Wednesday, May 31, 2017

हरविलेल्या मोबाईलची लघुकथा…



प्रामाणिकपणाला तंत्रज्ञान आणि तत्परता यांची जोड मिळाली, तर काय घडू शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आला. केरळमधील एका माणसाचा मोबाईल मुंबईमध्ये हरविला आणि तो उत्तर प्रदेश किंवा बिहारहून आलेल्या व्यक्तीला सापडला. त्याने पुण्यात फोन करून संबंधित केरळी माणसाला संपर्क करण्याची विनंती केली. भाषेच्या अडचणीवर मात करून पुण्यातून केरळमध्ये संपर्क साधला गेला आणि संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचण्यात आले. अखेर तीन-चार तासांच्या सव्यापसव्यानंतर हरविलेला मोबाईल मुंबईमध्येच संबंधित व्यक्तीला पुन्हा मिळाला... त्याची ही कहाणी…

काही वर्षांपूर्वी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान हत्ती गणपती मंडळाने केरळमधील ‘पंचवाद्य’ वाजविणाऱ्या कलाकारांचा समावेश केला होता. त्यावेळी त्या ‘पंचवाद्य’ पथकाचा प्रमुख राजीव याच्याशी अगदी त्रोटक बोलणे झाले होते. तेव्हा त्याचा मोबाईल सेव्ह करून ठेवला होता आणि त्याने माझा. भविष्यात आमचा कधी संपर्क होईल, असे वाटलेही नव्हते. तीन वेळा केरळमध्ये गेलो, असलो तरीही कोट्टायमला निवांत जाणे झाले नव्हते. त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती. राजीव कोट्टायममध्ये रहायला आहे.


मंगळवारी अचानक दूरध्वनी वाजला आणि ‘राजीव कोट्टायम’ असे नाव झळकले. मलाही आश्चर्य वाटले, या बाबाजीला माझी आता आठवण का झाली, अशा विचारानं फोन उचलला. समोरचा माणूस हिंदीतून बोलत होता. त्यानं हिंदीतून विचारला, हा फोन कोणाचाय? म्हटलं, राजीव म्हणून माझ्या ओळखीचे आहेत कोट्टायचमचे. त्यांचा आहे. 

समोरची व्यक्ती बोईसर येथून बोलत होती. रिक्षाचालक होता. प्रवेशसिंग उर्फ टायगर. त्याला राजीवचा मोबाईल मिळाला होता. तो बंद होता. त्यामुळे टायगरने स्वतःच्या मोबाईलमध्ये राजीवचे सीमकार्ड टाकून मला फोन केला. राजीवच्या कार्डावर यानं वीस-तीस रुपयांचं रिचार्जही मारलं होतं. ‘तुमच्याकडे या माणसाचा दुसरा नंबर असेल, तर त्यांना फोन करून सांगा. मोबाईल माझ्याकडे आहे. मला तो नको आहे. त्यांचा मोबाईल घेऊन मी काय करू. चांगला महागातला वाटतो. एलजी कंपनीचा आहे. १२-१५ हजारचा नक्की असेल. त्यांना माझ्या नंबरवर किंवा स्वतःच्याच नंबरवर फोन करायला सांगा, मी बोलतो त्यांच्याशी…’ असं सांगून टायगरनं बॉल (खरं तर मोबाईल) माझ्या कोर्टात टाकला. 

‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ पाहत असल्याने, आधी जरा धाकधूकच वाटत होती. राजीवचा फोन या रिक्षावाल्याकडे बोईसरला कसा आला, राजीवला काय झाले आणि असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. आता मी काय करणार होतो. पण त्याच्या मोबाईलमध्ये आशिष नावाने माझा नंबर सेव्ह असेल. त्यामुळे तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असावा, म्हणून मला रिक्षाचालकाने फोन केला. आधी एक-दोन जणांना फोन करून झाले होते. मात्र, ते सर्व मल्याळममध्ये बोलत होते. त्यामुळे टायगरला काही करता आले नसावे. त्याच्याशी हिंदीत बोलणारा मी पहिलाच असल्याने जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. 

  ज्याचा चेहरा दिसतोय, तो राजीव...

