Friday, December 01, 2017

चर्चा विकासाची, खरे मुद्दे वेगळेच



गुजरातचा विकास झाला का? प्रचारातील नेमके मुद्दे काय आहेत? चारवेळा तू गुजरातला जाऊन आलास, खरंच बदल झालाय का? की नरेंद्र मोदी आणि भाजपावाले फक्त फेकम फाक करत आहेत, असे अनेक प्रश्न मी गुजरातमध्ये आहे, असं म्हटल्यानंतर विचारायला सुरुवात झाली आणि त्यावर मी लिहावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

वास्तविक पाहता, गुजरातचा विकास झालाय का, हा प्रश्नच गैरलागू आहे. आज काँग्रेसकडून प्रचारात जीएसटी आणि नोटाबंदी या मुद्द्यांचा वापर करण्यात येतो आहे. वीज, रस्ते, पाणी आणि उद्योगांचा प्रश्न उपस्थित केला जात नाही. त्यावर जोर दिला जात नाही. जाता जाता उल्लेख केला जातो, यातच सर्व काही आलं. एका सभेत राहुल म्हणतात ३०लाख बेरोजगार आणि दुसऱ्यात तो आकडा वाढवून ५० लाखांवर नेतात. आता बेरोजगारीचा मुद्दा जर इतकाच गंभीर असता तर राहुल यांनी देखील तेवढंच गांभीर्य बाळगायला नको का? थोडक्यात म्हणजे त्या मुद्द्यांमध्ये हवाच नाही, हे उघड आहे. 

भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर गुजरातमध्ये काय झालं, हे पाहण्यासाठी गुजरातमध्येच गेलं पाहिजे. पण थोडक्यात सांगायचं झालं, तर गुजरातमध्ये आजच्या घडीला रस्ते उत्तम आहेत. आज आहेत असं नाही. २००२मध्ये आम्ही बार्डोली जिल्ह्यातील व्यारा या तुषार अमरसिंह चौधरी यांच्या गावात गेलो होतो. आदिवासी भागातील हे गाव. पण तिथपर्यंत डांबराचा पक्के रस्ते झाले होते. मुख्य म्हणजे खड्डे नव्हते. गावागावांमध्ये वीज पोहोचलेली आहे. मुख्य म्हणजे भारनियमन हा शब्द त्यांना माहिती नाही. वीजनिर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होते आहे. मोदी आल्यापासून नवे वीजनिर्मिती प्रकल्प उभे राहिले आहेत.


पाण्याचा प्रश्नही बहुतांश प्रमाणात सुटला आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा कच्छ आणि सौराष्ट्र पाण्याशिवाय तडफडत होता. मोदींनी नर्मदेचे पाणी कच्छ आणि सौराष्ट्रात नेण्याचा संकल्प सोडला. ‘नर्मदे सर्वदे, गुजरात को गर्व दे’ ही घोषणा फक्त दिली नाही. तर प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. २००७मध्येच नर्मदेचे पाणी कच्छमध्ये दिसायला लागले होते. गेल्या निवडणुकीत सौराष्ट्राच्या काही भागात नर्मदेचे पाणी पोहोचविण्यात आले होते. यंदा आणखी काही भागात पाणी पोहोचले आहे. सात फूट व्यासाच्या पाइपलाईनमधून पाणी नेण्याचे कार्य सुरू आहे. गुजरातमधील विकास पहायचा असेल, तर राहुल यांनी मारुती कारमध्ये बसावे आणि पाइपलाईनमधूनच सौराष्ट्रात जावे, असा उपरोधिक सल्ला भाजपावाले राहुल यांना प्रचारात देतात.

सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास शंभरहून अधिक गावे ओलिताखाली येणार आहेत. पन्नास हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. खरीपाबरोबरच रब्बी पिकेही घेऊ शकणार आहेत. नर्मदा नदीचे वाहून जाणारे पाणी कालवे तसेच पाइपलाईनच्या माध्यमातून सौराष्ट्रातील विविध धरणांमध्ये आणि बंधाऱ्यांमधून फिरविले आहे. सव्वा हजार किलोमीटर लांबीची ही पाइपलाईन असणार आहे. सौराष्ट्रातील एकूण १३८ धरणांपैकी ११५ धरणांमध्ये हे पाणी फिरविण्यात आले आहे. या योजनेचा फायदा सौराष्ट्रातील ७३१ खेडी आणि ३१ छोट्या गावांना होणार आहे. मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी ही योजना जाहीर केली होती. त्याचे मूर्त स्वरुप आता दिसू लागले आहे.

गुजरातमध्ये जवळपास सात लाखांहून अधिक चेक डॅम्स बांधण्यात आले आहेत. त्यातून पाणी खेळविण्यात आलं आहे. पाणी जिरवण्यात आलं आहे. दोन वर्षे पाऊस चांगला झाल्यामुळे सर्व बंधारे तसेच जलसाठे भरलेले आहेत. नर्मदेचं पाणी कच्छ आणि सौराष्ट्रामध्ये नेऊन मोदींनी त्या भागातील बहुतांश ठिकाणची पाण्याची समस्या सोडविली आहे. प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते चार पदरी, सहा पदरी होत आहे. राजकोट-अहमदाबाद रस्ता सहा पदरी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. वडोदारा-अहमदाबाद या एक्स्प्रेस वे वरून आवर्जून प्रवास करून पाहण्यासारखा आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या दहेज (भरूच) ते घोघा (भावनगर) या रो-रो अर्थात, एसी बोट सुविधेमुळे बारा तासांचे अंतर अवघ्या दीड तासावर आले आहे. ‘विकास गांडो थयो छे…’ म्हणणाऱ्यांनी धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधली असावी, असेच म्हणावे लागते. त्यामुळे वीज, रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधा यांच्यावर काँग्रेसकडे बोलण्यासारखे काहीच नाही. 


काँग्रेस प्रचारात आरक्षणाच्या मुद्द्यावर जोर देऊन आहे. आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करते. पण याच काँग्रेसने भाजपाचा हक्काचा मतदार असलेल्या पटेल समाजाविरोधात ‘खाम’ची मोट बांधली. क्षत्रिय, हरिजन (दलित), आदिवासी आणि मुस्लिम यांना एकत्र आणून सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. पटेल समाज हे विसरला असेल, असे वाटते का? सरदार पटेल यांना काँग्रेसने दिलेली वागणूक, चिमणभाई पटेल यांची काँग्रेसमधून झालेली हकालपट्टी, काँग्रेसच्या कार्यकाळात चिमणभाई वगळता एकही पटेल मुख्यमंत्री न देण्याची काँग्रेसची खेळी, उलट भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले बाबूभाई पटेल आणि चिमणभाई पटेल असे मुद्दे भाजपा प्रचारात हिरिरीने मांडत आहे. 

नरेंद्र मोदी हे धूर्त राजकारणी आहेत. मुरब्बी आहेत. मतदारांना, विशेषतः गुजराती मतदारांना कसे आपलेसे करायचे हे त्यांना नेमके माहिती आहे. काय बोलले, की काय होते, हे ते समजून आहेत. भरपूर विकासकामे केली. योजना आणल्या. त्या यशस्वीपणे राबविल्या. पण फक्त विकासकामांवर त्यांनी कधीच मागितली नाहीत. विकासकामांना त्यांनी भावनिकतेची जोड दिली. उदाहरणच द्यायचे झाले, तर सरदार सरोवराचे देता येऊ शकेल. मी पंतप्रधान झाल्यावर सरदार सरोवरासाठी काय केले एवढे सांगून ते थांबत नाहीत. तर काँग्रेसने कसे सरदार सरोवराच्या कामात अडथळे आणले, याचा पाढा ते वाचतात. काँग्रेसला हे काम करता आले नसते का, मनमोहनसिंग यांचे हात कोणी बांधले होते? असा प्रश्न ते विचारतात. काँग्रेसला गुजरात विकसित झालेले, पुढे गेलेले पहायचेच नाही वगैरे सांगून टाकतात. 

