Monday, December 04, 2017

राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…


राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी… भारतीय जनता पार्टीची एक लोकप्रिय घोषणा. जुन्या स्मृतींना उजाळा देणारी आणि वैयक्तिक माझी आवडती असलेली घोषणा. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच नाही, तर सर्वसामान्य जनतेनेही भरपूर प्रेम केले. अटलजी एकदा तरी पंतप्रधान व्हायला पाहिजे, ही सर्वसामान्य नागरिकाची भावना होती. १९९६मध्ये भाजपाचा पहिला पंतप्रधान दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाला खरा. पण अवघ्या तेरा दिवसांत भाजपाचे सरकार पडले आणि तेव्हापासून ही भावना अधिकच दृढ होत गेली. अटलजींना पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे. 



एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची सरकारेही पडली आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागले. नंतर पुन्हा एकदा जनतेने अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरच विश्वास दर्शविला. दुर्दैवाने जयललिता, मायावती, सैफुद्दीन सोझ आणि गिरीधर गमांग यांच्या कृत्यांमुळे अटलबिहारी यांचे सरकार गडगडले. तेरा महिन्यांतच निवडणुका लागल्या. त्यावेळी म्हणजेच १९९९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुखावणारी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी एक साधीसोपी आणि सुंदर घोषणा अस्तित्वात आली. द्यायला एकदम सहज आणि ऐकायला खूपच सुंदर. ती घोषणा म्हणजे ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…’ 

तो काळ ‘सोशल मीडिया’चा नव्हता. त्यामुळे कॅम्पेन कोण हँडल करतंय, घोषणा आणि गाणी कोण लिहितंय किंवा जाहिराती कोण तयार करतंय याची फारशी चर्चा होत नसे. मुळात प्रचारातही तेवढी व्यावसायिकता आलेली नव्हती. एकदम आक्रमक पद्धतीने प्रचार व्हायचाही नाही. सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे प्रचाराचा भडिमार व्हायचा नाही. वृत्तपत्र, टीव्ही, प्रचार सभा नि मिरवणुका या माध्यमातूनच प्रचार व्हायचा. सभा, मेळावे आणि मिरवणुकांमध्ये घोषणा देण्याची जोरदार संधी असायची. घोषणाबाजीच्या त्या काळात एकदम कडक घोषणा कानावर पडायची. आणि ती म्हणजे ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…’ आजही तीच माझी सर्वाधिक आवडती घोषणा आहे. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा उपयोग करून अनेक घोषणा तयार करण्यात आल्या होत्या. आणीबाणीच्या काळात एक घोषणा खूप गाजली आणि ती म्हणजे ‘अंधेरे में एक चिंगारी, अटलबिहारी अटलबिहारी.’ जयप्रकाश नारायण यांच्यावर एक घोषणा तयार करण्यात आली होती, ‘अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश…’ त्याच घोषणेत थोडी फेरफार बदल करून अटलजींवर घोषणा तयार करण्यात आली असावी. भाजपाच्या स्थापनेनंतर त्याच धर्तीवर एक नवी घोषणा तयार करण्यात आली. त्यावेळी भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण तरीही कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी ती घोषणा दिली जायची. ‘बीजेपी की क्या तैयारी, अटलबिहारी अटलबिहारी.’


नंतरच्या काळात एक घोषणा लोकप्रिय ठरली आणि ती म्हणजे ‘अगली बारी अटलबिहारी’. ‘अगली बारी’चा संदर्भ देत अटलजी एक विनोद सांगायचे. ‘अगली बारी’ बहुत हो गया. अब अब की बारी कहिए.’ आता ‘अब की बारी’ म्हणा, असं खुद्द अटलबिहारी यांनीच सांगिल्यानंतर नवी घोषणा फॉर्मात आली, ‘अब की बारी अटलबिहारी’. अशा सर्व घोषणांच्या भाऊगर्दीत अटलबिहारींवर तयार केलेली ‘राजतिलक की करो तैयारी’ हीच घोषणा सर्वाधिक लक्षात राहिली. सर्वाधिक भावली. नंतर यावरून अनेक घोषणा करण्यात आल्या. ‘धर्म जिता अधर्म हारी, आ रहे है अटलबिहारी’, ‘राजतिलक की करो तयारी, नरेंद्र मोदी अबकी बारी’, ‘… आ रहे है भगवाधारी’ आणि शब्दांची फेरफार करून आणखी दोन-तीन घोषणा बनविण्यात आल्या होत्या. पण ही जी मूळ घोषणा आहे, ती एकदम जबरदस्त होती.
कवी मनाच्या अटलजींच्या प्रकृतीला एकदम साजेशी अशीच होती. तिच्यात सौंदर्य होतं, सहजता होती. मुद्दामून यमक जुळविण्यासाठी केलेली धावपळ नव्हती. शिवाय पंतप्रधान होण्यासाठी अटलजी येत आहेत. बहुमत तर मिळालेच आहे आणि आता फक्त राज्याभिषेक (शपथविधी) होणे बाकी आहे, हा आत्मविश्वास त्यामधून अशा काही पद्धतीने व्यक्त होत होता, की विचारता सोय नाही. 

