाही, अशा भाषेत बोलल्यानंतर काय होतं ते… 


तिरुवनंतपुरममध्ये शिवसेनेचे काम


केरळमध्ये गेल्यानंतर दोन-चार ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर्स आणि बॅनर पहायला मिळाले. पण ते अगदी क्वचित. पण तिरुवनंतपुरममध्ये (तिरुअनंतपुरम नव्हे) गेल्यानंतर समजलं, की त्या ठिकाणी शिवसेनेचं जोरदार सामाजिक कार्य आहे. राजकीय ताकद फार नाही, पण सामाजिक काम बरेच आहे. एम. एस. भुवनचंद्रन हे केरळ शिवसेनेचे प्रमुख आहेत. हायस्पीड आणि हायटेक अॅम्ब्युलन्सची फौज त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये रस्त्यावर उतरविली आहे. तत्पर नि विश्वासार्ह अॅम्ब्युलन्स सेवा ही केरळ शिवसेनेची ओळख आहे. शिवाय पद्मनाभ मंदिरासह विविध देवळांमध्ये अन्नछत्र सुरू करून भक्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे असलेली संघटना म्हणून शिवसेना ओळखली जाते.


महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका निभावणारी शिवसेना केरळमध्ये हिंदू मुनान्नीच्या सहकार्याने पुढे जात आहे. हिंदू मुनान्नी ही हिंदुत्वाचा विचार कट्टरपणे पुढे नेणारी आक्रमक संघटना आहे. शिवसेना तिला धरून असते. तिरुवनंतपुरमसह केरळमधील विविध गावांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा शिवसेनेने सुरू केली आहे. म्हणजे तिरुवनंतपुरममधील दीड-दोन हजार घरांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा शिवसेनेने सुरू केली. शहरात विविध पाचशे ते सहाशे गणेश मंडळांची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यास प्रारंभ केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आग्रही भूमिका घेणारी धार्मिक आणि सामाजिक संघटना ही त्यांची आणखी तिरुवनंतपुरममध्ये अधिक लोकप्रिय आहे. केरळमध्ये इतरत्र मात्र, संघटनेचा म्हणावा तसा प्रभाव नाही. पण राजधानीत त्यांची दखल घेतलीच जाते. 

शेवटचा पण महत्त्वाचा किस्सा...

चेरियापल्ली चर्च पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो, त्याचवेळी तिथं अमेरिकेतील चार पर्यटक आले होते. म्हणजे दोन जोडपी होती. त्यांनी तिथल्या व्यवस्थापकाला विचारलं, की चर्चमध्ये प्रार्थना वगैरे कधी होतात. चर्च कधी बांधलं. इथलं व्यवस्थापन कसं चालतं. सिरीयन ऑर्थोडॉक्स चर्चचा मुख्य धर्मगुरू कोण वगैरे वगैरे माहिती त्यानं घेतली. चर्चची सर्व माहिती घेतल्यानंतर जाताना त्यानं हळूच एक प्रश्न पुढं केला. त्यानं विचारलं, की या चर्चमध्ये फक्त ख्रिश्चन मंडळींनाच प्रवेश आहे की इतर धर्मिय सुद्धा येऊ शकतात. 

तिथला व्यवस्थापक तितकाच बिलंदर आणि खोचक. तो म्हणाला, आमच्या चर्चमध्ये फक्त ख्रिश्चनच नाही, तर सर्व धर्मियांना प्रवेश आहे. केरळमधील अनेक मंदिरांमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम किंवा गैरहिंदू लोकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, आमचे चर्च सर्वांसाठी खुले आहे. आता आमचे चर्च सर्वांसाठी खुले आहे, हे सांगताना देवळांचा उल्लेख करण्याची त्याला काही आवश्यकता नव्हती. पण त्यानं तसा उल्लेख केला. 

हे ऐकल्यानंतर मग त्या अमेरिकन पर्यटकाला आश्चर्य वाटलं. मग त्याला मी थोडं समजावून सांगितलं. म्हटलं, सगळीकडे भारतात अशी परिस्थिती नाही. केरळमध्ये जरी मंदिरांमध्ये गैरहिंदू लोकांना प्रवेश दिला जात नसला, तरी भारतातील इतर मंदिरांमध्ये सर्व धर्मियांना प्रवेश दिला जातो. अगदी काही अपवाद वगळून. त्यामुळे इथली परिस्थिती सगळीकडे आहे, असे मुळीच नाही. शिवाय म्हटलं ख्रिश्चन धर्माचे चर्च असले तरीही इथं मी हिंदू असूनही आलो आहे. आमचा ड्रायव्हर रहीम मुस्लिम आहे. तो पण चर्च पहायला आला आहे. आम्हाला चर्च हे फार वेगळे किंवा इतर धर्मियांचे म्हणून त्याज्य वगैरे मुळीच नाही. अनेक धर्मिय लोक चर्चला भेटी द्यायला येतात. त्याची वास्तूकला, पुरातन म्हणून असलेलं महत्त्व जाणायला येत असतात. 

हे ऐकल्यानंतर त्या अमेरिकन माणसानं व्यक्त केलेली भावना मला सर्वाधिक आवडली. तो म्हणाला, अरे व्वा. अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्यांमध्ये धर्मावरून जोरदार भांडणं सुरू आहेत. अनेकदा बातम्यांमधून आम्हाला वाटतं, की भारतामध्ये धार्मिक तेढ आणि हिंसाचार जोरदार आहे. पण इथलं प्रत्यक्ष चित्र तर बरंच वेगळं आहे. चर्चमध्ये मला तीन धर्मांचे तीन लोक भेटतात, ही आनंदाची गोष्ट आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये असलेल्या चित्रापेक्षा भारत खरेखुरेच वेगळा आहे.

बास्स... आणखी काय पाहिजे.