काय करायचे, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण माझ्याकडे राजीवचा दुसरा क्रमांकही नव्हता. कोट्टायममध्ये माझा कोणताही रिपोर्टर मित्र किंवा ओळखीची व्यक्ती राहत नाही. मग राजीवच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. फेसबुकवर कोट्टायम राजीव वगैरे सर्च मारून काहीच हाती लागेना. शेवटी राजीवचा नंबर गुगलवर टाकला आणि शोधलं. पहिल्या पानावर तळाशी एक ब्लॉग सापडला. राजीव ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या कॉलनीच्या सदस्यांची सर्व माहिती त्यावर दिली होती. कोट्टायमममधील ‘वड्डकेनाडा रेसिडन्ट्स वेल्फेअर असोसिएशऩ’ असं त्याच्या सोसायटीचं नाव. त्या सोसायटीमधील सर्व जणांची नावे असलेला ब्लॉग सापडला आणि थोडंसं हुश्श वाटलं. त्या सोसायटीमध्ये त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन-चार जणांना फोन लावला. पण त्यांना हिंदी आणि इंग्रजी काही समजेना. ब्लॉगवरील माहितीनुसार काही जण ज्येष्ठ नागरिक होते, काही जण रोजंदारीवर काम करणारी मंडळी होती. एक वकील मिळाला. त्यांना फोन लावला, तर ते खूप बिझी होते. म्हणून त्यांनी बोलणं टाळलं. 


अखेरीस त्या सोसायटीत राहणाऱ्या बिजू नायर या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला. ते चिंगवनम पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आता गोची अशी, की त्यांना हिंदी आणि इंग्रजी समजेना आणि मला मल्याळम येईना. त्यांच्या सहकाऱ्याशी बोललो. पण त्यालाही हिंदी नीट समजत नव्हते. मी त्यांना का फोन केला आहे, हे त्यांना समजत नव्हते आणि मला त्यांना सांगता येत नव्हते. त्यांना वाटलं, की मी चुकून त्यांना फोन लावलाय. त्यामुळं दोन-तीनदा राँग नंबर वगैरेही म्हणून झालं. अखेरीस एक कल्पना सुचली. 


आमच्या ऑफिसमध्ये KTजयरामन नावाचे एक गृहस्थ अॅडमिनमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मी त्यांच्याकडे गेलो. सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा करण्याची विनंती केली. पुन्हा त्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला आणि संवाद साधण्यासाठी जयरामन यांच्याकडे फोन दिला. दरम्यान, बिजू नायर यांनी तो फोन त्यांचे सहकारी अनीश यांच्याकडे दिला. पुढची पाच-दहा मिनिटे तो पोलिस अधिकारी आणि जयरामन यांच्यामध्ये मल्याळममधून संवाद साधला जात होता. नेमका गोंधळ काय झाला आहे, हे एव्हाना त्या पोलिस अधिकाऱ्याच्या लक्षात आले होते. सर्व पार्श्वभूमी आणि आम्हाला काय हवे आहे, हे समजल्यानंतर दोघांमधील संवाद यशस्वीपणे पूर्ण झाला. 
 

त्या पोलिस अधिकाऱ्याने तत्परतेने कुठल्या तरी कर्मचाऱ्याला त्या सोसायटीमध्ये राजीव यांच्या घरी धाडले असावे आणि माहिती दिली असावी. कारण दहाच मिनिटांनी मला राजीव यांच्या पत्नी इंदू यांचा दूरध्वनी आला. मुख्य म्हणजे त्यांना हिंदी व्यवस्थित नाही, पण समजण्याइतपत येत होते. त्यांचे पती म्हणजे राजीव हे मुंबईत ‘पंचवाद्य’ वाजविण्यासाठी दोन दिवसांसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा दूरध्वनी हरवला होता. तसे त्यांनी पत्नीला सांगितलेही होते. मोबाईल ज्या रिक्षाचालकाकडे आहे, त्याचा नंबर मी राजीव यांच्या पत्नीला दिला. त्या रिक्षाचालकाच्या नंबरवर किंवा राजीव यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून रिक्षाचालकाशी बोलून घ्यायला सांगितले. हिंदीतून बोला, हे सांगण्याची गरज भासली नाही. 

इंदू आणि टायगर यांचे बोलणे झाले असावे, कारण रात्रीच्या सुमारास मला इंदू यांचा फोन आला आणि मोबाईल माझ्या मिस्टरांनी कलेक्ट केला, असे त्यांनी सांगितले. तेव्हा ‘साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ झाल्याचा आनंद मिळाला.

Tuesday, May 16, 2017

‘अन्नपूर्ण’ उपेंद्र...


जसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, होता हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं खूपच जीवावर आलंय. वय वर्षे अवघे ४८. म्हणजे जाण्याचं वय अजिबात नाही. पण आता जाण्याचं तसं वय तरी कुठं राहिलंय. कोणत्याही वयाची माणसं अचानक धक्का देऊन जातायेत. उपेंद्रही तसाच सर्वांना चटका लावून गेला.




वाढदिवस किंवा छोट्या-मोठ्या समारंभापासून ते बहिणीच्या डोहाळे जेवणापर्यंत आणि भाचीच्या बारशापासून ते आईच्या तेराव्यापर्यंत... सर्व समारंभांच्या वेळी बल्लवाचार्य म्हणून उपेंद्रनं अत्यंत उत्तम रितीने जबाबदारी पार पाडली होती. उपेंद्रचं सगळं काही सढळ हस्तेच असायचं. देताना त्यानं कधीच आखडता हात घेतला नाही. त्यानं केलेल्या पदार्थांना असलेली चव, दिलेल्या ऑर्डरपेक्षा पाच-आठ मंडळी जास्तच जेवतील असा स्वंयपाक करण्याची सवय आणि कधीच समोरच्याला नाराज न करण्याची वृत्ती यामुळे आमच्या इतर नातेवाईकांमध्येही तो भलताच लोकप्रिय ठरला. उपेंद्र हा खऱ्या अर्थानं ‘अन्नपूर्ण’ होता. भाऊ, आत्या आणि इतर मित्रमंडळींचा तो कधी फॅमिली केटरर बनून गेला, ते आम्हालाही कळलंच नाही.
 
काल रात्री अचानक चुलत भाऊ शिरीषचा आणि नंतर बंडूशचा फोन आला नि उपेंद्र गेल्याचं कळलं का, असं विचारलं. अक्षरशः धक्का बसला. गेल्या काही वर्षांपासून तो आजारी असला आणि प्रकृती अचानक ढासळली असली, तरीही तो असा पटकन जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं. पण आमचा हा बल्लवाचार्य देवदेवतांना खिलविण्यासाठी खूपच लवकर मार्गस्थ झाला. गेल्या जवळपास पंचवीस वर्षांपासूनचा आमच्या दोस्तीचा मस्त प्रवास अचानकपणे थांबला.

उपेंद्रचा लहान भाऊ अभिजीत पांडुरंग उर्फ आप्पा केळकर यांची ओळख आधीपासून असली, तरीही उपेंद्र आणि माझी घसट अधिक होती. आमच्या वयामध्ये खूपच अंतर होतं. मात्र, तरीही आमचं ट्युनिंग खूप मस्त जमायचं. अगदी मोजकं आणि मर्मावर बोट ठेवणारं बोलणं हा त्याचा स्वभाव होता. कधीतरी केळकर आडनावाला साजेसं एकदम तिरकस बोलून विकेट काढण्यातही त्याचा हातोटी होती. वागायला एकदम मोकळा ढाकळा. ज्याच्याशी एकदा जमलं, त्याच्याशी कायमचं टिकलं. अशा या उपेंद्रच्या संपर्कात आलो ते प्रज्ञा भारतीने आयोजित केलेल्या वाग्भट या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने. साधारणपणे १९९४चा कालावधी असेल. 

तेव्हा मिलिंद तेजपाल वेर्लेकर याच्या पुढाकारातून प्रज्ञा भारतीच्या बॅनरखाली वाग्भट ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा उपेंद्रकडे भोजन व्यवस्था होती आणि त्याच्या हाताखाली आम्ही कार्यरत होतो. कार्यरत म्हणजे काय, आम्हाला फार काही येत नव्हतं. पण त्याला मदतनीस म्हणून काम करावं, अशी जबाबदारी आमच्यावर होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वयंकपाक करताना कशा पद्धतीने करायचा, याचा ‘फर्स्ट हॅंड’ अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता. नाश्त्यासाठी पोहे, उपमा किंवा साबुदाणा खिचडी, जेवण्यात रस्सा भाजी आणि खिचडी वगैरे पदार्थ कसे बनवायचे, हे आम्हाला त्याच्याकडे पाहून शिकायला मिळत होतं. भाजी चिरायची कशी, पातेली उचलायची कशी, वाढप व्यवस्था कशी पार पाडायची हे त्यानंच आम्हाला शिकवलं. आमटीमध्ये किंवा रस्साभाजीत मीठ जास्त झालं, तर ते कसं कमी करायचं, हे देखील त्यानंच सांगितलं. त्यानंतर सहली, कार्यकर्त्यांसाठीची शिबिरं आणि अभ्यास वर्गांमध्ये भोजन कक्षात काम करण्यात रुची निर्माण झाली, ती त्याच्यामुळंच. 

प्रज्ञा भारतीच्या निमित्तानं घडलेला एक किस्सा अजूनही आठवतोय. रात्रीच्या भोजनाच्या वेळी भाजी संपणार, अशी परिस्थिती होती. म्हणजे कार्यकर्त्यांसाठी परत भाजी करावी लागणार होती. मात्र, सर्व भाज्या संपलेल्या होत्या. फक्त काही कांदे शिल्लक असावेत. आता एवढ्या रात्री परत भाजी खरेदी करायला जाणं शक्य नव्हतं. उपेंद्रनं शक्कल लढविली. त्यादिवशी सर्वांसाठी फ्लॉवरची भाजी करण्यात आली होती. ‘काही काळजी करू नका, आपण मस्त भाजी करू,’ असं म्हणत त्यानं फ्लॉवरचे दांडके कापायला सुरुवात केली. फ्लॉवरचे दांडके आणि कांदा यांच्यापासून बनविलेली भाजी अशी काही फक्कड जमली होती, की विचारता सोय नाही. उपेंद्र, कसली भाजी केलीय रे, कसली भाजी केलीय रे... असं विचारत मंडळी मिटक्या मारत त्या भाजीवर ताव मारत होते.

तेव्हापासून आमची उपेंद्रशी गट्टी जमली ती जमली. मग प्रज्ञा भारतीच्या सर्व वक्तृत्व स्पर्धा, काही शिबिरं आणि वर्गांसाठी उपेंद्रच्या हाताखाली काम करण्यात मजा यायची. माझा बालपणीपासूनचा दोस्त योगेश ब्रह्मे आणि मी कॉलेजला असताना कायम उपेंद्रच्या नारायण पेठेतील घरी जायचो. बरेचदा वेगळा पदार्थ करणार असेल, तर तो मला आणि योगेशला आवर्जून टेस्ट करायला बोलवायचा. इतरवेळी जी ऑर्डर असेल, ते पदार्थ तो आम्हाला टेस्ट करायला द्यायचा. कधी फ्रूटखंड आणि मोतीचुराचे लाडू, पावभाजी, कधी पनीर भुर्जी आणि बरंच काही. गुलकंदाचं श्रीखंड मी त्याच्याकडेच पहिल्यांदा खाल्लं. एखाद्याच्या हातालाच चव असते. त्यानं केलेलं काहीही चांगलंच होतं. उपेंद्रच्या बाबतीत तसंच काहीसं म्हणायला पाहिजे. साध्या चहापासून ते एखाद्या पदार्थापर्यंत त्याचं गणित बिघडलंय आणि अंदाज चुकला, असं क्वचितच झालं असेल. आळुची भाजी करावी, तर उपेंद्रनंच. बटाट्याची भाजी, भरल्या वांग्याची भाजी, पावभाजी, पुलाव, कढी-खिचडी हे पदार्थही त्यानंच करावेत. अगदी साधा वरण-भातही त्याच्या पाककौशल्याची चुणूक दाखविणारा. मागे एकदा निवासी वर्गाच्या समारोपानंतरच्या भोजनात केळी आणि वेलची घालून केलेला केशरी शिरा तर अफलातून. आजही तो शिरा लक्षात आहे. जिन्नस नेहमीचेच पण स्वाद एकदम वेगळा. 

ट्रॅव्हल्स कंपन्यांबरोबर तो केटरर म्हणून कुठं कुठं जायचा. त्यावेळी टूरदरम्यान आलेले किस्से रंगवून रंगवून सांगायचा. एकदा असाच कुठल्या तरी ट्रॅव्हल्स कंपनीबरोबर आसामला गेला होता. तेव्हा काझीरंगा अभयारण्यात संध्याकाळी त्या टूर आयोजकाने दुसऱ्या दिवशी मस्त पुरणपोळ्या होऊ द्या केळकर... अशी फर्माईश केल्यानंतर मी कसा हडबडलो होतो, हे उपेंद्रनं मला आणि योगेशला माझ्या बहिणीच्या साखरपुड्याच्या दिवशी मस्त रंगवून सांगितलं होतं. हसून हसून मुरकुंडी वळायची त्याचे किस्से ऐकताना. संघशिक्षा वर्गांमध्ये भोजन व्यवस्थेत काम करताना येणारे अनुभव, बदलत जाणारा संघ आणि बरंच काही सांगायचा. 

जेव्हापासून आई आजारी होती, तेव्हापासून घरातल्या कोणत्याही समारंभासाठी उपेंद्रलाच ऑर्डर देऊ, असा तिचा आग्रह असायचा. त्यानं केलेलं जेवण तिला जाम आवडायचं. त्यामुळं आई गेल्यानंतर तेराव्याचं जेवण त्यानंच करावं, अशी माझी इच्छा होती. आता सर्वच केटरर मंडळी तेराव्याचा स्वयंपाक करत नाही, हे मला माहिती होतं. त्यावेळी दबकत दबकतच त्याला विचारलं, की तू तेराव्याचा स्वयंपाक करून देशील का. कोणतेही आढेवेढे न घेता त्यानं हो म्हटलं. मी करतोच स्वयंपाक आणि जरी करत नसतो, तरी तुझ्या आईसाठी नक्की केला असता, असंही सांगून टाकलं.

डॉ. प्रसाद फाटक यांच्याकडे शुक्रवार पेठेत जाताना वाटेवरच त्याचं ऑफिस होतं. तिथंच अनेक पदार्थ तयार व्हायचे. तिथं अनेकदा त्याची भेट व्हायची. सकाळी चालायचा जायचो, तेव्हा बाजीराव रोडवरही दोन-तीनदा भेट झाली होती. काही वर्षांपूर्वी एका गोशाळेमध्ये तो, मी, विनायक जगतापचा मोठा भाऊ आणि आणखी दोघं गेलो होतो. त्या गोशाळेवर स्टोरी करता येईल का, ते पाहण्यासाठी. बातमी किंवा लेख काही जमला नाही. मात्र, तेव्हा जवळपास पाऊण दिवस आम्ही बरोबर होतो. खूप मस्त गप्पा झाल्या होत्या. मधुमेहामुळं बरेच निर्बंध आल्याचं जाणवतं होतं. खाण्यापिण्यावरही आणि हालचालींवरही. काही महिन्यांनीच अचानक तो हॉस्पिटलमध्ये असल्याचं कळलं आणि डायलिसीसही सुरू झाल्याचं समजलं. नंतर एकदा जनसेवा बँकेमध्ये उपेंद्र भेटला. डबल बॉडी असलेला उपेंद्र एकदम सिंगल बॉडी झाला होता. आवाजही खूपच क्षीण झाला होता. हसतखेळत वावरणारा मनमौजी उपेंद्र ज्यांनी पाहिलाय, त्यांना तो उपेंद्र अजिबात आवडला नसला. 


नंतर त्याची प्रकृती सुधारत होती. काही दिवसांपूर्वी आप्पांची धावती भेट झाली. डायलिसीसची फ्रिक्वेन्सी कमी होते आहे, असं तेव्हा त्यांच्याकडूनही समजलं. त्याच दरम्यान एकदा कर्वेनगर परिसरात अचानकपणे गाडीवरून जात असताना त्याची भेट झाली. काय आशिष, कसं चाललंय, भेटू एकदा निवांत असं त्रोटकच बोलणं झालं. नंतर दोन-तीनदा फोनवर ऑर्डरच्या निमित्तानं बोलणं झालं. ऑर्डरसाठी आणि नंतर आठवणीसाठी फोन, असं दोनवेळा नोव्हेंबर महिन्यात झालेलं फोनवरचं बोलणं माझं अखेरचं बोलणं ठरलं.  

उपेंद्रचे वडीलही या व्यवसायात होते. म्हणजे फिलिप्स कंपनीत नोकरी करीत असतानाच त्यांनी आणि उपेंद्रच्या आईनं हा व्यवसाय सुरू केला आणि उपेंद्रने हा व्यवसाय वाढविला, असं म्हणायला हरकत नाही. त्याची आई आणि पत्नी आजही या व्यवसायात त्यांना मदत करतात. काही वर्षांपूर्वीच उपेंद्रचे वडील वारले आणि त्याच्या शारिरीक कष्टांवरही मर्यादा आल्या. कुटुंबानं या व्यवसायात पदार्पण करण्याला मध्यंतरी पन्नास की साठ वर्ष पूर्ण झाली होती. त्या काळात त्याची शुक्रवार पेठेत भेट झाली. लवकरच मोठा कार्यक्रम करणार वगैरे सांगत होता. ‘केसरी पेपरमध्ये खूप वर्षांपूर्वी अंजली आठवलेनं आमच्यावर लिहिलं होतं, असं तेव्हा तो अगदी खूष होऊन सांगत होता. त्याच सुमारास खरं तर उपेंद्रवर ब्लॉग लिहायचा होता. पण आज लिहू, उद्या लिहू, असं म्हणत लिहिणं होत नव्हतं. अखेरीस जो मुहूर्त यायला नको होता, त्या मुहुर्तावर लिहावं लागलं. 

परवाच म्हणजे रविवारी नवीन मराठी शाळेत संघ शिक्षा वर्गा जाणं झालं. तेव्हा भोजन व्यवस्था उपेंद्रकडे आहे का, याची विचारणा केली. मात्र, भोजन व्यवस्थेत उपेंद्र नव्हता. मात्र, तेव्हा तो हॉस्पिटलात होता, हे समजलंच नाही. सात मे रोजी आप्पांच्या मुलाच्या मुंजीचं निमंत्रण होतं. मात्र, त्याचवेळी नात्यातील दोघांची बडोद्यामध्ये मुंज असल्यामुळं आम्ही सर्व तिथं गेलो होतो. अन्यथा सात मे रोजी उपेंद्रची भेट नक्की झाली असती. पण तेव्हाही त्याची भेट होऊ शकली नाही. साला नशिबात नसलं ना, की हे असं होतं कायम. 

वर म्हटल्याप्रमाणे देवांनाही पुण्यनगरीतील अस्मादिक मित्रमंडळींचा हेवा वाटला असावा. म्हणूनच त्यांनी एकदम अर्जन्टली उपेंद्रला बोलावून घेतलं असावं. नाही जमणार, हे शब्दच माहिती नसलेल्या उपेंद्रलाही भगवंतांना नकार देता आला नसावा. म्हणूनच इहलोकीचा हा खेळ अर्धवट टाकूनच ते देवादिकांची क्षुधाशांति करण्यासाठी निघून गेला. आम्हाला त्याच्या हातच्या पदार्थ्यांच्या स्वादाला कायमचा पोरका करून. उपेंद्र परत कधीच भेटणार नसला, तरीही संघ शिक्षा वर्ग आणि संघाच्या शिबिरांमधील भोजनकक्षामध्ये त्याचं अस्तित्व नक्की जाणवेल, गुलकंदाचं श्रीखंड किंवा आळूची फक्कड जमलेली भाजी खाताना उपेंद्रची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

साहित्यिक मंडळी त्यांच्या साहित्यकृतींच्या रुपानं, वैज्ञानिक त्यांच्या निरनिराळ्या प्रयोगांच्या आणि संशोधनाच्या रुपानं, कलावंत त्यांच्या कलाकृती किंवा चित्रपट-नाटकांच्या रुपानं आपल्यामध्ये चिरंतन राहतात. तसाच उपेंद्र आपल्यामध्ये कायम राहील. त्यानं खिलविलेल्या पदार्थांच्या रुपानं आणि पदार्थांच्या युनिक आठवणींच्या रुपानं…

‘अन्नपूर्ण’ मित्राला भावपूर्ण आदरांजली…