२००७मध्ये जेव्हा काँग्रेसने नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले तेव्हा त्यांनी हा पाच कोटी गुजराती लोकांचा अपमान असल्याचे सांगून काँग्रेसवर तो मुद्दा बुमरँगसारखा उलटविला होता. त्यानंतर ‘मौत का सौदागर’भोवतीच निवडणूक राहिली आणि फिरलीही. आजही निवडणुकीत हाफिज सईदचा मुद्दा मोदी भाषणांमध्ये वापरतात. हाफीज सईद सुटल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना इतका आनंद का झाला वगैरे वगैरे. वास्तविक तसे होण्याची शक्यता नसावी. पण त्या मुद्द्याच्या आधारे काँग्रेस आणि मुस्लिम यांच्यातील संबंध वगैरे समाजमनावर ठसविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हाफिज सईद तर मोदींच्या भाषणातील आवडता मुद्दा आहे. त्या निमित्ताने ते काँग्रेसवर निशाणा हमखास साधतात.


आणखी एक मुद्दा जो निवडणुकीत मह्त्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे संचारबंदी आणि दंग्यांचा. गुजराती समाज हा शांतताप्रिय आहे. आपण बरं, आपला व्यवसाय बरा आणि फायदा बरा एवढ्या पुरतेच त्याचे आयुष्य मर्यादित आहे. काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर हिंदू-मुस्लिम दंगे व्हायचे. कर्फ्यू अर्थात, संचारबंदी लागायची. मग ती पंधरा दिवस, महिनाभरही असायची. व्यवसाय बंद व्हायचे, माल पडून रहायचा, ग्राहक फिरकायचे नाहीत, पैसा अडकून रहायचा. फायदा तर दूरच. काँग्रेसच्या काळातील ते दिवस व्यापारी लोक विसरलेले नसावेत. पण मोदी सत्तेवर आल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांमध्ये ग्रोधा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीनंतर एकही मोठा दंगा झालेला नाही. त्यामुळे व्यावसायिक खूष आहेत. अर्थातच, त्यामध्ये हिंदू आहेत, तसेच मुस्लिमही आहेत. दंगे, गुंडागिरी संपविल्याबद्दल ते मनापासून मोदी यांचे आभार मानतात. मोदी दंगे आणि कर्फ्यूचा मुद्दा आपल्या प्रत्येक भाषणात उपस्थित करतातच करतात.

गेल्या निवडणुकीत डभोईयेथे गेलो होतो. तेव्हा एका मुस्लिम सरबतवाल्याशी गप्पा झाल्या. मुस्लिम असा उल्लेखकरण्याचे कारण म्हणजे त्याने मोदीचे कौतुक केले होते म्हणून. गोध्रा दंगलीत आमच्या समाजाच्या लोकांच्या ज्या पद्धतीने कत्तली झाल्या, त्याबद्दल आम्ही मोदीला कधीच माफ करणार नाही. त्याबद्दलचा राग कधीच मनातून जाणार नाही. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे आणि ती म्हणजे त्यानंतर एकही दंगा झालेला नाही. त्यामुळे आमच्या व्यवसायाला कोणतीही बाधा पोहोचलेली नाही. नुकसान झालेले नाही. त्याबद्दल मोदींना नक्की धन्यवाद दिले पाहिजे. 

मोदींनी गुजरातमधील गुंडागर्दी आणि खंडणीखोरी बहुतांश प्रमाणात संपविली. आटोक्यात आणली. ते काय किंवा मुख्यमंत्री विजय रुपाणी सभांमधून त्याचा आवर्जून उल्लेख करतात. सलीम सुरती की तत्सम चार-पाच शहरांमधील गुंडांची गुंडागर्दी कशापद्धतीने संपवून टाकली, याचे दाखले देतात. गुंडांचा उल्लेख करताना आवर्जून त्यांच्या नावांचा उल्लेखही होतो. लोक जे समजायचे ते समजून जातात. दंगे थांबले, तशीच गुंडागर्दीही थांबली. व्यावसायिक वा व्यापारी कोणताही असो, त्याला आपला व्यवसाय पहिला. मग राजकारण. व्यवसायात अडथळे नाहीत, याचे श्रेय ते मोदी आणि भाजपाच्या राजवटीला देतात. सुरत आणि अहमदाबादच्या मार्केटमधील अनेक व्यापारी देखील ही गोष्ट मान्य करतात. 