गुजरातच्या निवडणुकीचे ब्लॉग लिहिताना मध्येच अटलबिहारी आणि या घोषणेचं काय लावून धरलंय, असं तुम्हाला नक्की वाटत असेल. तर सांगायची गोष्ट अशी, की ही घोषणा लिहिणाऱ्या व्यक्तीची गुजरात दौऱ्यावर असताना भेट झाली. भेट तशी पूर्वीही झालेली. पण त्यावेळी मला ही गोष्ट माहिती नव्हती. यावेळीही भेट पूर्वनियोजित वगैरे नव्हती. अगदी अचानकच आम्ही भेटलो. घोषणा लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव हितेशभाई पंड्या. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे २००७च्या निवडणुकीपासून मी त्यांना ओळखतोय. अधूनमधून फोनवर बोलणंही होतं. व्हॉट्सअप सुरू असतं. पण ती घोषणा तयार करणारी व्यक्ती हीच आहे, याचा पत्ता मला कधीच लागला नाही. मुळात तसा विषयही कधी निघाला नव्हता आणि असं उगाच कोण कशाला स्वतःहून सांगेल. पण राजकोटमध्ये गेलो तेव्हा भाजपाच्या एका कार्यालयात बसलो असताना भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राजूभाई ध्रुव यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली. तेव्हा मला तर जबदरस्त धक्काच बसला. 

 
  (राजूभाई ध्रुव)

राजूभाईंबरोबर मस्त गप्पा सुरू असताना अचानक हितेशभाई कार्यालयात आले. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांना माझी ओळख करून दिली. त्यांनीही मला ओळखलं. कारण आम्ही २००७नंतर आताच प्रत्यक्ष भेटत होतो. मग आमच्या गप्पांमध्ये ते देखील सहभागी झाले. त्यावेळी राजूभाईंनी उलगडा केला, की तुम्ही हितेशभाईंना ओळखता पण त्यांची आणखी एक वेगळी ओळख तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हटलं, कोणती ओळख. तेव्हा त्यांनी सांगितलं, की ‘राजतिलक की करो तैयारी …’ ही घोषणा हितेशभाईंनी तयार केली आहे. म्हटलं व्वा… आपल्याला आवडणारी घोषणा तयार करणाऱ्या व्यक्तीची अचानक अशा पद्धतीने भेट व्हावी, या पेक्षा आनंदाची गोष्ट कोणती?

हितेशभाई हे वरिष्ठ पत्रकार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने स्वयंसेवक आणि जनसंघापासूनचे कार्यकर्ते. तेव्हापासूनच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख आहे. मोदी २००१मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘कोअर टीम’मध्ये आहेत. नंतर आनंदीबेन पटेल यांच्या सोबत आणि आता विजय रुपाणी यांच्यासोबतही ते आहेत. अशा हितेशभाईंची नवी ओळख राजकोट येथे झाली.

 
  (हितेशभाई पंड्या)

ही घोषणा कशी तयार झाली याचा उलगडा हितेशभाईंनी केला. काळ होता १९९९च्या निवडणुकीपूर्वीचा. त्यावेळी ते ‘फूलछाब’ नावाच्या गुजराती वृत्तपत्रामध्ये कामाला होते. तेव्हाचे राजकोट शहराचे भाजप अध्यक्ष रमेश रुपापारा यांचा हितेशभाईंना कार्यालयात दूरध्वनी आला आणि निवडणूक प्रचारासाठी एखादे स्लोगन सुचवा, अशी त्यांनी विनंती केली. रात्रीचे साडेनऊ-दहा वाजले असतील. हातातील काम आटोपले, की मग विचार करतो आणि सुचले की स्लोगन पाठवितो, असे सांगून हितेशभाईंनी फोन ठेवून दिला. घोषणा प्रदेश स्तराप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरही वापरता आली पाहिजे, अशी रुपापारा यांची अट होती. थोडक्यात ती हिंदीत हवी होती. रात्री एक-दीड वाजले तरी फोन कर. मी येतो आणि घेऊन जातो, असे सांगून रुपापारा यांनी फोन ठेवून दिला. एकीकडे काम सुरू असतानाच दुसरीकडे विचारही सुरू होता. त्यावेळी त्यांना अचानक साडेअकराच्या सुमारास शब्द सुचले ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…’ 

तातडीने त्यांनी ती घोषणा कागदावर उतरविलील आणि प्रदेश कार्यालयात फॅक्स करून पाठवून दिली. त्यानंतर काही दिवस त्यावर चर्चाच झाली नाही. जवळपास दहा दिवसांनंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये ठळकपणे त्या घोषणेचा वापर करण्यात येऊ लागला आणि ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी’ ही घोषणा घराघरात पोहोचली. कार्यकर्त्यांच्या ओठावर रुळली. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील प्रचारात त्याचा वापर होऊ लागला.



एका सुंदर घोषणेच्या् निर्मात्याची भेट झाल्याचा आनंद तर मनात होताच. त्याचप्रमाणे आपण ज्याला ओळखतो अशा माणसाची आणखी एक वेगळी ओळख आपल्याला झाली, याचा आनंद खूप अधिक होता. हितेशभाईंची भेट आणि त्यांची नवी ओळख ही आमची राजकोट वारी सफल करून गेली.


2 comments:

वाचा अन् लिहा.. said...

घोषणाकाराची ओळख चर्चा तितकी नाही होत जितकी घोषणेची होते.
खूप चांगला ब्लाॅग सर

sagar said...

छान झालाय लेख. रंजक, ओघवता आणि माहितीपूर्ण..या लोकांना तू भेटतो आहेस..गुजरात हिंडतो आहेस. अभ्यास करतो आहेस. लिहिता राहा..सागर गोखले