भाषणामध्ये नसला, तरीही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेला एक मुद्दा म्हणजे काँग्रेसचे मुस्लिम लांगूलचालन. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली, तर मुस्लिम पुन्हा डोके वर काढतील आणि आपल्याला डोईजड होतील, हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत असलेला आहे. काँग्रेसने कायम मुस्लिमांचे लांगुलचालन केले आणि हिंदूंकडे दुर्लक्ष केले, ही भावना गुजरातमधील हिंदू समाजात घट्ट आहे. कदाचित राहुल यांच्या लक्षात हे आता आले. त्यामुळेच ते हिंदू मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांचे आशीर्वाद मागत आहेत. कोणीही कोणत्याही ठिकाणी जावे. पण इतकी वर्षे गुजरातमधील जनेतेने काँग्रेस नेत्यांना इफ्तारच्या पार्ट्या आयोजित करताना, जाळीदार टोप्या घालून शीरखुर्मा ओरपताना आणि दर्ग्यांमध्ये जाऊन चादरी चढवितानाच पाहिलेले आहे. इतक्या वर्षांच्या या स्मृती एकाच निवडणुकीत संपण्यासारख्या नाहीत. पण तरीही राहुल यांनी परिस्थिती मान्य केली हे नसे थोडके.

सोशल मीडियावर फिरत असलेला एका मेसेजची मला खूप गंमत वाटली. काँग्रेस सत्तेवर आली, तर मुस्लिमांमधील दुष्प्रवृत्ती आपल्या डोक्यावर बसतील, याची भीती समाजमनाला आहे. अनेक सामान्य लोक ती बोलून दाखवितात. व्यावसायिक दबक्या आवाजात सांगतात. रिक्षावाले खुलेपणाने याबद्दल बोलतात. त्यालाच खतपाणी घालणारा एक मेसेज सोशल मीडियावर फिरतो आहे. ‘उद्या जर काँग्रेस सत्तेवर आली, तर काँग्रेसच्या राजवटीत हे मुस्लिम लोक आपल्या घरामध्ये येऊन नमाज पढायला कमी करणार नाहीत.’ हा फक्त कळलेला मेसेज. हा नि असे कितीतरी अनेक मेसेज फिरत असावेत. यावरून आपल्याला दोन्ही समाजातील ऋणानुंबध आणि असलेली भीती हे समजून येऊ शकते. त्यामुळे गुजरात निवडणुकीचे विश्लेषण करताना, आडाखे बांधताना हिंदू-मुस्लिम संबंध हा मुद्दा अजिबात विसरता कामा नये. गुजरातमध्ये मुस्लिमांचा टक्का दहाच्या आसापासच आहे. त्यामुळे विकास वगैरे सर्व ठीक आहे. पण आजही गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हे ‘हिंदुत्ववाद्यांचे आयडॉल’ म्हणूनच अधिक लोकप्रिय आहेत. आपलेसे वाटणारे आहेत. त्यामुळे चर्चेत नसला तरीही गुजरातच्या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा आणि प्रभाव टाकणारा आहे.

वीज-पाणी-रस्ते यांच्याबद्दल काँग्रेसकडे बोलायला काहीही नाही. पण तरीही विकासाची आकडेवारी, वेगवेगळे अहवाल आणि सर्व्हे वगैरे पुढे करून राहुल गांधी याबद्दल भाषणांमध्ये बोलू शकतात. पण गुजरातच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या हिंदू-मुस्लिम यांच्यातील संबंध, गुंडागर्दी, गुन्हेगारी, संचारबंदी वगैरे मुद्द्यांवर राहुल कोणत्या तोंडाने मोदींचा प्रतिवाद करतील. आणि मतदान जसजसे जवळ येत जाईल, तसतसे याच मुद्द्यांवर निवडणूक स्वार होईल. 



 

No comments: